Skip to main content
x

पोवार, अशोक गणपत

      शोक गणपत पोवार यांचा जन्म मुंबईत दादरला झाला. दापोलीनजीकच्या भोंजाळी या खेड्यात व दापोलीत ते लहानाचे मोठे झाले. ते बारा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या मातोश्री पुष्पलता यांनी अतिशय कष्टाने कुटुंब सांभाळले. पोवार यांनी रद्दी विकून, गणपतीच्या कारखान्यात रंगकाम करून, स्वतः तयार केलेले आकाशकंदील विकून, काही काळ कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर मजुरी करून कुटुंबाच्या चरितार्थाला हातभार लावला. पोवार यांनी दापोली येथील अल्फ्रेड गॉडने हायस्कूलमधून शालान्त शिक्षण घेतल्यावर १९७१मध्ये कृषी महाविद्यालयातून पदवी घेतली. ते १९७२मध्ये कृषि-अधिकारी म्हणून याच महाविद्यालयात रुजू झाले. त्यांनी १९७९मध्ये अकोला येथील डॉ.पं.कृ.वि.तून बी.एस्सी. (कृषि-अभियांत्रिकी), १९८४मध्ये खरगपूर येथील आय.आय.टी.मधून एम.टेक. (कृषी) आणि १९९७मध्ये दापोलीच्या डॉ. बा.सा.को.कृ.वि.तून पीएच.डी. (कृषि-अभियांत्रिकी) या पदव्या संपादन केल्या. दरम्यान २३ फेब्रुवारी १९८१ रोजी दापोलीतीलच कृषी पदवीधर श्यामल झगडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

      पोवार १९७२पासून दापोली कृषी महाविद्यालयामध्ये कृषि-अधिकारी पदावर रुजू झाले. त्यांनी महाविद्यालयाच्या कृषि-अभियांत्रिकी विभागात विविध पदे भूषवली. दापोली येथे ३ जुलै १९९९मध्ये कृषि-अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाली. येथे त्यांनी पहिले सहयोगी अधिष्ठाता म्हणून सात वर्षे काम केले आणि त्यानंतर ते विस्तार शिक्षण संचालक म्हणून काम पाहत आहेत.

      डॉ. पोवार यांनी नूतन आंबा झेला, अमर बांडगुळ काढणी अवजार, चिकू, कोकम, काजू, बोरं, लिंबू अशा छोट्या देठाची फळे काढण्यासाठी अतुल फळे काढणी अवजार, अंकुर दातेरी फावडे अशी उपयुक्त अवजारे विकसित केली. त्यांनी विविध शैक्षणिक विषयांवर पाच पुस्तके लिहिली असून शेतकर्‍यांसाठी कृषी दैनंदिनी, पुस्तके, घडीपत्रिका अशा प्रकाशनांची निर्मिती केली आहे. त्यांचे ४५ शोधनिबंध, ७७ तांत्रिक लेख आणि ५३ मराठी लेख दर्जेदार नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी आकाशवाणीवरून १५ आणि दूरचित्रवाणीवरून १२ कार्यक्रम सादर केले.

      महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने गठित केलेल्या महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या विस्तार शिक्षण संचालकांच्या समन्वय समितीचे अध्यक्ष, भा.कृ.अ.प.ने गठित केलेल्या चतुर्वार्षिक आढावा समितीचे सदस्य, भारतीय कृषी अभियंता संस्थेचे उपाध्यक्ष आणि इंफाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य म्हणून डॉ. पोवार यांनी कार्य केले. कृषि-अभियांत्रिकी क्षेत्राच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि समर्पण भावनेमुळे त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवले आहे. डॉ. एम. एस. रंधावा पुरस्कार मिळवणारे ते भारतातील पहिले कृषि-अभियंता आहेत. भा.कृ.अ.प.च्या भारतीय कृषि-अभियंता संस्थेचे डॉ. के.एन. नाग सुवर्णपदक, कमंडेशन पुरस्कार, फेलो पुरस्कार,  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयर्सचा नामवंत अभियंता पुरस्कार, एशियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचा पिलर्स ऑफ इंडिया पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. याशिवाय त्यांना गुरुवर्य पुरस्कार, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे हरी मालिनी जोशी पारितोषिक इ. एकूण २१ पारितोषिकांनी गौरवण्यात आले आहे.मराठी रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना रसिकरंजन कला मंच, दापोली आणि सुप्रिया प्रॉडक्शन, मुंबई या संस्थेतर्फे पहिला स्व. सखाराम भावे स्मृती पुरस्कार प्रदान केला. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी स्व. सौ. श्यामल पोवार न्यासाची स्थापना केली आहे.

- डॉ. अशोक निर्बाण

पोवार, अशोक गणपत