Skip to main content
x

देव, कृष्ण

     डॉ. कृष्ण देव हे भारतातील अग्रगण्य पुरातत्त्ववेत्ता आणि प्राच्यविद्या विशारद म्हणून ओळखले जातात. डॉ. देव ऑर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे महासंचालक जनरल म्हणून निवृत्त झाले.

     डॉ. कृष्ण देव यांनी त्यांच्या उमेदवारीच्या काळामध्ये, १९३८ साली प्रख्यात पुरातत्त्ववेत्ते एन. जी. मुजुमदार यांच्या हाताखाली सिंध प्रांतामध्ये काम केले. तसेच सर ऑरेल स्टेन यांच्याबरोबर १९४०-४१मध्ये राजस्थान, बहावलपूर आणि बलुचिस्तान येथे काम केले आणि सर मॉर्टिमर व्हीलर यांच्याबरोबर १९४४ ते १९४७ या काळात काम केले. त्यानंतर डॉ. देव यांनी स्वतंत्रपणे उत्खनन व संशोधन करण्यास सुरुवात केली आणि नगर, अग्रेहा, काशीपूर, कुमराहर (पाटलीपुत्र) आणि वैशाली या ठिकाणी उत्खननाचे काम पार पाडले. तक्षशीला, अरिकामेडू आणि हरप्पा येथे सापडलेल्या मातीच्या भांड्यांच्या अवशेषांचे त्यांनी केलेले वर्गीकरण आणि त्यासंबंधीचा अहवाल हे त्यानंतरच्या संशोधकांसाठीही आदर्श मानले गेले.

    डॉ. कृष्ण देव यांनी उत्तर भारतातील मंदिरांचे परीक्षण करण्याची योजना हाती घेतली आणि त्यानुसार १९५६ ते १९६२ या काळामध्ये उत्तर भारतातील व मध्य भारतातील मंदिरांची पद्धतशीर नोंदणी व मापणी केली.

    नेपाळमधील धार्मिक चित्रे व शिल्पे यांची पाहणी करण्यासाठी भारत सरकारने डॉ. देव यांची नियुक्ती केली होती. ऑर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामधून निवृत्त झाल्यावर त्यांनी नेपाळ सरकारचे पुरातत्त्वविषयक सल्लागार म्हणून काम पाहिले.

    वाराणसी येथील ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अ‍ॅन्ड कल्चर’ या संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तसेच तेथीलच ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’ या संस्थेतर्फे सुरू असलेल्या भारतीय मंदिरांच्या विश्वकोशाच्या प्रकल्पाचे ते सल्लागार होते. डॉ. कृष्ण देव यांनी पुरातत्त्व विषयावर भरपूर लिखाण केले आहे. त्यांपैकी महत्त्वाची प्रकाशने : Vaishali Excavations 1956- वैशाली येथील उत्खनन- १९५६,  Temples of North India 1969- उत्तर भारतातील मंदिरे- १९६९,  Catalogue of Stone Sculpture in the Allahabad Museum 1997-  अलाहाबाद वस्तुसंग्रहालयातील शिल्पाकृतींची सूची- १९९७,  Temples of Khajuraho- 2 Vols 1990-खजुराहो येथील मंदिरे-दोन खंड- १९९०.डॉ. कृष्ण देव हे ‘जर्नल ऑफ द इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट’चे संपादक आहेत.

र. वि. नातू

देव, कृष्ण