Skip to main content
x

गजेंद्रगडकर, मोनिका अभिजित

     मोनिका गजेंद्रगडकर यांचा जन्म पुण्याला झाला. शिक्षणही पुणे येथेच झाले. समाजशास्त्र विषयात बी.ए. परीक्षेत व मराठी घेऊन एम.ए. परीक्षेत त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. ख्यातनाम कथाकार विद्याधर पुंडलिक यांच्या त्या कन्या आहेत. मुक्त पत्रकारितेपासून त्यांनी लेखनाला प्रारंभ केला. ‘वेचलेले जीवन’ ही पहिली कथा १९९३ च्या ‘स्पंदन’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांच्या अनेक कथा व दीर्घकथा ‘मौज’, ‘दीपावली’, ‘अक्षर’, ‘कालनिर्णय’ आदी दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाल्या, ‘मौज प्रकाशन’तर्फे त्यांचे ‘भूप’ (२००४) आणि ‘आर्त’ (२००८) हे दोन कथासंग्रह प्रकाशित झाले. चोखंदळ समीक्षकांनी त्यांच्या कथालेखनाचे स्वागत केले.

     वडिलांकडून लेखन-वाचनाचा संपन्न वारसा घेतलेल्या मोनिका गजेंद्रगडकरांनी कथालेखिकांच्या मांदियाळीत स्वतःचे वेगळे स्थान अल्पकाळात निर्माण केले. मध्यमवर्गीय कुटुंबात निर्माण होणारे ताणतणाव, त्यामुळे उद्भवणारा नातेसंबंधातील दुरावा, व्यक्तिव्यक्तींतील स्वभाववैशिष्ट्यांमुळे संबंधितांची झालेली होरपळ हे सारे लेखिका प्रत्ययकारी पद्धतीने शब्दबद्ध करते. ‘आधार’सारख्या कथेत लेखिकेने समलिंगी संबंध धीटपणे व्यक्त केलेले दिसतात. सतारवादनात कुशल असलेल्या या लेखिकेचे संगीताच्या सूक्ष्म अभ्यासाचे प्रतिबिंब ‘भूप’सारख्या कथेत उमटलेले दिसते.

     कथालेखनाबद्दल लेखिकेला अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची डॉ. स.गं.मालशे संशोधनवृत्ती, विदर्भ साहित्य संघाचा कथाकार शांताराम पुरस्कार, अण्णाभाऊ साठे ‘साहित्यरत्न’ पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार हे काही महत्त्वाचे पुरस्कार होत. त्यांच्या कथांचे कोकणी, इंग्रजी, गुजराती ह्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. 

     १९९२ पासून मौज प्रकाशन गृहासाठी श्री. पु.भागवत यांना संपादनकार्यात साहाय्यक म्हणून काम करणार्‍या मोनिका गजेंद्रगडकर २००८पासून ‘मौज’ दिवाळी अंकाच्या संपादक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

गदिमा प्रतिष्ठानचा ‘चैत्रबन पुरस्कार’,महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार असे मान्यताप्राप्त पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.  

     - डॉ. सुभाष भेण्डे

गजेंद्रगडकर, मोनिका अभिजित