Skip to main content
x

धोपेश्वरकर, रघुनाथ धोंडोपंत

          देशात व परदेशात बॉम्बे स्कूलच्या ज्या चित्रकारांचा १९४० नंतरच्या काळात नावलौकिक झाला, अशा चित्रकारांना विद्यार्थिदशेत कलाशिक्षणाच्या तांत्रिक बाजूंचे शिस्तबद्ध शिक्षण देणारे, त्यांच्यातील सर्जनशीलता, बंडखोरी यांकडे सहिष्णुवृत्तीने बघून त्यांचा व्यक्तिविकास घडवून आणणारे चित्रकार धोपेश्‍वरकर सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाध्यापक व विभागप्रमुख होते.

          रघुनाथ धोंडोपंत धोपेश्वरकर यांचा जन्म कर्नाटकात झाला. आईचे नाव काश्याक्का होते. पत्नीचे नाव सिंधुताई होते. त्यांचे शालेय शिक्षण धारवाड येथे झाले. तेथील एका महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; परंतु चित्रकलेची अनिवार ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. इंटरपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी मुंबई गाठली आणि सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. त्यांचा तेथील पाच वर्षांचा शिक्षणक्रम १९२९ मध्ये पूर्ण झाला. शेवटच्या वर्षी त्यांना उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे सुवर्णपदक व ‘लॉर्ड मेयो’ पदक मिळाले, शिवाय सहाशे रुपयांचे मिस डॉली करशेटजी पारितोषिकही मिळाले. त्याच ठिकाणी त्यांची साहाय्यक अधिव्याख्याता म्हणून १९३१ मध्ये नेमणूक झाली. नंतर १९५३ मध्ये ते चित्रकला विभागाचे प्रमुख झाले व १९५७ मध्ये निवृत्त झाले.

          ते शिकत होते त्या काळात कॅप्टन सॉलोमन यांच्या प्रेरणेने कलेतील भारतीयत्वाचा शोध घेणार्‍या भारतीय पुनरुज्जीवनवादी कलाचळवळीची सुरुवात झाली होती. धोपेश्वरकरांनी या कलाशैलीत काम करण्यात अल्पावधीतच प्रावीण्य मिळवले. त्या काळात लोकप्रिय झालेल्या म्यूरल क्लासचे ते यशस्वी विद्यार्थी होते. दिल्ली येथील इंपीरिअल सेक्रेटरिएटचे प्रतिष्ठेचे काम जे.जे. स्कूलला मिळाले. त्या कामात धोपेश्‍वरकरांचा सहभाग होता. यासाठी त्यांनी १२ फूट x ४ फूट आकाराचे अर्धवर्तुळाकार ‘म्युझिक’ हे भित्तिचित्र रंगविले. या चित्रात निसर्गसुंदर वातावरणात वीणावादन करणारी स्त्री असून तिच्या वीणावादनाने मोहित झालेले हरीण, मोर व बगळा असे प्राणी व पक्षी दाखविले आहेत. याशिवाय त्या काळात मुंबईत मेट्रो गोल्डविन मेयर या कंपनीतर्फे बांधल्या गेलेल्या ‘मेट्रो’ या सिनेमागृहाच्या सजावटीसाठी चित्र रंगविणार्‍या चित्रकारांत त्यांची निवड झाली होती.

          वस्तुत: धोपेश्‍वरकर ज्या काळात शिकत व शिकवत होते, तो काळ काहीसा संभ्रमाचा होता. ते म्हणत, ‘‘यथार्थदर्शनवादाशी असलेलं नातं पूर्णपणे नाहीसं झालं नव्हतं. वास्तववाद व कलेतील भारतीय  पुनरुज्जीवनवादी कलाचळवळ (बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट) आणि त्यानंतरच्या काळातील आधुनिक व प्रयोगशील कला हे सर्व समजावून घेणं आवश्यक आहे.’’

          धोपेश्वरकरांनी शिक्षक म्हणून या काळात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. कोणत्याही थरातील विद्यार्थ्याला ते आस्थेने समजावून घेण्याचा प्रयत्न करीत, नाउमेद करत नसत, न थकता समजावून घेत व समजावून सांगत. त्या काळी, ‘चित्रकला शिकायची तर वाचनाची-मननाची गरज काय? चित्रकारानं बोलायचं नाही, तर फक्त हातानं काम करावं. शिक्षकानं शिकवायचं म्हणजे काय, तर फक्त चित्रावर करेक्शन द्यायचं; त्यावर बोलायची गरज काय?’, असा एक समज तयार झाला होता. पण धोपेश्‍वरकर मास्तरांनी हा शिरस्ता मोडला. ते विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कलाकृतीवर भरभरून बोलत. त्यांच्या चांगल्या-वाईट गोष्टींवर तासन्तास चर्चा करीत. त्यामुळे गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना नेमकी दिशा मिळत असे.

          भारतीय कलेतील भारतीय पुनरुज्जीवनवादी कलेची वाट रुळायला सुरुवात झाली होती. हे सुरू असतानाच आधुनिक कलेचे वारे वाहू लागले. जुन्या पठडीतल्या कलाविचारांशी पाश्‍चात्त्य आधुनिक कलेचा संघर्ष सुरू झाला. परंतु धोपेश्‍वरकर मास्तरांनी जुन्या कलाविचारांना नव्या विचारांची जोड देऊन वाटचाल केली; कारण जुन्यातले जे चांगले, ते त्यांनी कधीच सोडले नाही. परंतु नवीन कलाविचारांतसुद्धा काहीतरी तथ्य आहे याची जाणीव ठेवत, त्यांनी जुन्या पिढीचे असूनही आधुनिक कलेविरुद्ध विद्वेषी भूमिका कधीच घेतली नाही हे विशेष.

          निवृत्त झाल्यानंतर, १९५८ मध्ये त्यांच्या ५१ चित्रांचे पहिले प्रदर्शन झाले. त्यांतील शकुंतला व तिच्या मैत्रिणी हे ‘लव्ह सिंगर्स’ नावाचे चित्र त्यांच्या कलानैपुण्याची साक्ष देते. सध्या ते प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमच्या संग्रहात आहे. त्यानंतरही त्यांनी सातत्याने खाजगी शिकवण्या व स्वत:ची प्रयोगशील कलानिर्मिती सुरू ठेवली. या काळातील त्यांच्या चित्रनिर्मितीत प्रामुख्याने आधुनिक पद्धतीचे प्रयोगही त्यांनी केले हे विशेष.

          धोपेश्वरकर यांचे उंच देहयष्टी, गोरा रंग, घारे डोळे, पांढरे शुभ्र केस असे व्यक्तिमत्त्व होते. डोक्यावर उंच काळी टोपी, क्रीम रंगाचा लांब बंदकोट, धोतर व पायांत चपला या वेषात ते कायम असत. प्रथमदर्शनी ते कडक, तापट व करारी वाटत. त्यांचे बोलणे व लेखनही सूत्रबद्ध व तर्कशुद्ध असे. म्हणूनच प्रा. धोंड, पळशीकर व सडवेलकर अशा वेगवेगळ्या काळातील कलावंत व कला शिक्षकांना त्यांच्याबद्दल आदर होता.

          प्रा. बाबूराव सडवेलकर त्यांच्याविषयी लिहितात, ‘आपल्या व्यापक, सर्वस्पर्शी व सहिष्णू दृष्टिकोनातून विविध थरांतील विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर मोठ्या जिव्हाळ्याने ते प्रोत्साहन देत. विचारांची व तर्कशुद्धतेची पक्की बैठक असलेला, गुरु-शिष्य परंपरेविषयी निष्ठा असलेला व चिरउत्साही प्राध्यापक त्यांच्याखेरीज दुसरा कुणीही नव्हता.’

- प्रा. सुभाष पवार, साधना बहुळकर

 

 

संदर्भ
संदर्भ: १. कॅप्टन सॉलोमन, ग्लॅडस्टन; ‘म्यूरल पेंटिंग ऑफ द बॉम्बे स्कूल’; द टाइम्स ऑफ इंडिया प्रेस; १९३०. २. धोंड, प्रल्हाद अनंत; ‘रापण’; मौज प्रकाशन गृह, मुंबई; १९७९.  ३. सडवेलकर, बाबूराव; ‘महाराष्ट्रातील कलावंत : आदरणीय आणि संस्मरणीय’; ज्योत्स्ना प्रकाशन; २००५. ४. प्रा. पवार, सुभाष; धोपेश्‍वरकरांच्या चिरंजीवांशी प्रत्यक्ष भेट.
धोपेश्वरकर, रघुनाथ धोंडोपंत