Skip to main content
x

धामणगावकर, देवीदास विष्णुपंत

            देवीदास विष्णुपंत धामणगावकर यांचा जन्म फुलंब्री (औरंगाबाद) येथे झाला. त्यांचे वडील भोकरदन येथे महसूल विभागात नायब तहसिलदार म्हणून नोकरीत होते. त्यांचे इंटरमिजिएटपर्यंतचे शिक्षण हैदराबाद येथे सुरू असताना त्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामात १९४० साली भाग घेतल्याने त्यांना महाविद्यालयामधून काढून टाकले. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली कोलटा टाकळी कँप येथील आर्मड (हत्यारी) स्वातंत्र्यसैनिकांच्या तुकडीत भाग घेऊन ते जवळजवळ दीड वर्षे सक्रिय होते. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून इंटरमिजिएट पूर्ण करून अहमदाबाद येथून एल.सी.पी.एस. ही पदवी मिळवली. पुढे त्यांनी केईएम मुंबई येथून १९४८ साली मुंबई विद्यापीठाची एम.ब़ी.बी.एस. ही पदवी मिळवली. पुढे ते व्यवसायानिमित्ताने १९५५ साली परभणी येथे स्थायिक झाले. त्या वेळी शेती हाच सर्वात मोठा उद्योग मराठवाडा व इतरत्रही होता. त्यामुळे डॉक्टरी पेशाबरोबरच शेती व्यवसायातसुद्धा मोठी सुधारणा होणे गरजेचे आहे, हा प्रबल विचार या स्वातंत्र्यसैनिकास स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांनी शेतीचेही प्रयोग आपल्या शेतावर करण्यास सुरुवात केली होती.

            १९६४ मध्ये महाराष्ट्रात त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी संकरित ज्वारी, बाजरी व मका यांच्या बीजनिर्मितीस मोठ्याप्रमाणावर प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्‍चित केले होते. या पिकांचे मुख्य संशोधन केंद्र परभणी येथे असल्याने, या बाबतीत तज्ज्ञ डॉ. बापट यांच्याशी आपल्या आठदहा सहकार्‍यांसह दोनतीनदा चर्चा केली. डॉ. बापट यांनी त्यांना संकरित पिकाऐवजी संकरित बीजोत्पादन घ्यावे, असे सुचवले. त्यांनी डॉ. बापट यांच्याकडून असे पीक घेण्यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य त्यांनी करावे अशी हमी घेऊन त्यांनी व त्यांच्या मित्रांनी प्रत्येकी ५-१० एकरांवर असा बीजोत्पादनाचा खरिपात कोरडवाहू क्षेत्रात कार्यक्रम घेऊन तो यशस्वी केला. त्यामुळे पुढील काही वर्षांत परभणी व मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांत हजारो एकरांवर बीजोत्पादनास सुरुवात झाली.

            डॉक्टरी व्यवसायाच्या निमित्ताने १९५५ मध्ये परभणी येथे स्थायिक झाले. व्यवसायाने डॉक्टर असूनही त्यांना शेतीची खूपच आवड होती. १९५७ मध्ये परभणीपासून ७ किलोमीटर अंतरावर धर्मापुरी येथे शेती विकत घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी परभणी जिल्ह्यांत सर्वप्रथम द्राक्षाची लागवड केली. तसेच संत्र्याचीही बाग लावली. याचबरोबर इतर शेतकर्‍यांनाही प्रोत्साहन देऊन नवीन शास्त्रीय पद्धतीने शेती करण्यास मदत केली. हे करत असतानाच शेतकर्‍यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी परभणी  येथे विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना केली. तसेच शेतकर्‍यांचा माल योग्य किमतीमध्ये विकला जावा यासाठी तालुका खरेदी-विक्री संघाची स्थापना केली आणि विशेष म्हणजे या दोन्ही संस्थांचे धामणगावकर हे चीफ प्रमोटर, तसेच संस्थापक अध्यक्ष होते. शेतकी महाविद्यालय परभणी तसेच जवार संशोधन केंद्र परभणी यांच्या साहाय्याने त्यांनी स्वत:च्या शेतात नवनवीन वाणांची तसेच बाजरी वरलक्ष्मी कापूस व एच ४ कापूस यांच्या (सीड प्लॉटची) आपल्या शेतात लागवड तर केलीच, त्याशिवाय आपल्या शेतकरी मित्रांनाही ज्वारी व उतर धान्यांच्या व नवीन कापसाच्या जातीच्या (सीड प्लॉटची) लागवड करण्यास मदत केली.

             - संपादित

धामणगावकर, देवीदास विष्णुपंत