डहाणूकर, शरदिनी अरुण
गोव्यात जन्मलेल्या शरदिनी पै-धुंगट यांचे शालेय शिक्षण मुंबई येथील सेंट कोलंबा विद्यालयात झाले. १९६२ साली माध्यमिक शालान्त परीक्षेत त्या जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्तीच्या मानकरी होत्या. एल्फिन्स्टन महाविद्यालयात इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शरदिनी डहाणूकरांनी सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि के.ई.एम. रुग्णालयातून एम.डी. व पीएच.डी. (औषधविज्ञानशास्त्र) या अत्युच्च पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर त्याच संस्थेत औषधविज्ञानशास्त्र विभागात तीस वर्षे अध्यापन व संशोधन केले. १९९५ साली त्यांनी विभागप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. विभागामध्ये मूलगामी बदल घडवून आणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर या विभागाला महत्त्व प्राप्त करून दिले. २००१ साली टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई यमुनाबाई एल. नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्री म्हणून त्यांची निवड झाली. त्याच पदावर कार्यरत असताना त्यांचे अकाली निधन झाले.
आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पदवीधर असलेल्या डॉ.डहाणूकरांची आयुर्वेदाशी तोंडओळख झाली, ती वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांच्यामुळे. पुढे स्वत:च्या कुटुंबीयांवर उपचार करताना त्यांना आधुनिक वैद्यकाच्या त्रुटी प्रकर्षाने जाणवल्या, तसेच आयुर्वेद उपचारपद्धतीचे उत्तम अनुभव आले. त्यामुळे त्या आधुनिक चिकित्सक वृत्तीने आयुर्वेदशास्त्राचा वेध घेऊ लागल्या. त्यासाठी त्यांनी वैद्य वेणीमाधवशास्त्री यांच्याकडे आयुर्वेदाचा सखोल अभ्यास केला. त्यांच्याबरोबर झालेल्या विचारमंथनातून त्यांना आयुर्वेदाच्या बलस्थानांची जाणीव होऊ लागली. ही बलस्थाने प्राय: आयुर्वेदाची मूलतत्त्वे व संकल्पना आहेत हे लक्षात येताच त्यांनी ती आधुनिक विज्ञानाची परिभाषा वापरून सर्वमान्य शास्त्रीय कसोट्यांवर त्यांची चिकित्सा करून दाखवण्याचे प्रयत्न सुरू केले. आयुर्वेदाला पुरावाधिष्ठित शास्त्र म्हणून स्वदेशी व परदेशी मान्यता मिळवून देणे हेच त्यांनी आपले जीवितकार्य मानले.
त्यांच्या संशोधनाचे वेगळेपण म्हणजे आपल्या पूर्वसुरींप्रमाणे आयुर्वेदातील औषधी वनस्पतींच्या अर्काचे पृथक्करण करत एकाच घटकावर लक्ष केंद्रित न करता, त्यांनी आयुर्वेदीय संस्कार झालेली औषधे, आयुर्वेदिक तत्त्वे वापरून प्रयोगात वापरली. अशा अनेक सम्यक औषधींचे गुणधर्म त्यांनी आयुर्वेदात मांडलेल्या गुणधर्मांशी पडताळून पाहिले. उदाहरणार्थ, दम्यासाठी पिंपळी किंवा यकृतविकारासाठी कात. हे प्रयोग करताना त्यांनी आयुर्वेदातील ‘रसायन’ संकल्पनेवर अधिक भर देऊन रसायन द्रव्यौषधी या प्रामुख्याने रोगप्रतिकारक शक्तींचे संवर्धन करून मेंदू-प्रतिकारशक्ती-अवयवकार्य त्या साखळीद्वारे वेगवेगळ्या अवयवांना व शरीरसंस्थांना बळ प्राप्त करून देतात असा सिद्धान्त प्रथमच मांडला. त्यासाठी गुळवेल, आवळा, हिरडा, पिंपळी, अश्वगंधा, शतावरी अशा सहा रसायनांना निवडून त्यांचे पेशी व विविध प्राण्यांवर होणारे परिणाम शोधले. या प्रयोगाच्या निष्कर्षांनुसार गुळवेल या औषधीची त्यांनी निवड केली. त्यापुढची पायरी म्हणजे रुग्णांवर गुळवेलीची चाचणी करणे. जठरांत्र शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांच्या सहकार्याने त्यांनी अवरोधक काविळीचे रुग्ण, उरोऔषधतज्ज्ञ डॉ. महाशूर यांच्यासोबत क्षयरोगी व कर्करोगतज्ज्ञ डॉ. राजन बडवे यांच्या सहकार्याने कर्कविरोधी औषधे घेणारे रुग्ण यांच्यावर गुळवेलीच्या चाचण्या घेतल्या. या सर्व संशोधनाचा परिपाक म्हणजे गुळवेल ही एक उत्कृष्ट प्रतिकारशक्तिसंवर्धक (इम्युनोस्टिम्युलेटर) आहे हे सिद्ध झाले.
अत्यंत प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये आयुर्वेद व त्यातील वनस्पतींच्या गुणधर्मांबद्दल झालेल्या संशोधनास प्रसिद्धी मिळाली. या संशोधनास अगुस्तीनी त्रापानी हा इटलीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पुण्याच्या भारतीय चिकित्सा संस्थानचे सुवर्णपदक, भारतीय चिकित्सा राष्ट्रीय अकादमीची फेलोशिप व इतर अगणित पुरस्कार मिळून त्यांची यथोचित दखल घेतली गेली. मुख्य म्हणजे या संशोधनानंतर आधुनिक वैद्यकातील औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने प्रथमच गुळवेल हे आयुर्वेदिक औषध जनसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले.
डॉ. डहाणूकरांचे आयुर्वेदविषयक कार्य हे केवळ वनस्पतींच्या गुणधर्मांच्या शोधाबद्दल मर्यादित राहिले नाही. आयुर्वेदातील अनेक संकल्पनांचा उदा. प्रकृती, आम, भस्मनिर्मिती, पंचकर्म, स्वस्थवृत्त इत्यादींचा त्यांनी शास्त्रीय संशोधनाची जोड देऊन पाठपुरावा केला. त्यावर त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये सत्तरहून अधिक लेख लिहिले. प्रोफेसर वॅगनर या वनौषधितज्ज्ञाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात त्यांनी ‘आयुर्वेदीय रोगप्रतिकारसंवर्धक’ असा लेख लिहून आयुर्वेदातील प्रतिकारशक्तीबद्दलच्या संकल्पना व भारतातील अनेक संशोधकांनी त्यासंबंधी केलेले संशोधन याला जगप्रसिद्धी मिळवून दिली. अनेक आधुनिक विज्ञानांच्या संशोधकांना आयुर्वेदासंबंधी संशोधन करण्यास प्रेरित केले. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या भाषणांतून व लिखाणांतून आयुर्वेदाची तोंडओळख करून दिली. आयुर्वेद रिव्हिझिटेड व आयुर्वेद अनरॅव्हल्ड ही शास्त्रीय परिभाषेतील, तर जनसामान्यांवर स्वत:चे आरोग्यरक्षण स्वत: आयुर्वेदिक तत्त्वे समजावून घेऊन करावे म्हणून लिहिलेली सोप्या, सुगम भाषेतील वर्तमानपत्रीय सदरे व स्वास्थ्यवृत्त, तसेच ‘ए ड्रग इज बॉर्न’ ही पुस्तके त्याला साक्ष आहेत.
संशोधनात पुढील पिढीचे सातत्य कायम टिकावे म्हणून त्यांनी भारतातील पहिले आयुर्वेद संशोधन केंद्र, सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयासारख्या संस्थेत, १९८९ साली सुरू केले व नायर रुग्णालयात अधिष्ठात्रीचा पदभार स्वीकारताना आपल्या शिष्येकडे (डॉ. निर्मला रेगे) सुपूर्द केले. तसेच नायर या महापालिकेच्या रुग्णालयात आणखी एक आयुर्वेद संशोधन केंद्र सुरू केले, ज्याचे काम त्यांची शिष्या डॉ. ऊर्मिला थत्ते बघत आहेत.
आयुर्वेदाला अशास्त्रीय ठरवल्याबद्दल लंडनमध्ये लॉर्ड वॉल्टन यांच्या सिलेक्ट कमिटीपुढे आपले संशोधन मांडून कमिटीला आपला निर्णय बदलायला लावून डॉ.डहाणूकरांनी सर्व भारतीयांवर न फेडता येणारे उपकार करून ठेवले आहेत.
त्यांच्यातील संशोधकवृत्तीचा शोध घेतला, तर त्याचा उगम त्यांच्याकडे वारसाहक्काने आलेल्या निसर्गप्रेमात, त्या प्रेमाची जोपासना करणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांत व घरच्या सुजाण, संपन्न व अनुकुल वातावरणात दिसून येतो. निसर्ग, फुले, वृक्ष, पशुपक्षी, माणसे, खाद्यपदार्थ, देशविदेशांतील स्थळे यांना बघण्याची नजर, समजून घेण्याची संवेदना आणि शब्दरूप देण्याची शब्दकळा त्यांना अवगत होती. त्यांच्या लालित्यपूर्ण लिखाणाचा प्रत्यय ‘हिरवाई’, ‘फुलवा’, ‘वृक्षगान’, ‘मनस्मरणीचे मणी’, ‘पांचाळीची थाळी’, ‘सगेसोबती’, ‘नक्षत्रवृक्ष’, अशा अनेक पुस्तकांतून येतो. ही पुस्तके आजही शालेय मुलांपासून थोर समीक्षकांपर्यंत सर्वांनाच भावतात. त्यांपैकी काही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट साहित्याचे पुरस्कारही मिळाले आहेत.
उत्कृष्ट शिक्षक, दूरदृष्टी असणारी व्यवस्थापक, आदरणीय औषधविज्ञानशास्त्रज्ञ, चिकित्सक संशोधक, सर्वमान्य साहित्यिक, आतिथ्यशील गृहिणी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चराचरांमध्ये विलक्षण रस असलेली विलक्षण बुद्धीची व्यक्ती म्हणून त्यांची पुढील पिढ्यांना ओळख राहील.
—डॉ. रवी बापट