Skip to main content
x

दिवेकर, रंगराव रामराव

     रंगराव रामराव दिवेकर हे हुबळीचे माध्व वैष्णव ब्राह्मण समाजातील होत. बी.ए. झाल्यावर काही काळ हुबळीच्या कर्नाटक एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी  नोकरी केली. एम.ए. झाल्यावर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात ते इंग्रजीचे प्राध्यापक झाले. एल.एल.बी. होते तरी त्यांनी वकिली कधीच केली नाही. असहकार चळवळीत ते सुरुवातीपासूनच अग्रेसर होते. यासाठी १९२१ साली त्यांना पहिली शिक्षा झाली त्यानंतरही या कार्यासाठी ते अनेक वेळा तुरुंगात गेले. अत्यंत साधी राहणी, संग्रहक वृत्ती आणि कष्टाळू स्वभाव यामुळे यांना लोक ‘कर्नाटक गांधी’ असे म्हणत.

     कानडी, इंग्रजी, हिंदी व मराठी या भाषा त्यांना चांगल्या येत. त्यांनी कानडी भाषेची मनोभावे सेवा केली. ‘संयुक्त कर्नाटक’ या दैनिक पत्राच्या संस्थेची संस्थापना करून, तिचे ते  विश्वस्त झाले. त्या संस्थेतर्फे ‘कर्मवीर’ हे कानडी साप्ताहिकही निघत असे. त्यांचे कानडी भाषेतील लेखन अत्यंत लोकप्रिय आहे. राष्ट्रीय वृत्ती आणि भक्तिमार्गी आध्यात्मिकता या गोष्टींच्या यांच्या ग्रंथातील सुंदर मिलाफामुळे त्यांना लोकप्रियता लाभली. छोटी वाक्ये आणि ठसठसीत प्रतिपादन हा दिवेकरांच्या लेखनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. कानडी भाषेच्या विशेष सेवेमुळे यांना बल्लारी कर्नाटक साहित्य परिषदेचे अध्यक्षस्थान देण्यात आले होते. हे कर्नाटक-एकीकरण चळवळीचेही फार मोठे पुरस्कर्ते होते.

    त्यांनी लिहिलेले कानडी ग्रंथ असे आहेत. -१. हरिभक्तिसुधे, २. उपनिषद कथावली, ३. कर्मयोग, ४. उपनिषद्कथावली, ५. उपनिषद् प्रकाश, ६. अन्तरात्मनिगे, ७. गीतेय गुट्टु (गीतेचे मर्म), ८. भक्तिसूत्रगळु (नारद व शांडिल्य या सूत्रांवरील टीका), ९. सत्याग्रह (इतिहास मत्तु तंत्र), १०. राष्ट्रीय शिक्षण (वर्धायोजना मत्तु प्रौढर शिक्षण), ११. वचनशास्त्र (लिंगायत धर्मग्रंथावर).

संपादित

दिवेकर, रंगराव रामराव