Skip to main content
x

डुंगरसी, मनुभाई

              नुभाई डुंगरसी यांचा जन्म पाकिस्तानातील कराची या शहरात झाला. त्यांच्या आईवडिलांकडूनच त्यांच्यावर  गोप्रेमाचे संस्कार झाले होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचे प्राण्यांवर विशेषत: गायींवर खूप प्रेम होते. फाळणीनंतर मनुभाई भारतात परत आले. मात्र पुढे १९७७पर्यंत कराची पांजरपोळ विभागाशी ते संबंधित होते. भारतात आल्यावरही त्यांचे गायींविषयीचे प्रेम कायमच राहिले. विविध पशुशाळा व पांजरपोळ येथे ते विश्‍वस्त म्हणून काम पाहू लागले. त्यांनी जवळपास ३० वर्षे मुंबई पांजरपोळाच्या अध्यक्षपदी, तसेच मुंबई गोरक्षक मंडळी येथे विश्‍वस्त व मानद सचिव म्हणून काम केले. त्यांनी दूरदृष्टी ठेवून  संकरीत गोवंश तयार करण्याचा गोरक्षक मंडळींमध्ये पुढाकार घेतला. तसेच त्यांनी वैरणावरील संशोधन, गवताळ जमिनीचा विकास आणि बेटेगावामधील संशोधन संस्था यांच्या निर्मितीसही हातभार लावला. बा.सा.को.कृ.वि. आणि महाराष्ट्र सरकारने बॉम्बे गोरक्षक मंडळीला अधिकृत मान्यता दिली.

              इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ अ‍ॅनिमल्स रिप्रॉडक्शन या संस्थेने १९८१ साली त्यांना मानद सदस्यत्त्व देऊन त्यांचा गौरव केला. कडिवाळी येथील बॉम्बे गोरक्षक मंडळी तसेच बेटेगाव येथील शेतजमिनीवरील सर्व सोयी  कृषी महाविद्यालयातील दापोली व मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. सरकारनेही त्यांच्या योगदानासाठी गोपाळरत्न पुरस्काराने त्यांना गौरवले. त्यांना पशू व दुग्ध उत्पादन विकासासाठी वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामविकास प्रतिष्ठानच्या पुरस्काराने गौरव केला.

              - संपादित

डुंगरसी, मनुभाई