Skip to main content
x

गोखले, वासुदेव विश्‍वनाथ

बौद्धविद्या पंडित

       बौद्ध त्रिपिटकांची ‘तायशो एडिशन’ भांडारकर ग्रंथालयास अर्पण करण्यासाठी १९९० साली जपानी स्कॉलर, त्यांच्या अधिकार्‍यांसह भांडारकर संस्थेत दाखल झाले होते. समारंभास ज्येष्ठ बौद्धविद्या पंडित डॉ. पु.वि. बापट आणि डॉ. वा.वि. गोखले खास पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे सचिव डॉ. रा.ना. दांडेकरांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे कार्यक्रमात पुढाकार घेऊन सोहळा साजरा केला. बौद्ध धर्मग्रंथाचे - त्रिपिटकाचे जाणकार असलेल्या डॉ. बापट आणि डॉ. गोखले यांचे खूप कौतुक केले आणि ‘बुद्धिक्षमप्रधान देशात शिक्षणक्षेत्रात या दोन महान व्यक्ती आहेत, असे मत व्यक्त केले. या त्रिपिटकापूर्वी चीनमधून असेच चिनी त्रिपिटक आले होते. मात्र ते ग्रंथरूपात किंवा सुटे कागद नसून कागदाच्या मोठ्या गुंडाळ्या (रोल) होत्या आणि पुढे डॉ. बापट यांनी त्यांचे ८१ खंडांत रूपांतर केले आणि पुणे संस्थेच्या ग्रंथालयात विविध आठ त्रिपीटके झाली.

     डॉ. वासुदेव विश्‍वनाथ गोखले यांचा जन्म कोल्हापुरात झाला. वडील विश्‍वनाथराव कोल्हापूर संस्थानचे मुख्य न्यायाधीश होते. शालेय व विद्यापीठीय शिक्षणानंतर १९२६मध्ये ते कोलकत्याला शांतीनिकेतनमध्ये दाखल झाले. गोखले यांची विद्वत्ता पाहून स्वत: रवींद्रनाथांनी त्यांचा गौरव केला आणि प्रो. तान यून शान यांच्याबरोबर काम (संशोधनात्मक) करण्याची शिफारस केली. पुढे १९२७ साली जर्मनी, बॉन आणि नंतर हायडेलबर्ग विद्यापीठाला त्यांनी भेटी दिल्या. १९३१मध्ये भारतात परत आल्यावर योग्य असे काम समोर न आल्याने ते कोल्हापूरला परतले, परंतु डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मंडळींना ते पुण्यात हवे होते. १९३२मध्ये पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात ‘बुद्धिस्ट लॉजिक’ आणि ‘जर्मन भाषा’ शिकवण्यासाठी ते रुजू झाले. १९३५मध्ये सोसायटीचे आजीव सदस्यही झाले. पुढे शांतीनिकेतनमध्ये ‘चायना भवन’चे संशोधन कार्य सुरू झाले आणि त्याचे संचालक म्हणून गोखले सरांना तिकडे बोलावणे आले. १९३७-३८ या काळात तेथे काम करीत असता पुन्हा पुण्याला परत येऊन फर्गसनमध्ये त्यांना शिकवावे लागले ते अगदी १९५९ अखेरपर्यंत निवृत्त होईपर्यंत. मधल्या काळात भारताचे पंतप्रधान मा. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९४८ ते १९५० या काळात ल्हासा येथील इंडियन मिशनचे विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक केली. हा त्यांचा विशेष सन्मान होता. तो त्यांनी स्वीकारला. त्यातून मुक्त झाल्यावर ते पुन्हा फर्गसन महाविद्यालयामध्ये दाखल झाले. शिकवणे हा त्यांचा आवडीचा विषय!

     फर्गसनमधील १९५९च्या निवृत्तीनंतर दिल्ली विद्यापीठात ‘बुद्धिस्ट स्टडी’ या विषय विभागाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. भगवान गौतम बुद्धांच्या परिनिर्वाणाला २५००ला वर्षे झाली. १९६० साली ते दिल्ली विद्यापीठात दाखल झाले. हा विभाग राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी सुरू केला. १९६२मध्ये डॉ. गोखले या विभागाचे स्वतंत्रपणे प्रमुख झाले. अनेक विदेशी बौद्ध संशोधकांनी या विभागाला भेटी दिल्या, संशोधन केले व पीएच.डी. पदवीही मिळवली. त्यामध्ये पुण्याच्या डॉ. मालती शेंडगे यांचा समावेश होता.

     हे काम करत असताना त्यांनी संशोधनात्मक ग्रंथही लिहिले. ‘भोजनाय मालिका’ (१९५५), ‘गौतम बुद्धाचा सत्यविषयक दृष्टीकोन’ (१९६५), ‘बौद्ध धर्मांची दुर्मीळ हस्तालिखिते’ याचबरोबर ‘अमेरिकेच्या हार्वड विद्यापीठाच्या शोधपत्रिकेचे संपादन’ व ‘डॉ. दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्याबरोबर ‘सुभाषित रत्नकोश’ आणि आणखी काही ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले. विविध संशोधनात्मक नियतकालिकातून २६ लेख लिहिले, तसेच अनेक बौद्ध संहितांची भाषांतरे केली.

    खेदाची गोष्ट अशी की, या महान विद्वानांची खूण-स्मृती मात्र भांडारकर संस्थेत कोठे सापडत नाही. त्या काळात दिल्लीच्या वास्तव्यात अनेक जपानी स्कॉलर त्यांच्या हाताखालून शिकून गेले, जे आज मान्यवर अभ्यासक बनले आहेत. आणि म्हणूनच ‘बौद्ध त्रिपीटकांची तायशो एडिशन’ भांडारकर संस्थेला अर्पण करताना जपानी संशोधकांना डॉ. गोखले यांची उपस्थिती हवी होती.

    बुद्धिस्ट तत्त्वज्ञानात ‘प्रतीत्य समुत्पाद’ हा विषय त्यांच्या जिव्हाळ्याचा होता. पं. राहुल सांकृत्यायन यांनी तिबेटी भ्रमंती करून अनेक बौद्ध ग्रंथ भारतात आणले. या ग्रंथांच्या छायाचित्रांवरून डॉ. गोखले यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. त्यामध्ये ‘तर्कज्वला’, ‘मध्यन्त विभागशास्त्र आणि भाष्य’, ‘मैत्रेयी कारिका व - सुबंधूचे भाष्य व स्थिरमती टीका’, ‘माध्यमक हृदय (भाव्यकृत) भावविवेकसह’, ‘वसुबंधूचा अभिधर्म कोश कारिका’ यांचा समावेश आहे.

     दिल्लीच्या विद्यापीठीय कारकिर्दीत त्यांनी नेपाळला भेट दिली. बौद्ध धर्माच्या अभ्यासकांचे एक पथक मॉस्को (रशिया) आणि मंगोलिया या ठिकाणी पाठवले. १९७२मध्ये त्यांनी जपान-अमेरिका-युरोप असा अभ्यास दौरा केला. १९७८मध्ये आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेला कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) येथे ते हजर होते. डॉ. दामोदर धर्मानंद कोसंबी त्यांचे जवळचे सहकारी! कायम प्रसिद्धिपराङ्मुख राहून संशोधन आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत राहिले.

     डॉ. पु.वि. बापट आणि डॉ. वा.वि. गोखले भांडारकर संस्थेच्या बौद्ध धर्मअभ्यासाचे मुख्य आधारस्तंभ म्हणावे लागतील.

- वा.ल. मंजूळ

गोखले, वासुदेव विश्‍वनाथ