Skip to main content
x

छत्रे, विनायक लक्ष्मण

​​​​​​​केरुनाना छत्रे

       विष्णुशास्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, सुधारकाग्रणी आगरकर यांचे  गुरु विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे यांचा जन्म अलिबाग तालुक्यातील नागाव येथे झाला. दुर्दैवाने आई-वडलांचे छत्र बालपणीच हरपल्यामुळे केरुनानांना शिक्षणासाठी कोकणातून मुंबईस, चुलत्याच्या आश्रयास यावे लागले. तेथे एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर व प्रो.आर्लिबार या व्यासंगी गुरूंच्या हाताखाली केरुनानांनी आधुनिक शिक्षणाचे धडे घेतले. गणितविद्येत त्यांचा एवढा लौकिक होण्याची पूर्वचिन्हे त्यांच्या विद्यार्थीदशेतच स्पष्ट दिसू लागली होती. विशेषत: गणित, खगोल व पदार्थविज्ञानासारख्या अवघड शास्त्रांत त्यांना पुढे जी विलक्षण गती प्राप्त झाली, त्याचा स्रोत आर्लिबारकडून घेतलेल्या मूलभूत ज्ञानात होता. नंतर मात्र त्या शिदोरीवर या विषयातील मूल ग्रंथांचा बारीकसारीक तपशिलांसह सर्वांगीण अभ्यास करून त्यांनी या शास्त्रावर प्रभुत्व मिळविले. लौकिक अर्थाने केरुनानांनी विद्यापीठाची (जे तेव्हा अस्तित्वात नव्हते) पदवी संपादन केलेली नव्हती, तरी पुढील आयुष्यात त्यांनी जी कर्तबगारी दाखविली, त्यावरून त्यांची असाधारण बुद्धिमत्ता दृग्गोचर होते.

     अंतरिक्षातील चमत्कारिक वाटणाऱ्या घटना व लोहचुंबक यांचे अनुभव घेण्यासाठी आर्लिबार यांनी १८४० साली मुंबईत कुलाबा येथे एक वेधशाळा सुरू केली. तेथे त्यांनी केरुनानांना ‘सहाय्यक’च्या जागी नेमले. अवघ्या सोळाव्या वर्षी दरमहा ५० रुपये पगारावर लागलेल्या या नोकरीत केरूनानांनी पुढील दहा वर्षे जागरूकपणे हवामानशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यामुळेच पुढील आयुष्यात कोणतेही शास्त्रीय तत्त्व प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध झाल्याशिवाय किंवा त्याच्या सत्यतेचा पडताळा घेतल्याशिवाय ते स्वीकारीत नसत.

     १८५१ मध्ये पुणे महाविद्यालयाच्या नॉर्मल स्कूल या विभागात केरोपंतांची सहाय्यक प्राध्यापकाच्या जागी नेमणूक झाली. तेथे ते गणित व सृष्टिशास्त्र हे विषय शिकवीत असत. पुढे नॉर्मल स्कूल, ज्यास तेव्हा ‘व्हर्न्याक्युलर कॉलेज’ म्हणजे पुढे ‘ट्रेनिंग कॉलेज’ म्हणत असत, ते पुणे महाविद्यालयापासून वेगळे झाल्यावर तेथे प्रथम ते अध्यापक व मग काही वर्षे मुख्य अधिक्षक होते. त्याला जोडून अभियांत्रिकी महाविद्यालयातसुद्धा काही काळ त्यांनी सृष्टिशास्त्रावर व्याख्याने दिली होती. दरम्यान, अहमदनगरच्या इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काही काळ काढल्यावर १८६५ सालापासून परत पुणे महाविद्यालयात, ज्यास पुढे ‘डेक्कन महाविद्यालय’ म्हणू लागले, तेथे ते गणित व सृष्टिशास्त्राचे प्राध्यापक झाले. नंतर अल्पकाळ ते हंगामी प्राचार्य म्हणूनही नियुक्त झाले होते. अशी जबाबदारीची पदे सांभाळताना देखील त्यांनी आपल्या अध्यापनात कधी कसूर केली नाही, की खंड पडू दिला नाही.

     टिळक-चिपळूणकर-आगरकर या केरुनानांच्या प्रख्यात विद्यार्थ्यांच्या चरित्रग्रंथांमध्ये व खुद्द आगरकरांनी केरूनानांवर लिहिलेल्या मृत्युलेखात व्यासंग, शिकवण्याची विलक्षण हातोटी, स्वभावातील कमालीचे सौजन्य, गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आधार देऊन प्रसंगी आर्थिक मदत करण्याची तत्परता, ह्या त्यांच्या विविध गुणांवरअधिक प्रकाश पडतो. एखाद्या विषयाच्या चिंतनात ते गढले म्हणजे त्यांना कशाचेच भान राहत नसे. याची प्रचिती म्हणजे एकदा एका कठीण उदाहरणाने त्यांना हैराण केले; त्या काळात त्यांना जेवण सुचेना की स्वस्थ झोप लागेना. अखेर पाच ते सहा दिवसांनी ते सुटले तेव्हा त्यांना झालेला अवर्णनीय आनंद सांगताना त्यांचा कंठ दाटून येत असे.

     मुलांना सहज कळेल, अशा रितीने गणित समजावताना आवश्यक तो शास्त्रीय संदर्भ ते पुरवीत असत. मुलांनी कितीही विचित्र प्रश्‍न विचारला तरी त्यांच्यावर न रागावता, हर प्रयत्नाने ते त्यांचे शंकानिरसन करीत असत. लहान-थोर असा भेदभाव न करता, ते सर्वांशी सारख्याच खेळीमेळीने व निगर्वीपणे वागत असत. विद्यार्थ्यांना केवळ शंकासमाधानासाठीच नव्हे, तर जेवणाखाण्यासाठी देखील त्यांच्याकडे मुक्तद्वार असे. अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी फी-पुस्तकांची मदत केलेली आहे. एकदा पहिल्या वर्षाच्या परीक्षेची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आगरकर एक नाटक लिहीत आहेत, असे केरुनानांच्या कानावर गेले. तेव्हा त्यांनी आगरकरांची फी भरून त्यांच्या हातातील नाटकलेखनाचे कागद काढून घेतले.

     केरुनानांनी शालेय पातळीवर, गणित व पदार्थविज्ञानावर सुबोध भाषेत क्रमिक पुस्तके लिहिली होती. अंकगणिताच्या पुस्तकात मूलभूत क्रियांबरोबर कर्जव्यवहार, रोखे, सुतार व गवंडी यांच्या कामाची आकारणी इत्यादीचे व्यावहारिक ज्ञान समाविष्ट केलेले असून सरावासाठी दिलेला उदाहरणसंग्रह मुलांसाठी मनोरंजक भाषेत रचलेला आहे, तर पदार्थविज्ञानाची सुरुवात करताना, मुलांच्या मनांत निसर्गाबद्दल कुतूहल निर्माण होईल अशा ललित शैलीत आपल्या आजूबाजूला सृष्टीत घडणारे व्यापार, निसर्ग-चमत्कार व पदार्थांचे गुणधर्म यांचे उत्तम प्रकारे वर्णन केले आहे. संवादरूपाने विषयाची मांडणी करून एकेक संकल्पना रंजक भाषेत विशद केलेली आहे. विशेष बाब म्हणजे, सोप्यासोप्या प्रयोगांसाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी व त्यांच्या किमतीसुद्धा परिशिष्टात दिलेल्या आढळतात.

     स्वभाषेत शास्त्रीय विषय सुलभपणे मांडून ज्ञानप्रसार करण्यासाठी १८४८ साली मुंबईत स्थापन झालेल्या ‘ज्ञानप्रसारक सभे’पुढे केरुनानांनी हवा, भरती-ओहोटी, कालज्ञान या विषयांवर निबंध वाचले. ‘हवे’वर तर एकूण १७ निबंध असून त्यांत आकृत्यांसह सृष्टीतील अनेक चमत्कारांचे चित्तवेधक वर्णन केलेले आहे.

     मुख्य म्हणजे अशा शास्त्रीय लेखनात परिभाषेसाठी केरुनानांची लेखणी कधी अडली नाही. उदाहरणार्थ, संवर्धन, स्नेहाकर्षण, केषाकर्षण, त्वरा, भरतीची समा, वातादिक दर्शक यंत्र, इत्यादी समर्पक, सुटसुटीत व अर्थवाही शब्द त्यांनी जागोजागी  योजलेले आहेत.

    जन्मतिथीवरून इंग्रजी तारीख वा तारखेवरून तिथी काढण्यासाठी ‘कालसाधनांची कोष्टके’, तर पंचांग तयार करण्यासाठी ‘ग्रहसाधनांची कोष्टके’, हे ग्रंथ त्यांनी लिहिले. मात्र ते लिहिताना आपल्याकडील ज्योतिष परिस्थितीस बाधा येणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. या ग्रंथावरून भारतीय युद्धाच्या वेळची ग्रहस्थिती व महाभारतात त्याच्याशी तंतोतंत जुळणारे वर्णन, याचा पडताळा एका अभ्यासकाने घेतला होता. श्रीक्षेत्र काशीतील भूस्थिरवाद्यांना उत्तर देण्यासाठी त्यांनी ‘कुभ्रम निर्णय’ पुस्तक लिहिले, तर ‘पृथ्वीवर पडणारा पाऊस व सूर्यावरील डाग’ यांवर केरुनानांनी सार्वजनिक सभेत निबंध वाचला होता.

     केरुनानांचा ऐन उमेदीचा काळ वेधशाळेत सूक्ष्मयंत्रांच्या सहवासात गेल्याने, पंचांगातील गणितातून ऋतुकाळ व आकाशस्थ ग्रहांचा दृकप्रत्यय येण्याबद्दल ते आग्रही होते. शिवाय धर्मकृत्य करण्यासाठी पंचांगात दाखवलेल्या वेळा निर्दोष असाव्यात म्हणून त्यांनी बडोद्याच्या आबासाहेब पटवर्धनांच्या मदतीने शुद्ध पटवर्धनी पंचांग काढले.

     केरूनाना प्रागतिक विचारसरणीचे होते. ते मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापक मंडळावर होते व स्रियांच्या सामाजिक सुधारणांस त्यांचा पाठिंबा होता, श्रीमती रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेने भरणाऱ्या स्रियांच्या साप्ताहिक सभेस नियमित हजर राहून ते स्त्रियांचे शिक्षण करीत असत. ते स्रियांना गृहजीवनोपयोगी शिक्षण द्यावे, अशा मताचे होते.

     शास्त्रीय विषयांत रमणाऱ्या केरुनानांचे व्यक्तिमत्त्व एकसुरी नव्हते, हे त्यांना असलेल्या शास्त्रीय संगीत व नाटकांची आवड यांवरून दिसून येते. इतकेच नव्हे, तर किर्लोस्कर मंडळींच्या नाटकांच्या तालमींना हजर राहून गायक नटांना, नाटकात गाण्याचा अतिरेक न करण्याचा ते सल्ला देत असत. त्यांच्या  या  गुणांवर लुब्ध होऊन कै. अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले ‘सौभद्र’ नाटक त्यांना अर्पण केलेले आढळते.

    ते दिवंगत झाल्यावर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने त्यांना ‘जर प्रो.छत्रे यांना युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळाले असते, तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते, यात मुळीच शंका नाही’, अशी श्रद्धांजली वाहिली होती.

- प्रा. स. पां. देशपांडे

छत्रे, विनायक लक्ष्मण