Skip to main content
x

देशमुख, वसंत आनंद

        संत आनंद देशमुख यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण दिग्रस, पांढरकवडा (जि. यवतमाळ) आणि मूर्तिजापूर (जि. अकोला) या ठिकाणी झाले. त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी पितृछत्र हरपल्यामुळे शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अकोला आणि नागपूर येथे झाले. त्यांनी १९६०मध्ये अकोला कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. त्यानंतर १९६३ मध्ये नागपूर कृषी महाविद्यालयातून कृषि-रसायनशास्त्रामध्ये एम.एस्सी. पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. त्यानंतर १९६९मध्ये त्यांनी पंतनगर येथील कृषी विद्यापीठात विख्यात शास्त्रज्ञ डॉ. जे.जे. श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी प्राप्त केली आणि नागपूर, कोल्हापूर व चंद्रपूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी डॉ. पं.दे.कृ.वि.मध्ये साहाय्यक प्राध्यापक व उपकुलसचिव म्हणून काम केले. त्यांनी नत्र व स्फुरद खतांची उपयुक्तता वाढवण्याच्या दृष्टीने काम केले. महाराष्ट्रातून डॉ. देशमुख यांची एकमेव निवड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन न्यूट्रिशनच्या अभ्यासक्रमासाठी झाली व त्यांनी हा अभ्यासक्रम प्रावीण्याने पूर्ण केला. त्यांनी लिहिलेले ‘मृदाशास्त्र’ हे पुस्तक महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ यांच्यामार्फत प्रकाशित झाले.

        डॉ. देशमुख यांचा पिंड संशोधन करण्याचा असल्यामुळे त्यांनी कृषि-रसायनशास्त्रामध्ये विविध प्रयोग करून संशोधक म्हणून नाव कमावले. त्यांनी भातपिकावर तीन वर्षे संशोधन केले आणि युरिआ खताचे नुकसान होऊ नये; म्हणून युरिआ खताचा निंबोळीच्या ढेपेचे आवरण लावून वापर केल्यास नाइट्रीकरणाची प्रक्रिया नियंत्रित होते व त्यामुळे पिकाला नत्राचा पुरवठा जास्त दिवस मिळतो, असे दाखवून दिले.

        डॉ. देशमुख यांनी स्फुरद खताच्या उपलब्धतेचा अभ्यास करून हे दाखवले की, चिकणमातीयुक्त, गाळयुक्त व वाळूयुक्त जमिनीमध्ये स्फुरदाचे स्थिरीकरण (फिक्सेशन) अनुक्रमे जास्त, मध्यम व कमी प्रमाणात होते. जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण जसजसे वाढेल तसतसे स्फुरदाचे स्थिरीकरण वाढत जाते व २-४ डी, अ‍ॅट्राझिन आणि ट्रायक्लोरो अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड या तिन्ही तणनाशकांमुळे जमिनीतील अतिसूक्ष्म जिवाणू व बुरशी यांच्यावर विपरीत परिणाम दिसून येतो व त्यांची संख्या कमी होते. बीएचसी या कीटकनाशकामुळे मृदातील अमोनीकरण आणि नायट्रीकरण यावर कीटकनाशक वापरल्यापासून २० दिवसांत विपरीत परिणाम होत नाही. कीटकनाशकामुळे पहिल्या २० दिवसांत अमोनीकरण प्रक्रिया वाढते व नायट्रीकरण प्रक्रिया मंद होते. त्यामुळेच ज्वारीच्या पिकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची प्रक्रिया ठळकपणे दिसून येते. अमोनियम पॉलीफॉस्फेट या खताची प्रचलित स्फुरद खतापेक्षा ज्वारी आणि मूग या पिकांसाठी उपयुक्तता वाढत जाते. मुगानंतर दुसऱ्या ऋतूमध्ये जर गहू घेतला, तर अमोनियम पॉलीफॉस्फेटमुळे स्फुरदाचा परिणाम उत्तम ठरतो. चुनखडीयुक्त मृदांच्या सान्निध्यात अमोनियाचे बाष्पीकरण होऊन नत्राची बचत होते.

        - डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव

देशमुख, वसंत आनंद