Skip to main content
x

देशमुख, अनंत प्रभाकर

     अनंत प्रभाकर देशमुख यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बागदांडे इथे झाला. रत्नागिरीच्या आर. पी. गोगटे महाविद्यालयामधून, अलिबागच्या जे.एस.एम. महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण (१९६९), मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातून एम.ए. (१९७२) केले. पीएच.डी.साठी (१९७८) ‘कुसुमावती देशपांडे यांच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास’ हा प्रबंधाचा विषय होता. प्रा.डॉ.व.दि.कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

मराठी नाटकाचा आणि रंगभूमीचा मूलारंभाचा शोध घेण्यासाठी संशोधनात्मक लेखन केले. १७७० ते १८४० दरम्यानचे ‘द बॉम्बे अ‍ॅमॅच्यूअर्स थिएटर’ हे आपले प्रेरणा केंद्र, आणि एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई व डेक्कन महाविद्यालय, पुणे येथील इंग्रजी, संस्कृत नाटकांच्या व नाट्यतंत्रांच्या अभ्यासातून आपल्याला नाट्यलेखनाची प्रेरणा मिळाली, ही जाणीव होऊन तत्कालीन नाटकासंबंधीचे, रंगभूमीसंबंधीचे त्यांचे लेखन ‘नाट्यविचार’ (१९८८) ह्या ग्रंथात ग्रथित झाले आहे. राम गणेश गडकर्‍यांच्या प्रमेयात्मक व प्रहसनात्मक प्रतिभाधर्माचे स्वरूप लक्षात घेऊन ‘गडकरी: पुनर्विचार’ हे दीर्घलेखन केले. ‘संगीत सौभद्र’मध्ये इंग्रजी धर्तीच्या रसांबरोबर भारतीय नाट्यपरंपरांचे संकेत दिसत असतानाच लोकनाट्याचे काही रंग त्यात मिसळले आहेत, हे ‘संगीत सौभद्र: एक दर्शन’मध्ये दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ‘नवनाट्य विचार’ (१९९२) ह्या ग्रंथात मराठीतील भाषांतरित व रूपांतरित नाटकांचा आलेख त्यांनी काढला आहे तर ‘निळावंती: वग आणि नाटक’, ‘माता द्रौपदी आणि चक्र’, ‘नटसम्राट’ , ‘तनमाजोरी’ अशा भिन्न-भिन्न नाट्यकृतींचा बारकाईने अभ्यास केला आहे. ‘कुसुमाग्रज/शिरवाडकर’ (१९९८) ह्या ग्रंथात वि.वा. शिरवाडकरांच्या वेगवेगळ्या साहित्यकृतींसंबंधी व त्यांच्या प्रकृतिधर्माविषयी चाकोरीबाहेरील विचार मांडला आहे. कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहातील कवितांसंबंधीचे त्यांचे संशोधन व समीक्षालेखन ‘विशाखाभोवती’ या पुस्तकात प्रकाशित झाले आहे (२००२). ‘संधिकाल’ (२००५) ह्या ग्रंथात एकोणिसाव्या शतकातील सामाजिक-सांस्कृतिक जीवन व मराठी वाङ्मय यांचा परस्परसंबंध त्यांनी स्पष्ट केला आहे.

मिसेस फेरार या बाईने १८३८ साली लिहिलेले ‘यात्रेकर्‍याचा वृत्तांत’ हे मराठीतील पहिले कादंबरीसदृश लेखन असल्याचे त्यांचे मत असून विचक्षण वाचकांना ते पारखून घेता यावे म्हणून त्यांनी ते संपादित केले आहे (२००५). ‘सत्यकथा’ पर्वातील एक कथाकार व कवी आ.ना. पेडणेकर यांच्या कवितांचे संपादन ‘आ.ना. पेडणेकरांची कविता’ या शीर्षकाने त्यांनी केले आहे.

संतती नियमनाचे पहिले पुरस्कर्ते र.धों.कर्वे यांच्यासंबंधीचा प्रकल्प त्यांनी पूर्ण केला असून तो नजीकच्या काळात प्रकाशित होत आहे. त्यात ‘समाजस्वास्थ्यकार’ हे रघुनाथरावांचे नव्या माहितीच्या प्रकाशात लिहिलेले चरित्र, ‘असंग्रहित र.धों.कर्वे’ यात समाजस्वास्थ्य मासिकाबाहेर अन्य नियतकालिकांत रघुनाथरावांनी केलेले लेखन, ‘बुद्धीप्रामाण्यवाद’ हा रघुनाथरावांच्या इंग्रजी लेखांचा मधुकर तोरडमल यांनी केलेला अनुवाद, ‘गाय द मोपांसा’ यांच्या कथांचा रघुनाथरावांनी केलेला भावानुवाद, ‘शारदेची निवडक पत्रे’ व ‘समाजस्वास्थ्यातील निवडक लेख’ हे रघुनाथरावांचे लेख, ‘र.धों.कर्वे: मते आणि मतांतरे’ हे रघुनाथरावांवर अन्य लेखकांनी केलेले लेखन, रघुनाथरावांना लेखन-सहकार्य करणार्‍या भास्करराव जाधव, माधवराव बागल, दुर्गा भागवत, सहृद, महाड इत्यादी लेखकांचे विविध विषयांवरील लेख ‘शेष समाजस्वास्थ्य’ या नावाने अशी एकूण ७ संपादित पुस्तके, र.धों.कर्वे यांच्यावरच्या अभ्यासाला चालना देणारी ठरावीत.

त्यांनी ‘गंगाधर गाडगीळ:व्यक्ती आणि सृष्टी’ (संपादक: डॉ. प्रभा गणोरकर), ‘वसंत कानेटकरांची नाटके’ (संपादक: डॉ. वृंदा भार्गवे), ‘रंगयात्रा’ (संपादक: डॉ.वि.भा.देशपांडे), वसंत सबनीस गौरव ग्रंथ ‘जमलेली पाने’ (संपादक: डॉ.शुभा शेळके), ‘वाङ्मयाचे आकलन’ (संपादक: डॉ.द.दि.पुंडे व डॉ.वा.पु.गिंडे), ‘एस.एल.भैरप्पा यांच्या कादंबर्‍या’ (डॉ.मृणालिनी शहा), ‘कादंबरी रसास्वाद यात्रा’ (संपादक: डॉ.विजया राजाध्यक्ष, २००८) इत्यादी ग्रंथांमध्ये लेखन केले आहे.

‘आलोचना’, ‘ललित’, ‘साहित्य’ व ‘धर्मभास्कर’ या मासिकांमधून त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. ‘सत्यकाम’ व ‘लक्षवेधी पुस्तके’ (ललित), ‘व्यक्तिरंग’ (नवशक्ती), ‘उत्खनन’ (सकाळ) असे त्यांनी सदर-लेखनही केलेले आहे. ‘उत्खनन’ हे एकोणिसाव्या शतकातील सामाजिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन व्यक्ति-प्रवृत्ती-घडामोडींचा वेध घेणारे संशोधनपर लेखन होते. तर ‘मुक्तछंद’ हे सामनामधील सदर-लेखन (आता त्याचे पुस्तक झाले आहे, २००८) ललित गद्यात्म स्वरूपाचे आहे. ‘श्रीधर बळवंत टिळक: चरित्र आणि लेखसंग्रह’ हे लोकमान्य टिळकांच्या दुसर्‍या चिरंजीवांचे चरित्र (२००८) प्रकाशित झाले आहे.

२००५ चा रायगड जिल्हा परिषदेचा राजा राजवाडे पुरस्कार, २००६ चा ठाणे महानगरपालिकेचा जनकवी पी.सावळाराम पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. 

- सुखदा कोरडे

देशमुख, अनंत प्रभाकर