Skip to main content
x

दिक्षित, काशिनाथपंत ना.

      केंद्र सरकारच्या पुरातत्त्व खात्यात प्रशिक्षित विद्यार्थी म्हणून काशीनाथपंत दीक्षित रुजू झाले. मोहेंजोदारो उत्खननात त्यांचा सहभाग होता. कालांतराने त्यांची अधिकारी म्हणून नेमणूक झाली व १९३७-४४ मध्ये ते महासंचालक होते. त्यांनी सिंध प्रांतात सर्वेक्षण करून सिंधू संस्कृतीची काही स्थळे शोधून काढली होती. पुढे कोलकाताला अधीक्षक असताना त्यांनी पहारपूर (आता बंगलादेश) येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले. तेथील स्तूप आणि विहार व बौद्धकला यांवरचा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ते महानिदेशक असतानाचा काळ अत्यंत कठीण होता. कारण त्या वेळी दुसरे महायुद्ध सुरू होते. त्यामुळे त्यांच्या खात्यातील काही मंडळी युद्धावर गेली होती. शिवाय त्यांच्या खात्यावरचा खर्च खूप कमी केला होता. त्यामुळे संशोधन, उत्खनन आणि वास्तूंचे विशेष संवर्धन होणे अशक्य होते. तेव्हा टीकाकारांचे फावले आणि त्याचा परिणाम म्हणून त्यावेळी जगभर प्रसिद्ध असलेले पुरातत्त्व लिओनार्ड वूली यांची भारत सरकारने पुरातत्त्वतज्ज्ञ खात्याची चौकशी करण्यासाठी नेमणूक केली.

     टीकाकार तेच आणि चौकशी तेच करणार, तेव्हा वूली यांचा वृत्तान्त घणाघाती होता, पण आपले काम कुठल्याही प्रकारे कमी दर्जाचे नाही हे सिद्ध करण्यासाठी दीक्षितांनी त्या आधीच १९३८मध्ये उत्तर प्रदेशात अहिच्छत्रा येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू केले होते. त्याचा वृत्तान्तही त्यांनी सविस्तर प्रसिद्ध केला होता.  परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

     दीक्षितांचा बौद्ध कलेचा विशेष अभ्यास होता. त्यांनी मुंबईजवळील सोपारा उत्खननात सापडलेल्या मानुषी बुद्धांच्या मूर्तींचा योग्य तो कालनिर्णय केला. तो आजही विद्वन्मान्य आहे. त्या मूर्ती ८व्या-९व्या शतकांतील असून त्या पूर्व भारतातील पाल राजांच्या कारकिर्दीत तयार केल्या होत्या व तेथून त्या महाराष्ट्रात आणल्या होत्या, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले.

     त्यांची सारी कारकीर्द उत्तर आणि पूर्व भारतात गेल्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही.

डॉ. म. के. ढवळीकर

दिक्षित, काशिनाथपंत ना.