गडकरी, मधुसूदन शंकर
जाहिरात क्षेत्राच्या जडण-घडणीत सर्जक सहभाग असलेले जाहिराततज्ज्ञ मधुसूदन शंकर गडकरी यांचा जन्म ठाणे येथे झाला. १९५१ ते १९५७ या काळात त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून फाइन आर्ट आणि अप्लाइड आर्टमधील पदविका प्राप्त केली. १९५७ मध्ये ते लिंटास या जाहिरात संस्थेत रुजू झाले. इलस्ट्रेटर ते क्रिएटिव्ह ग्रूपहेडपर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केले. १९९३ मध्ये ते निवृत्त झाले.
मधू गडकरी यांनी आपल्या कारकिर्दीची जेव्हा सुरुवात केली, तो भारतीय जाहिरात कलेचा जडणघडणीचा काळ होता. कारण जाहिरात क्षेत्रात येणारे चित्रकार बरेचदा फाइन आर्टचे शिक्षण घेतलेले असत. गडकरीही याला अपवाद नव्हते. कोलकाता आणि मुंबई ही जाहिरात कलेची प्रमुख केंद्रे होती.
गडकरी लिंटासमध्ये आले तेव्हा पी.जी.प्रधान हे निर्मिती व्यवस्थापक (प्रॉडक्शन मॅनेजर) होते. रझमी अहमद व्यवस्थापक (मॅनेजर) होते. नंतर आलेल्या जर्सन डिकून्हा आणि अॅलेक पदमसी यांच्यापाशी नवी दृष्टी होती. जाहिरात निर्मितीची व्यवस्था अधिक शास्त्रशुद्ध आणि कल्पक व प्रभावी केली पाहिजे याची जाणीव या दोघांना होती. गडकरींच्या मनातही अशा नव्या कल्पना होत्या आणि त्यांचा पाठपुरावा करण्याची चिकाटी त्यांच्यापाशी होती. बदलत्या काळानुसार लिंटासने जाहिरात क्षेत्रात अनेक नवे मार्ग चोखाळले आणि भारतीय जाहिरात कलेचा स्तर त्यामुळे उंचावला.
१९६० ते १९८० पर्यंतचा काळ जाहिरात क्षेत्रातला सुवर्णयुगाचा काळ होता. औद्योगिक धोरणांमुळे अर्थव्यवस्थेत बदल घडून येत होते. नव्या स्पर्धात्मक वातावरणात जाहिरात कला व्यावसायिक आणि कलात्मकतेच्या दृष्टीने अधिक नेमकी आणि प्रभावी होणे गरजेचे होते. त्यासाठी दूरदृष्टी आणि धाडस यांबरोबरच नवीन कलाकृती निर्माण करण्याची क्षमता असणे आवश्यक होते. या कालखंडात, विविध क्षेत्रांमधील प्रतिभावंत माणसे एकत्र आली आणि जाहिरातींचे स्वरूप अंतर्बाह्य बदलून गेले. मधू गडकरींनी विविध क्षेत्रांमधील व्यक्तींना एकत्र आणून जाहिरात माध्यमाच्या क्षमता विकसित करण्यास हातभार लावला.
नुसती कॉपी लिहिणे किंवा त्याला समर्पक चित्र काढणे म्हणजे जाहिरात नव्हे. शब्द आणि चित्र यांच्या संयोगातून जे निर्माण होते, त्याची व्याप्ती मोठी असते. त्यासाठी एक समग्र दृष्टीकोण लागतो. गडकरी यांनी लिंटासमधील कारकिर्दीत इलस्ट्रेटर, चीफ व्हिज्युअलायझर, चीफ आर्ट डायरेक्टर, फिल्म्स चीफ, प्रॉडक्शन चीफ, क्लायंट सर्व्हिस ग्रुप हेड, क्रिएटिव्ह ग्रुप हेड अशा विविध पदांवर काम केले आणि जाहिरातीच्या विविध क्षेत्रांत नवे प्रवाह आणले. जाहिरात मोहिमांची आखणी, जाहिरात धोरण आणि त्याच्या जाहिराती, जाहिरात चित्रपट, प्रदर्शने अशा विविध माध्यमांमधून होणारी प्रत्यक्ष निर्मिती अशा दोन्ही क्षेत्रांत गडकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लिंटासच्या माध्यमातून गुणवत्तेचे नवे मापदंड प्रस्थापित केले.
जाहिरात ही एक सर्वांच्या सहभागातून निर्माण होणारी कृती आहे आणि या गटसहयोगासाठी निर्मितीच्या प्रक्रियेत अगदी सुरुवातीपासून क्लाएंटला सहभागी करून घेणे, संबंधितांशी एकत्रितपणे चर्चा करून जाहिरातींची आखणी करणे आणि निर्मितीच्या प्रत्येक पायरीवर जाहिरातीतील मध्यवर्ती कल्पनेचा परिपूर्ण आविष्कार कसा होईल याचा कसोशीने प्रयत्न करणे अशी कार्यपद्धती आणण्यात गडकरींनी पुढाकार घेतला. त्याचे दृश्य परिणाम जाहिरातींमधून दिसू लागले.
प्रत्येक जाहिरात संस्थेची स्वत:ची अशी वेगळी ओळख असते. विविध उत्पादनांच्या जाहिराती करत असताना लिंटासने बदलत्या जीवनशैलीची भारतीय मूल्यांशी सांगड घातली. प्रत्येक ब्रँडची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘सिनेतारका आणि लक्स’, ‘तंदुरुस्ती आणि लाइफबॉय’, ‘बंधनमुक्त स्त्रीत्व आणि लिरिल’, ‘एमआरएफ टायर्स आणि मसलमॅन’ अशा या ग्राहकाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या ओळखी होत्या. सामाजिक बांधीलकीचा भाग म्हणून लिंटासने स्वखर्चाने एकात्मता, वृक्षारोपण अशा सामाजिक प्रश्नांवरही जाहिराती व जाहिरातपट केले.
गडकरींनी जाहिरातींसाठी छायाचित्रणाचा कलात्मक आणि अर्थपोषक उपयोग करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले. कलात्मकता, आधुनिक तंत्रज्ञान, छायाचित्रकाराची अचूक निवड आणि मुद्रणपद्धतींचे गुण-दोष लक्षात घेऊन केलेली आखणी यांचा समन्वय गडकरी यांनी आपल्या कामामध्ये साधला. जाहिरातीच्या बीजकल्पनेत असलेली वातावरणनिर्मिती करण्यासाठी अनुरूप मॉडेल्स निवडणे, त्यांची वेशभूषा आणि पार्श्वभूमीचे तपशील ठरवणे, पात्रांमधील भावनिक नाते प्रस्थापित करणे आणि मग छायाचित्रे घेऊन उत्तम छायाचित्राची निवड करणे अशी कार्यपद्धती विकसित झाली. आर.आर.प्रभू, विलास भेंडे, मित्तर बेदी अशा सर्जनशील छायाचित्रकारांचा गट नंतरच्या काळात निर्माण झाला तो त्यामुळेच.
चित्रपटांच्या सुरुवातीला दाखवले जाणारे जाहिरातपट हा प्रकार नंतर दूरचित्रवाणीवरील जाहिरातींमध्ये रूपांतरित झाला. जाहिरातपटालाही चांगल्या पटकथेची, दिग्दर्शनाची कॅमेऱ्याच्या कलात्मक वापराची गरज असते हे जाणून गडकरींनी लिंटासच्या लंडन येथील शाखेत जाऊन प्रशिक्षण घेतले. या तंत्राचा अभ्यास केला आणि जाहिरातपट कसे करावेत याचे संकल्पनापासून ते निर्मितीपर्यंतचे प्रशिक्षण इतरांना दिले, त्यासाठी कार्यशाळा घेतल्या. गडकरी यांनी ‘आय.ए.ए.एफ.ए.’ (द इंडियन अकॅडमी ऑफ अॅडव्हर्टायझिंग फिल्म आर्ट) ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला. जाहिरातपटांच्या विविध विभागांमधील कामाला पारितोषिके देण्याची पद्धत सुरू केली. दरवर्षीच्या उल्लेखनीय जाहिरातपटांच्या चित्रफिती काढल्या. यातून जाहिरात-पटांकडे बघण्याची नवी दृष्टी तयार झाली व श्याम बेनेगल, सुमंत्र घोषाल, जॉन मॅथ्यू, गोविंद निहलानी यांच्यासारखे दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत तयार झाले. ‘अॅडलॅब्ज’ आणि मनमोहन शेट्टी यांचाही जाहिरातपटांच्या गुणात्मक विकासात महत्त्वाचा सहभाग होता.
१९७१ साली जिनिव्हा येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागासाठी ‘शिवशक्ती’ म्हणजेच ‘अॅटम्स फॉर पीस’ नावाचे दृक्-श्राव्य सादरीकरण भव्य प्रमाणात सादर करण्यात आले. त्याचे दिग्दर्शन आणि निर्मिती मधू गडकरी यांची होती.
लिंटासच्या वार्षिक कलाप्रदर्शनातून त्यांची चित्रे प्रदर्शित झाली. १९६० ते १९८० चा काळ कविता, नाटक, चित्रपट अशा सगळ्याच बाबतीत प्रयोगशील कालखंड होता.
गडकरी यांनी अॅलेक पदमसी आणि इतरांनी सादर केलेल्या नाट्यप्रयोगांचे छायाचित्रण केले. गिरीश कर्नाडांचे ‘तुघलक’, विजय तेंडुलकरांचे ‘गिधाडे’ इत्यादी नाटकांचा त्यात समावेश होता. नाटकातील वातावरण आणि पात्रांचे व्यक्तिमत्त्व गडकरींनी छायाचित्रांमध्ये अचूक पकडले आहे आणि अभिजात चित्रांमधले छायाप्रकाशाने जिवंत होणारे रचनात्मक सौंदर्यही त्यात आहे. भारतीय इंग्रजी रंगभूमीवरील एका कालखंडाचा कलात्मक दस्तऐवज म्हणून त्याला महत्त्व आहे.
गडकरी यांना जाहिरात कला, जाहिरातपट आणि छायाचित्रणाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमधून अनेक पारितोषिके मिळाली आहेत. १९८५ पासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यासही एक छंद म्हणून त्यांनी केला. सूक्ष्म कालनिर्णयासाठी आधुनिक गणितावर आधारित सॉफ्टवेअरही त्यांनी तयार केले आहे. असे असले तरी मधू गडकरी यांची खरी ओळख जाहिरात क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले एक कल्पक जाहिराततज्ज्ञ म्हणूनच आहे.
- दीपक घारे, रंजन जोशी