Skip to main content
x

देशपांडे, बळवंत आर.

           ळवंत आर. देशपांडे यांचा जन्म धारवाड येथे झाला. तेथेच त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यांनी १९५१ मध्ये मुंबई पशुवैद्यकीय  महाविद्यालयातून बी.एस्सी. (व्हेट.) पदवी, तसेच १९६३ मध्ये एम.व्ही.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यांनी १९६५ मध्ये एफ.आर.व्ही.सी.एस. पदवी आणि १९७० मध्ये मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली. डॉ. देशपांडे यांच्या व्यावसायिक सेवेची सुरुवात १९५३ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत ग्राम केंद्र योजनेमध्ये रुजू झाल्यापासून झाली. मुंबई पशुवैद्यकीय  महाविद्यालयातील प्रख्यात प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली गुरांमधील वांझपणाविषयक अभ्यास योजनेमध्ये १९५८मध्ये ते साहाय्यक संशोधक म्हणून रुजू झाले. नंतर १९७२मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशु-प्रजननशास्त्राचे प्राध्यापक आणि १९७३मध्ये विभागप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. या महाविद्यालयातील कार्यकालात त्यांनी एम.एस्सी.च्या आणि पीएच.डी.च्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. देशपांडे यांनी विविध समित्यांवर आणि निरनिराळ्या कृषी विद्यापीठांच्या परीक्षा मंडळांवर काम केले. पाळीव प्राण्यांच्या माद्यांमधील गर्भधारणा आणि वांझपणाविषयी-प्रामुख्याने माजावर न येणाऱ्या आणि वारंवार माजाची लक्षणे दाखवणाऱ्या गायी-म्हशींविषयी त्यांनी केलेल्या संशोधनाला देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांची मान्यता मिळाली. वळू, रेडे, बोकड व नरमेंढे यांचे वीर्य गोठवण्याचे त्यांचे यशस्वी कार्य निश्‍चितच नोंद घेण्याजोगे होते. त्यामुळे पुढील काळात कृत्रिम रेतन पद्धतीत आमूलाग्र बदल झाला, खर्चातही बचत झाली.

           डॉ. देशपांडे यांचे ७६ संशोधनपर लेख वेगवेगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. धुळे येथील रेमण्ड मेष विकास व संशोधन प्रकल्पांमध्ये डॉ. देशपांडे यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे बीजांडाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात यश मिळाले आणि मेंढ्यांमध्ये अनुवंशिक सुधारणा करणे शक्य झाले. डॉ. देशपांडे पशुप्रजनन अभ्यासकांच्या भारतीय संघटनेचे (इंंडियन सोसायटी फॉर दी स्टडी ऑफ अ‍ॅनिमल रिप्रॉडक्शन-आय.एस.एस.ए.आर.) संस्थापक-सदस्य  होते. त्यांनी सदर संघटनेच्या निरनिराळ्या कार्यांमध्ये आणि उपविभागांमध्ये समन्वय साधण्याची आणि सुधारणा करण्याची महत्त्वाची कामगिरी पार पाडली. त्यांनी १९७३ मध्ये प्रकाशकपदाची जबाबदारी स्वीकारून संघटनेचे मुखपत्र सुरू केले. त्यांनी १९८० ते १९८४ या काळात संघटनेचे मानद सचिव आणि १९८४ ते १९८७ या काळात अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी १९८५ मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशुप्रजननविषयक पहिली आशियायी परिषद आयोजित करण्यासाठी आणि ती यशस्वी करण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले.

- संपादित

देशपांडे, बळवंत आर.