Skip to main content
x

धनागरे, दत्तात्रेय नारायण

     दत्तात्रेय नारायण धनागरे हे ख्यातनाम समाजशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी भारतातील विविध सामाजिक प्रश्नांबाबत फार चांगले काम केलेे. त्यांच्या विशेष आवडीचे विषय म्हणजे राजकारणातील समाजशास्त्र, विकासाचा सिद्धान्त, सामाजिक चळवळींचे समाजशास्त्र, भारतामधील कृषी आधारित सामाजिक बदल, महाराष्ट्रातील प्रादेशिक विकास आणि सामाजिक शास्त्रांची कार्यपद्धती होत.

     प्रा. धनागरे यांचे उच्चशिक्षण नागपूर विद्यापीठामध्ये झाले. तिथे त्यांनी बी.ए. पदवी आणि समाजशास्त्र विषय घेऊन एम.ए. ही पदवी प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. नंतर १९७३ साली ससेक्स विद्यापीठातून त्यांनी डी.फिल. आणि त्याबरोबर ‘कॉमनवेल्थ फेलोशिप’ मिळवली. त्यांनी त्यांच्या डॉक्टरेटसाठी सादर केलेला ‘भारतातील १९२०-१९५० या काळातील शेतकऱ्यांच्या चळवळी’ हा प्रबंध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने १९८३मध्ये प्रसिद्ध केला. इतिहास आणि समाजशास्त्र या दृष्टीने या चळवळींचा अभ्यास या प्रबंधामध्ये करण्यात आला आहे.

    प्रा. धनागरे यांचे अनेक लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांपैकी विशेष उल्लेखनीय लेख खालीप्रमाणे आहेत :

     Agravian Movements and Gandhian Politics (१९७५) कृषीविषयक आंदोलने व गांधीवाद (१९७५), Themes and Perspectives in Indian Sociology (१९९३) भारतातील समाजशास्त्रातील संकल्पना (१९९३), उच्चशिक्षण : ध्येयवादाकडून बाजारपेठेकडे (२०१०).

     प्रा. धनागरे हे अतिशय कळकळीचे अध्यापक होते व त्यांनी एस. एस. कॉलेज, अमरावती, नागपूर विद्यापीठ, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस- आग्रा विद्यापीठ, आय. आय. टी. कानपूर येथे अनेक विद्यार्थ्यांना तयार केले आहे. पुणे विद्यापीठातही ते बरीच वर्षे या विभागाचे प्राध्यापक व प्रमुख होते.

     प्रा. धनागरे यांनी नवी दिल्ली येथील आय. सी. एस. एस. आर. या संस्थेतही सदस्य-सचिव म्हणून कार्यभार सांभाळला. ते कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकुलगुरूही होते. इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटी या भारतातील समाजशास्त्रज्ञांच्या अग्रगण्य संस्थेचे ते सचिव आणि अध्यक्षही होते.

     प्रा. धनागरे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना लंडनमधील वाचनालयाच्या कामाबद्दल ‘इंडियन काउंन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च फेलोशिप’ प्राप्त झाली होती. तसेच ‘शास्त्री इंडो-कॅनेडियन इन्स्टिट्यूटची’ फेलोशिपही मिळाली होती. कोपनहेगन येथील ‘स्कॅन्डिनेव्हियन इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज’ येथे आशियासंबंधीचे तज्ज्ञ म्हणून त्यांना बोलावले होते. ते युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनसाठी देशभर प्राध्यापक म्हणून जात असत आणि ‘टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ फॉरिन स्टडीज’मध्ये विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जात असत.

     रशियाला गेलेल्या आय.सी.एस.आर.च्या शिष्टमंडळाचे आणि चीनला गेलेल्या ‘इंडियन काउंन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’च्या शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. समाजशास्त्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना यु.जी.सी.तर्फे २००७ साली स्वामी प्रणवानंद सरस्वती पुरस्कार देण्यात आला. तसेच २०१०मध्ये इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीने त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरव केला.या ज्ञानतपस्वी प्राध्यापकाचा पुणे येथेच वृद्धापकाळाने मृत्यू झाला.

—  र. वि. नातू

धनागरे, दत्तात्रेय नारायण