देसाई, वसंत शांताराम
वसंतरावांचा इंदूर येथे जन्म झाला. नागरी जीवनापासून दूर राहिल्यामुळे वयाच्या नवव्या वर्षापर्यंत वसंतरावांनी सर्कस, नाटक, सिनेमा हे शब्द व टिळक, चाफेकर, सावरकर ही नावे ऐकलीसुद्धा नव्हती; तसेच वृत्तपत्रे, मासिके यांचे अस्तित्वही त्यांना माहीत नव्हते. ते दहा वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले. कष्टाळू, काटकसरी, स्वाभिमानी आईचे सर्व मुलांत त्यांच्यावर जास्त प्रेम होते.
वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मामांचा (राजाराम जगन्नाथ पाटकर) सहवास हाच मोठा आधार होता. जून १९१३ मध्ये मामांच्या सायकलवरून इंदूरच्या सिटी हायस्कूलमध्ये वसंतराव दाखल झाले. त्यांना बालसाहित्य वाचनाचा छंद होता आणि गणिताखेरीज सर्व विषय आवडीचे होते. मामांमुळे त्यांना बाह्य जगाची ओळख झाली.
न्यायाचा लढा-
वसंतरावांनी बी.ए.नंतर मुंबई व पुणे येथे कायद्याचा अभ्यास करून पुण्यातून वकिलीची सनद मिळवली. ते म्हणतात, “माझी स्मरणशक्ती चांगली आणि परीक्षकाला पसंत पडेल अशा रितीने प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची कला मला साधली होती.”
ते कोर्टात अपिलाची कामे करू लागले. त्यासाठी मोडी लेखनाचे इंग्रजीत भाषांतर करावे लागे. म्हणून मामांकडून मोडी शिकले. त्यांनी २६ वर्षे न्यायखात्यात नोकरी केली. त्यासाठी त्यांना जळगाव, पिंपळगाव, जुन्नर, वडगाव इत्यादी ठिकाणी राहावे लागले. न्यायाधीशाचे काम कसे करावे, हे जळगाव व जुन्नर येथे शिकले. ‘लहान-सहान गोष्टींत आनंद घेणे ही दैनंदिन जीवनातली सुखाची गुरुकिल्ली आहे, हे पिंपळगावच्या मुक्कामात शिकलो,’ असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी ‘Indian Limitation Act’ वर पुस्तिका लिहिली.
१४ नोव्हेंबर, १९२९ मध्ये वकिलांचे व न्यायाधीशांचे पहिले संमेलन झाले. त्यात त्यांनी ‘The Civil Court Fees Act’ ची पुस्तिका छापून वाटली. त्यामुळे मोठे वादळ उठले. परंतु २० मार्च, १९३१ला सुनावणी होऊन पुस्तिकेला शोभेल असा निकाल झाला. बार कौन्सिल खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. या खात्यातून २७ डिसेंबर, १९५७ रोजी देसाई सेवानिवृत्त झाले. त्या प्रसंगी न्यायमूर्ती व्ही.ए.नाईक म्हणाले, “बढत्या मिळवण्याच्या स्पर्धेपासून देसाई हे नेहमी दूर राहिले. ते असिस्टन्ट जज का झाले नाहीत, याचे मला आश्चर्य वाटते.” १९५३ साली त्यांनी ‘ The Kolhapur Inam Law’ लिहून कोल्हापूरच्या इनामी कायद्यांचा ऊहापोह केला. त्याला न्यायमूर्ती गजेंद्रगडकरांनी प्रस्तावना लिहिली. न्यायमूर्ती नाणावटी हे देसाईंचे एकमेव आदर्श होते.
“साहित्य, संगीत, रंगभूमी आणि आकाशवाणी यांच्याबरोबर न्यायमंदिराशी निकटचा संबंध जडल्यामुळे माझ्या अनुभवांना इंद्रधनुष्याची काहीशी छटा प्राप्त झाली आहे.” असे यथार्थ उद्गार त्यांनी आपल्या आत्मचरित्रात काढले आहेत.
रंगभूमीचा चालताबोलता कोश-
ते कीर्तने ऐकत असत. ‘दासगणूंचे कीर्तन’ म्हणजे मूर्तिमंत तन्मयता आणि भक्तिभाव, असे त्यांना वाटे ‘तुकाराम’ नाटक पाहून संगीतामुळे नाटकाची रंजकता वाढते, असे त्यांचे मत झाले.
नाटककार, समीक्षक, कादंबरीकार, चरित्रलेखक इत्यादी साहित्याच्या प्रांतांत त्यांनी भरीव कामगिरी केली असून त्यांना मराठी रंगभूमीचा चालताबोलता कोशच म्हटले जाई.
नाटक कसे असते, त्यातले देखावे कसे असतात, पुरुषाची स्त्रीभूमिका कशी असते, या प्रश्नांची उत्तरे त्यांना गडकर्यांचे ‘पुण्यप्रभाव’ नाटक पाहून मिळाली, तर ‘एकच प्याला’ नाटक वाचून नाटककाराच्या लेखणीच्या सामर्थ्याचा साक्षात्कार त्यांना झाला. यातूनच नाटकांचे वाचन सुरू झाले. ‘पुण्यप्रभावा’तील नानासाहेब फाटकांची वृंदावनची भूमिका म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक अविस्मरणीय भूमिका होती, असे त्यांचे मत होते.
१९२७ मध्ये देसाईंनी ‘श्री’ व ‘कीचकवध’ ह्या नाटकांवर परीक्षण लिहिले. त्याच वर्षी बालगंधर्वांनी त्यांना म्हटले, “देवा, तसं नाटक तुम्ही आम्हांला लिहून दिलं पाहिजे. तुम्ही चांगलं नाटक लिहाल, असा माझा विश्वास आहे.” ‘विधिलिखित’ नाटक लिहून देसाई हे गंधर्व मंडळीचे नाटककार झाले. वकील वर्गाने या नाटकाबद्दल देसाईंचे अभिनंदन केले. देसाई लिहितात, “बालगंधर्वांच्या एका लहरीमुळे माझे नाटक त्यांच्या रंगभूमीवर येऊन माझ्यावर जो प्रकाश पडला, त्याचा मला जन्मभर उपयोग झाला. “माझे नाटक रंगभूमीवर आल्यानंतर खाडीलकर हे किती मोठे नाटककार आहेत, ते मला समजले.”
देसाईंनी गंधर्व मंडळीला दिलेले दुसरे नाटक ‘अमृतसिद्धी’ (१९३३). रंगभूमीशी झालेली त्यांची समरसता किती उत्कट होती, याचा परिचय त्यांच्या पुढील अवतरणात स्पष्ट जाणवतो. “माझ्या विचारांचा आणि भावनांचा पिंड जणू काय मराठी रंगभूमीच्या कुशीत वाढला होता. तिच्या मध्यस्तीनेच गायनाभिनयाच्या कलेचा, मराठीतील उत्तम साहित्याचा, मानवी जीवनातील मूल्यांचा आणि माझा दाट परिचय झाला होता. गंधर्व मंडळीचे विसर्जन झाले, त्या वेळी माझ्या जीवनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाल्यासारखे वाटते.” म्हणूनच ‘सुख हे गावाच्या विस्तारावर किंवा सुखसोयींवर अवलंबून नसून मोकळ्या मनाच्या आणि आनंदी वृत्तीच्या माणसांच्या सहवासावर अवलंबून असते’ हे त्यांचे म्हणणे सहज पटते.
१ मे १९२८ रोजी वसंत देसाईंचा विवाह मालवणच्या डॉक्टर आजगावकरांच्या कन्येशी झाला.
कलावंतांच्या कलेसंबंधी आणि स्वभावासंबंधी लेखन मराठी साहित्यात त्यांच्यापूर्वी क्वचितच केले गेले. हिराबाई बडोदेकरांसाठी त्यांनी अनेक पदे केली व ती सर्व ध्वनिमुद्रित झाली. त्यांपैकी ‘उपवनि गात कोकिला’, ‘हितगुज मनीचे’, ‘धन्य जन्म जाहला’, ‘ही कोण मधुरानना’ वगैरे पदे नाटकातल्या इतकीच लोकप्रिय झाली. ‘शिवनेरीच्या शिवराया’ हे पद १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिवशी शिवनेरीवरच्याच अविस्मरणीय समारंभात लक्ष दीड लक्ष श्रोत्यांसमोर हिराबाईंनी गायले.
देसाईंनी टोपणनावाने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धकाळात ‘विविधवृत्ता’त अनेक लेख लिहिले. पुणे आकाशवाणीवरून अनेक भाषणे, श्रुतिका लेखन-दिग्दर्शन केले, रंगभूमीवरील स्थित्यंतरे दाखवणारा कार्यक्रम रचला, नाटककार देवलांच्या जन्मशताब्दी महोत्सवासाठी कार्यक्रम तयार केला (१८-११-१९५५). गडकर्यांच्या पुण्यतिथीला ‘एकच प्याला’वर आधारित नभोनाटिका सादर केली. (२३-१-१९५६) खाडीलकरांच्या पुण्यतिथीप्रसंगी ‘स्वगते आणि संगीत’ यांचे कलात्मक आणि रसपूर्ण मिश्रण करून सादर केले. (३०-८-१९५६) केले. कविवर्य बोरकरांच्या ‘संजीवनी’ नामक संगीतिकेचे दिग्दर्शन (१३-१-१९५६). १९५८ ते १९६१ या काळात केसरीच्या ‘स्वैरसंचार’ या सदरात लेखन करून त्यांनी बालगंधर्व (१९५९) व विन्स्टन चर्चिल (१९६१) यांचे चरित्र लिहिले.
देसाईंची साहित्य संपदा पुढीलप्रमाणे आहे- ‘कुलीन स्त्रिया आणि रंगभूमी’ (१९३४), ‘कलेचे कटाक्ष’ (१९४५), मखमलीचा पडदा (१९४७), ‘नट, नाटक आणि नाटककार’ (१९५६), ‘विद्याहरणाचे अंतरंग’ (१९४९), ‘खाडीलकरांची नाट्यसृष्टी’ (१९७२), ‘किर्लोस्कर आणि देवल’, (१९७५), ‘गडकर्यांची नाट्यसृष्टी’ (१९८२), ‘रागरंग’ (१९६०) बर्लिनच्या बातम्या (कादंबरी). ‘विश्रब्ध शारदा’ खंड दुसरा- संगीत विभाग (संपादकीय टिपणे).