Skip to main content
x

देशपांडे, अच्युत नारायण

     अच्युत नारायण देशपांडे यांचा जन्म विदर्भातील चांदूर तालुक्यातील कळाशी येथे झाला.  त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण प्रथम मोर्शी व नंतर अमरावतीला झाले. १९४० साली नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामधून भाषा विषयातून (सर्व भाषांच्या विद्यार्थ्यांमधून) प्रथम श्रेणीत, प्रथम आले. दोन सुवर्णपदकांचे ते मानकरी ठरले.

१९४१साली त्यांचा विवाह झाला. अमरावतीच्या हिंदू हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून ते रुजू झाले. १९४२साली खानदेशातील जळगावला प्रायमरी ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षक म्हणून लागले. १९४४ मध्ये खासगीरीत्या नागपूर विद्यापीठाच्या एम.ए. परीक्षेत सुवर्णपदकाचे मानकरी ठरून धवल यश प्राप्त केले. १९४५ साली नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले.

१९५० सालापासून मराठी भाषेच्या वाङ्मयेतिहासाचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला व १९८८पर्यंत ७ खंडांचे हे प्रचंड कार्य अथक परिश्रमातून पूर्णत्वास नेले. त्यांच्या वाङ्मयेतिहासात ग्रंथ व ग्रंथकार यांच्याविषयी भरपूर माहिती, उपलब्ध झालेले प्रत्येक पुस्तक चाळून त्यासंबंधी मतप्रदर्शन, सूची यांमुळे त्यांनी लिहिलेले वाङ्मयेतिहासाचे खंड अभ्यासकांना उपयुक्त ठरले आहेत. त्यांचा कल अध्यात्माकडे होता. भारतीय संस्कृतीतील अध्यात्माचे महत्त्व ते जाणून होते. संतकार्याबद्दल त्यांना आदरभाव होता व त्याचे मूर्त प्रतिबिंब त्यांच्या वाङ्मयेतिहासात आपणास पाहावयास मिळते.

युगकर्त्या लेखकांविषयी व उत्कृष्ट वाङ्मयाविषयी चिकित्सक मर्मदृष्टीही त्यांच्यापाशी होती. आधुनिक काळातील बा.सी.मर्ढेकर व विभावरी शिरूरकर यांच्या वाङ्मयाचे त्यांनी केलेले परिशीलन त्याची साक्ष पटविते.

‘केशवसुत नवे दर्शन’, ‘प्लेटोचे साहित्यशास्त्र’, ‘मराठी संत’, ‘महानुभव संतांची सामाजिक आणि वाङ्मयीन कामगिरी’, ‘विदर्भाचे मानकरी’, ‘नवे मनाचे श्लोक’, ‘अवतार मेहेरबाबा’ ही त्यांची स्वतंत्र निर्मिती होय.

‘चिपळूणकर दर्शन’, ‘साहित्यातील विवेक- वा.म. जोशी’, ‘प्रमेयाची उद्याने’, ‘विनोबांची साहित्यदृष्टी’, ‘ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा’, ‘प्राचीन मराठी वाङ्मयकोश’; ‘डॉ.शं.दा. पेंडसे गौरवग्रंथ’, ‘हरिश्चंद्राख्यान’ इत्यादी अकरा ग्रंथ संपादित केले. याव्यतिरिक्त अनेक ग्रंथांना प्रस्तावना, वृत्तपत्रे व नियतकालिके यांंमधून विपुल स्फुटलेखन प्रसिद्ध झाले आहे.

साहित्याची सेवा करणारी ही व्यक्ती साध्या राहणीने आयुष्यभर कार्यरत राहिली. नागपूर विद्यापीठाने आचार्य पदवी देऊन त्यांना गौरविले. संपूर्ण मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा पाच हजार पृष्ठांचा भव्य प्रकल्प सिद्धीस नेणारे वाङ्मयेतिहासकार, रसज्ञ, मर्मज्ञ, जीवनवादी समीक्षक, सत्त्वशील, सौजन्यशील, प्रसन्नवृत्तीचे, खेळकर शैलीचे आदर्श प्राध्यापक, ज्ञानेश्वरीचे रसाळ प्रवचनकार, प्रभावी वक्ते, निर्भीड विचारवंत असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. 

- संध्या टेंबे

देशपांडे, अच्युत नारायण