ढेरे, अरुणा रामचंद्र
मराठी साहित्यविश्वात स्वतःचे स्वतंत्र स्थान असलेल्या डॉ.अरुणा रामचंद्र ढेरे या सुप्रसिद्ध संशोधक आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.रामचंद्र चिंतामणी ढेरे व इंदुबाला रामचंद्र ढेरे यांच्या ज्येष्ठ कन्या होत.
डॉ.अरुणा ढेरे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात नूतन मराठी विद्यालय, हुजूरपागा, गरवारे व सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे झाले. १९७७ साली त्या बी.ए.ला, मराठी विषयात, पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आल्या आणि त्यांनी सुवर्णपदकासहित अकरा पारितोषिके मिळवली. १९७९ साली एम.ए.लाही मराठी विषयात, पुणे विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला आणि तेरा पारितोषिके पटकावली. १९७७ साली त्यांनी भारतीय विद्यापदविका प्राप्त केली, तीही टिळक विद्यापीठात सर्वप्रथम येऊन आणि यशवंतराव चव्हाण पारितोषिक मिळवून. १९८६ साली पुणे विद्यापीठात, डॉ.भालचंद्र फडके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कथा-कादंबर्यांचा आदिबंधात्मक अभ्यास’ (जी.ए.कुलकर्णी आणि चिं.त्र्यं.खानोलकर यांच्या विशेष संदर्भात) या विषयावर प्रबंधलेखन करून त्यांनी विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी मिळविली.
१९८३ ते १९८८ या काळात, पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्रात अध्यापक-निर्माती म्हणून त्यांनी काम केले. १९८९ ते १९९१ दरम्यान राज्य शिक्षणशास्त्र संस्थेत साहित्य-विभागप्रमुख आणि ‘पसाय’ या मासिकाची संपादिका म्हणून काम केले. त्यानंतर मात्र आजतागायत, त्या पूर्णवेळ लेखन आणि संशोधनकार्य करीत आहेत.
१९८३ साली माध्यम संशोधन केंद्रातर्फे त्यांनी जपानचा अभ्यासदौरा केला, तर १९८६ साली अमेरिकेत तीन महिन्यांचा कम्युनिकेशन स्टडीजचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
डॉ.अरुणा ढेरे यांचे लौकिक आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व संस्कारित करण्यात, त्यांना शालेय जीवनात मिळालेल्या शिक्षकांचा वाटा आहे आणि आई-वडील, आत्या यांचे तर अपार ऋण आहे. लेखन-संशोधन हेच जीवितकार्य मानणार्या, व्रतस्थ वृत्तीच्या वडिलांनी त्यांना घरातच पुस्तकांचे ज्ञानभांडार लहान वयापासून दाखवले. त्यांच्या मूळच्या कविवृत्तीचे, रसिकतेचे, ज्ञानजिज्ञासेचे भरणपोषण केले. वडिलांबरोबर त्यांनी भारतभर प्रवास केला; त्यातून अनुभवाचे क्षितिज व्यापक होत गेले. सामाजिक, सांस्कृतिक भान आले. त्यांच्या वडिलांना घरी अनेक लोककलावंत भेटायला येत असत. त्यांचे अनुभवकथन, चर्चा ऐकून लोकसंस्कृतीचा उत्तम परिचय होत गेला. भारतीय संस्कृतीच्या मुळाशी जाण्याची ओढ निर्माण झाली. समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी साहित्याशी निगडित शास्त्रांचा आवश्यक तो अभ्यास त्यांनी केला, तसेच वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, जैन, बौद्ध, ख्रिस्ती धर्मग्रंथ यांच्याशीही ओळख करून घेतली. दंतकथा, मिथके यांचेही महत्त्व जाणले.
आपली स्वतंत्र प्रज्ञा आणि प्रतिभा यांच्या बळावर त्यांनी काव्य, कथा, कादंबरी इत्यादी सर्व लेखंनातून परंपरेतील सत्त्व आणि नवतेतील सामर्थ्य प्रकट केलेले दिसते. त्यांचा मूळ पिंड कवयित्रीचा असला, तरी कवितेबरोबरच कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्यविषयक, सामाजिक इतिहासपर, किशोरांसाठी व कुमारांसाठी लेखन असे सर्व वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले आहेत. संपादनेही केलेली आहेत.
‘प्रारंभ’(१९८६), ‘यक्षरात्र’ (१९८७), ‘मंत्राक्षर’ (१९९०), ‘निरंजन’ (१९९४), ‘पानावरचे थेंब’ (१९९५), ‘जावे जन्माकडे’ (१९९८), ‘निळ्या पारदर्शक अंधारात’ (२००४) हे त्यांचे काव्यसंग्रह होत. ‘स्त्री आणि तिचे भावजीवन’ हा त्यांच्या सर्वच लेखनाचा केंद्रबिंदू असला तरीही, कविता या माध्यमातून तो प्रकर्षाने जाणवतो. स्त्रीच्या जीवनातील विविध अवस्था, तिची मानसिक आंदोलने, तिने जोडलेले भिन्नस्तरीय नातेसंबंध या सर्वांचे चित्रण अरुणा ढेरे मोठ्या ताकदीने करतात. पौराणिक व्यक्तिरेखांचा, कथांचा त्यांच्या मनावरील प्रभाव मोठा असल्याने, बहुतेक कथाबीजे ही त्यातूनच उचलली आहेत. ‘भगव्या वाटा’ (१९९१), ‘कृष्णकिनारा’ (१९९२), ‘नागमंडल’ (१९८७), ‘अज्ञात झर्यावर रात्री’ (१९९५) अशा कथांमधून मानवी जीवनातील विविध नातेसंबंध आणि मानवी वर्तन यांमागची मानसिकता उलगडून दाखविताना त्यांची चिंतनशीलता दिसून येते.
‘रूपोत्सव’ (१९८७), ‘मनातलं आभाळ’ (१९९४), ‘लावण्ययात्रा’ (१९८७), ‘काळोख आणि पाणी’ (१९९१) यांसारख्या ललित लेखसंग्रहांतून सृष्टीच्या निर्मितीची, जीवनसृष्टीच्या आविष्काराची संवेदनात्मकता जाणवते. माणसाला मातीची असणारी ओढ त्यांनी ‘वेगळी माती वेगळा वास’ (२००२), ‘माणूस आणि माती’ (२००४) यांतून टिपली आहे.
अरुणा ढेरेंच्या संशोधनाचा विषय आदिबंधात्मक समीक्षा असल्याने त्यांनी चिं.त्र्यं.खानोलकर यांच्यासारख्या समर्थ साहित्यकारांच्या कलाकृतींची समीक्षा केली. ‘काळोख आणि पाणी’ (१९९१), ‘काळोखाचे कवडसे’ (१९८७) हे समीक्षादृष्टीचे सविस्तर विवेचन करणारे लेखन होय. याशिवाय, त्यांच्या संशोधनात्मक वृत्तीची साक्ष पटवणारे ‘विस्मृती चित्रे’ (१९९८) हे पुस्तक होय.
मृदू मनाच्या, उत्कट भाववृत्तीच्या या कवयित्रीने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच, १९७६ साली, अणीबाणीच्या काळात, लेखन आणि सत्याग्रह यांमुळे पावणेतीन महिन्यांच्या तुरुंगवासही सोसला.
महाराष्ट्र शासनाचे, तसेच विविध मान्यवर संस्थांचे अनेक पुरस्कार डॉ.अरुणा ढेरे यांना मिळालेले आहेत. त्यांमध्ये ‘लावण्ययात्रा’ला (१९८८-८९) मिळालेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, ‘मंत्राक्षर’ला मिळालेला ‘बालकवी’ पुरस्कार (१९९०-९१) तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मिळालेले कवी ‘यशवंत’ (१९८७) व ‘ह.श्री.शेणोलीकर’ (१९८८) पारितोषिक, पुणे मराठी एकूण वाङ्मयीन कार्याकरिता मिळालेले पारितोषिक (२००२), ‘सुंदर हे जग’ला मिळालेला (१९९९) राष्ट्रीय पुरस्कार, हे उल्लेखनीय पुरस्कार होत.