Skip to main content
x

गावडे, सुनील पुरुषोत्तम

          ‘व्हेनिस बिनाले’, ‘बिनाले क्युवे’(ऑस्ट्रिया), ‘दिल्ली-पॅरिस-मुंबई’— सेंटर पॉम्पिदू अशा जागतिक दर्जाच्या प्रदर्शनांमध्ये भारतीय समकालीन कलेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलावंतांमध्ये सुनील पुरुषोत्तम गावडे यांचा समावेश केला जातो. सुनील गावडे यांचे वडील पुरुषोत्तम सहदेव गावडे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट येथे नोकरी करत. त्यांच्या आईचे नाव मंगला होते. घरातील आध्यात्मिक वातावरणामुळे अध्यात्मातील अनेक अधिकारी व्यक्तींच्या सान्निध्यात होते. घरातील या वातावरणात भौतिक मर्यादांपलीकडे जाऊन जीवनाचे तत्त्वज्ञान समजून घेण्याचे बीज रोवले गेले.

          सुनील गावडे यांचे शालेय शिक्षण अनुक्रमे टिळकनगर म्युनिसिपालिटी शाळा, चेंबूर; सरस्वती विद्यामंदिर, चेंबूर व राजा शिवाजी विद्यालय, दादर या शाळांमध्ये झाले. सरस्वती विद्यामंदिरचे तत्कालीन प्राचार्य जोशी व चित्रकला शिक्षक कुलकर्णी, तसेच राजा शिवाजी विद्यालयातील चित्रकला शिक्षक सदानंद कुवाळेकर यांनी सुनील गावडे यांच्यातील कलागुण हेरून त्यांच्या चित्रकलेला प्रोत्साहन दिले. शालेय शिक्षण संपल्यानंतर १९७५ मध्ये त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबईमध्ये ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेंटिंग विभागात प्रवेश घेतला. कलामहाविद्यालयात त्यांना काशिनाथ साळवे, विश्‍वनाथ सोलापूरकर, प्रभाकर कोलते हे शिक्षक म्हणून लाभले. याच काळात त्यांना योगेश रावळ, बिभास आमोणकर यांच्यासारखे मित्रही मिळाले.

          पदविका प्राप्त केल्यानंतर १९८० मध्ये मध्यमवर्गीय चाकोरीबद्ध आयुष्य सोडून ते काही काळ घराबाहेर पडले. या काळात मुंबई ते पंढरपूर व्हाया महाळुंगे, पुणे असा परतीचा दीर्घ प्रवास त्यांनी पायी केला. या एकांताच्या प्रवासात उघड्या आकाशाखाली अंतर्मुख होऊन आत्मसंवाद साधला गेला.

          त्यांच्या चित्रकृती जहांगीर आर्ट गॅलरीच्या ‘मान्सून शो’मध्ये १९८१ मध्ये प्रथम प्रदर्शित झाल्या. या चित्रकृतींच्या विक्रीतून आलेल्या रकमेमधून त्यांनी मुलुंड येथील नानीपाडा-कोळीवाडा भागात बैठा स्टूडिओ घेतला. यानंतरच्या साडेतीन वर्षांच्या काळात केवळ कलानिर्मितीवर उपजीविका करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु तो यशस्वी न झाल्याने अखेर १९८३ मध्ये त्यांनी बॉम्बे पोर्ट ट्रस्ट येथे कारकुनाची नोकरी स्वीकारली. कलेशी संबंंध नसलेल्या ठिकाणी बारा वर्षे नोकरी करूनही ते स्वतंत्रपणे कलानिर्मिती करत राहिले. या काळात बॉम्बे पोर्ट ट्रस्टमधील सहकाऱ्यांनी सुनील गावडे यांच्यातील कलाकार समजून घेऊन त्यांना सहकार्य केले. गावडे नेहमीच त्याबद्दल कृतज्ञ राहिले आहेत.

          त्यांनी १९९० मध्ये पहिले एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये केले. अमूर्त चित्रांच्या या मालिकेतील दृश्यसंकल्पना भूमिती, गणित, विज्ञान यांना स्पर्श करणार्‍या होत्या. त्यांना १९९५ मध्ये ‘ब्रिटिश काउन्सिल’चा ‘चार्ल्स वॉलेस’ पुरस्कार मिळाला व ग्लासगोला जाण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी बॉम्बे पोर्ट ट्रस्टची नोकरी सोडली आणि स्वतंत्रपणे कलानिर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला त्यांच्या चित्रकार पत्नी उषा गावडे यांचा पाठिंबा होता.

          स्कॉटलंड येथील वास्तव्यात १९९५ मध्ये त्यांना कलाकार म्हणून स्वत:ची दृश्यभाषा गवसली. यानंतरच्या काळात जागतिक पातळीवरच्या विविध प्रदर्शनांमध्ये त्यांचा सहभाग वाढला. त्यापैकी ‘ब्लाइंड बल्ब्ज’ हे गल्फ आर्ट फेअर २००७ मधील शिल्प उल्लेखनीय ठरले. हे शिल्प ‘मेड बाय इंडियन्स-आर्ट ऑन बीच’ (सेंट ट्रॉपेज, फ्रान्स) ‘आर्ट कोर्निश’ (अबुधाबी) ‘मॅक्झिमम सिटी’ (लील फ्रान्स) येथे प्रदर्शित झाले. २००९ मधील अत्यंत प्रतिष्ठित अशा त्रेपन्नाव्या व्हेनिस बिनालेमधील ‘अ‍ॅलिटरेशन’ हे दोन टनांचे मोबाइल शिल्प अर्सनालेतील ‘मुरुप क्युरेटेड शो’ मध्ये वाखाणले गेले.

          २०१० मध्ये मोक्का (म्यूझियम ऑफ कन्टेम्पररी आर्ट) येथे ‘फाइंडिंग इंडिया’ अंतर्गत, बारा फुटी स्टेनलेस स्टील पेंड्युलम असलेले ‘व्हिशिअस सर्कल’ हे शिल्प प्रदर्शित झाले. ‘व्हर्च्युअली अन्टचेबल’ हे गुलाबाच्या पाकळ्यांच्या हाराचा आभास निर्माण करणारे; परंतु प्रत्यक्षात मात्र रेझर ब्लेडने बनवलेले, विसंगती दर्शवणारे शिल्प पॅरिस येथील ‘सेंटर पॉम्पिदू’ मध्ये २०११ साली प्रदर्शित झाले. याव्यतिरिक्त ‘स्वर्लिंग ब्लेड्स’ एआरकेएस गॅलरी, लंडन; ‘रेडियम ग्रस’, मॅकिन्टॉश म्यूझियम, ग्लासगो; मुंबई, बडोदा, चेन्नई, नवी दिल्ली या ठिकाणी प्रदर्शित झालेले ‘ऑब्लिक; एट सेकण्ड्स अहेड ऑफ टाइम’ (बंगलोर, साक्षी); ‘आयएमएम’ (मुंबई) ही त्यांची उल्लेखनीय प्रदर्शने आहेत.

          अशा कलानिर्मितीच्या पार्श्‍वभूमीवर व जागतिक समकालीन कलेच्या व्यासपीठावर सुनील गावडे यांचा उल्लेख फ्रान्समधील अत्यंत प्रतिष्ठित ‘ब्यून आर्ट्स’ मॅगझिनने जगप्रसिद्ध कलाकार मोना हातुम यांच्यासमवेत केला आहे.

          सुनील गावडे त्यांच्या कलाकृतीतील संकल्पनांची द्विस्तरीय मांडणी करताना दिसतात. ते त्यांच्या कलाकृतीतून एकाच दृश्य अनुभवाचे दोन अर्थ व्यक्त करतात. त्यांच्या ‘व्हर्च्युअली अन्टचेबल-१’ या शिल्पात दुरून प्रथमदर्शनी जे निरागस, सुंदर फुलपाखरू दिसते, त्याचे शरीर तीक्ष्ण तलवारीपासून, तर पंख तीन हजार सहाशे धारदार रेझर ब्लेड्सपासून बनवलेले आहेत, हे जवळून पाहताना लक्षात येते. हा अनपेक्षित धक्का अंगावर शहारे तर आणतोच, त्याच बरोबरीने आभास आणि सत्य यांची जाणीवही करून देतो.

          सुनील गावडे यांच्या कलाकृतींमध्ये सौंदर्यसंवेदनात्मक, तात्त्विक संकल्पनांचा उत्कृष्ट उपयोग केलेला असतो. या संकल्पनांना अचूक व विविध माध्यमांची जोड सूक्ष्म अभ्यासाच्या साह्याने दिलेली दिसते. यातून एकाच वेळी गुंतागुंत व सहजता या दोन्हींचे परिणाम त्यांच्या कलाकृतींमधून निर्माण होतात.

          संकल्पना व तंत्रज्ञान यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणाऱ्या या कलाकृतींनी समकालीन कलेच्या अभिव्यक्तीमध्ये अर्थपूर्ण स्थान निर्माण केले आहे.

- माणिक वालावलकर

गावडे, सुनील पुरुषोत्तम