वऱ्हाडपांडे , वसंत कृष्ण
वर्धा जिल्ह्यातील महाबळ येथे जन्मलेले वसंत वऱ्हाडपांडे १९४९ साली नागपूर विद्यापीठातून बी.ए व १९५१ साली त्याच विद्यापीठातून एम.ए., पीएच.डी. झाले. काही काळ शिक्षक व नंतर मध्यप्रदेश सरकारच्या भाषा विभागात अनुवादक म्हणून काम केल्यानंतर ते नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजात मराठीचे अध्यापन करू लागले (१९५५). १९८७नंतर वसंतराव निवृत्त झाले.
वऱ्हाडपांडे यांनी कथा, कविता, कादंबरी, नाटक, समीक्षा, बालसाहित्य अशा विविध क्षेत्रांत मुक्त विहार करून कीर्ती संपादन केली. त्यांनी हाताळलेल्या साहित्याच्या प्रत्येक प्रकारातील त्यांचे कसब जाणकारांच्या पसंतीस उतरले. ‘हा माणूस विलक्षण सौजन्यशील व स्नेहशील होता. मध्यमवर्गीय माणसाचे सुखी संसाराचे चित्र त्यांच्या घरात सफलपणे आकाराला आले होते’, असे प्रा. राम शेवाळकर त्यांच्या ‘उजेडाची झाडे’ या पुस्तकात म्हणतात.
डॉ. वऱ्हाड पाडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या दोन सुकन्यांनी (डॉ. अंजली कुलकर्णी व डॉ. अनुराधा हरकरे) प्रकाशात आणलेल्या ‘ऊर्मिला’ या कादंबरीला वऱ्हाडपांडे यांचे समकालीन साहित्यिक श्री. के.ज. पुरोहित यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांत पुरोहित म्हणतात, ‘पत्रे हा या कादंबरीचा एक कौशल्यपूर्ण वापरलेल्या परिणामकारक तंत्राचा महत्त्वाचा भाग आहे. सगळी पत्रे अत्यंत समर्पक आणि कथानकाच्या रचनेचे सौंदर्य वाढवणारी आहेत. वऱ्हाडपांडे बोधवादी नव्हतेच नव्हते तर ते आनंदवादी होते. वऱ्हाडपांडे निश्चितच चांगले कादंबरीकार झाले असते, त्याची ‘ऊर्मिला’ ही कादंबरी खात्री देते.’ ‘ऊर्मिला’च्या ‘स्मृतिगंध’मध्ये डॉक्टरांच्या कन्या आवर्जून सांगतात, ‘त्यांच्या सर्व साहित्यातून त्यांनी मानवी नातेसंबंध आणि त्यांच्यातील खरेपणा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांचं सारं साहित्य दर्जेदार संस्कृतिमूल्य जपणारं आणि मांगल्याची छाप असणारं आहे.’
११ कथा समाविष्ट असणारा ‘वास्तु’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह (१९५७) होय. त्यातील ‘मधला दुवा’ या कथेला ‘प्रसाद’ मासिकाच्या दीपावली कथास्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले. फॅकल्टी ऑफ आर्ट्स, मराठी बोर्ड ऑफ स्टडीज, मराठी पाठ्यपुस्तक समिती इत्यादींवर ते सदस्य म्हणून कार्यरत होते. पीएच.डी. पदवीचे मार्गदर्शक व परीक्षक म्हणूनही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
त्यांच्या ‘नागपुरी बोली : भाषाशास्त्रीय अभ्यास’ व ‘उत्सव’ या दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार अनुक्रमे १९७४ व १९८७ साली मिळाला. पु.भा. भावे : साहित्यस्वरूप आणि समीक्षा; याशिवाय त्यांचे ‘भारतीय स्त्रीरत्ने’ (चरित्रकथा), ‘कोल्होबाची करामत’ (बालसाहित्य), ‘मानसी’ (कथासंग्रह), ‘या मनाचा पाळणा’ (कवितासंग्रह १९७३) इत्यादी साहित्य प्रसिद्ध आहे. संपादित ग्रंथांत ‘मुक्तेश्वरकृत हरिश्चंद्राख्यान’ (१९६३) आणि सामराज विरचित ‘रुक्मिणीहरण’ (१९६९) यांचा समावेश आहे.