Skip to main content
x

गोखले, विष्णू भिकाजी

विष्णुबाबा ब्रह्मचारी

     पूर्वाश्रमीचे विष्णू भिकाजी गोखले म्हणजेच विष्णुबाबा ब्रह्मचारी, रायगड जिल्ह्यातील शिरवली या गावचे होते. विष्णू लहान असतानाच त्यांचे वडील वारले. मौंजीबंधन व थोडे वेदाध्ययन झाल्यावर त्यांनी आईच्या सांगण्यावरून शेती केली, गुरे राखली. नंतर ते महाडला आले. नंतर संगमेश्वर येथे त्यांनी काही काळ कस्टम खात्यात नोकरीही केली. नंतर ती ही नोकरी सोडली व साधु-संतांबरोबर खूप भटकले. त्यांनी कथा, कीर्तने ऐकली. वयाच्या तेविसाव्या वर्षीच त्यांंनी सर्वसंगपरित्याग केला. त्यांनी विवेकसिंधू, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध, बोधसागर इत्यादी ग्रंथांचे वाचन व सखोल चिंतन केले. नंतर ते सप्तशृंगी गडावर जाऊन राहिले. त्यांनी कंदमुळे खाऊन तपस्या केली. पुढे त्यांना आत्मज्ञान झाले. विष्णूबाबांचा प्रथमत: भर व्याख्यानांवर होता. नंतर त्यांनी ग्रंथलेखन केले. ‘वेदोक्त धर्मप्रकाश’, ‘भावार्थसिंधू’, चतु:श्लोकी भागवताचा मराठीत अनुवाद, सुखदायक राज्य प्रकरणी निबंध, ‘बोधसागर’ असे पाच ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

     तो ब्रिटिश राज्याचा काळ होता. भारतात आलेल्या मिशनरी लोकांनी येथे शाळा आणि रुग्णालये सुरू केली. आम्ही सेवाभावाने कार्य करतो असे ते सांगत असले तरी त्यामागे येथील जनतेचे धर्मांतर घडवून आणण्याचा खरा हेतू होता. ख्रिश्चन मिशनरी अनेक प्रकारे हिंदुधर्मावर टीका करीत. विष्णूबाबांनी त्यांच्याच पद्धतीने हा वार परतविण्याचे प्रयत्न केले. त्यांनी ख्रिश्चन धर्मातील वैगुण्यांवर व्याख्यानांची झोड उठविली. त्यांचे खंडन-मंडन आवेशपूर्ण असे. त्यांच्या सभा मुंबईस चौपाटीवर होत; त्यांच्या भाषणांना अलोट गर्दी होत असे.

     विष्णूबाबा यांनी हिंदू धर्मबांधवांना अत्यंत क्रांतिकारक विचार सांगितले. त्यांनी स्त्री-शिक्षणाचा हिरिरीने पुरस्कार केला. त्यासाठी ते इतिहास, पुराणातील दाखले देत. विष्णूबाबांची विवाहविषयक मतेही पुरोगामी होती. त्यांना जरठ-कुमारी विवाह मुळीच मान्य नव्हता.

     वधू-वरांच्या वयातील अंतर सहा ते आठ वर्षांचे असावे, असे ते सांगत. त्यांना स्वयंवर पद्धती मान्य होती. त्यांना विधवा विवाह मान्य होता. बालविधवा ही कुमारिकाच मानावी, विधुराने विधवेशीच विवाह करायला हवा असे ते सांगत. विष्णूबाबा यांना सतीची चाल मान्य नव्हती व पती जर व्यसनी, व्यभिचारी किंवा रोगग्रस्त असेल, तर स्त्रीला घटस्फोट मिळायला हवा, असे त्यांचे मत होते. जातिभेदाबद्दलही त्यांची मते विलक्षण क्रांतिकारक होती. जाती कार्यावरून ठरतील आणि वर्ण गुणधर्मावरून ठरेल. एकाच पित्याची चार मुले चार वर्णांची असू शकतील! कारण वर्ण गुणावरूनच ठरतो. जो सत्त्वगुणयुक्त आहे व धर्ममार्ग दाखविण्यास समर्थ आहे, त्यास ब्राह्मण म्हणावे. अशा ब्राह्मणांनी आदिवासींना ज्ञान द्यावे व उन्नत करावे हे त्यांचे कार्य आहे. इंग्रजी राज्यामुळे कारखानदारी सुरू झाली. यंत्रयुग सुरू झाले. त्यामुळे नवाच कामगारवर्ग निर्माण झाला.

     विष्णूबाबा ब्रह्मचारी यांनी ‘सुखदायक राज्य प्रकरणी निबंध’ लिहून कार्ल मार्क्सच्या कितीतरी वर्षे आधी समाजवादी समाजरचनेबद्दलचे विचार मांडले होते. ते म्हणतात, ‘खाजगी संपत्ती हेच सर्व दु:खांचे व गुन्ह्यांचे उत्पत्तिस्थान आहे. म्हणून सर्व प्रजा एक कुटुंब मानावी. गावाची सर्व जमीन सर्वांची मानावी. सर्वांनी कष्ट करावेत. गावाची कोठारे असतील, त्यातून गरजेप्रमाणे धान्य, कापड इत्यादी न्यावे.’ विष्णूबाबांंनी ‘सेतुबंधिनी’ नावाची गीतेवर टीका लिहिली आहे. ही टीका गीता अध्याय १८, श्लोक १७ पर्यंत लिहिली गेली. पुढील टीका विष्णूबाबा ब्रह्मचारी यांच्या एका शिष्याने पूर्ण केली. ही टीका १८७० च्या सुमारास लिहिली; पण १८९० मध्ये प्रकाशित झाली. या टीकेचे वैशिष्ट्य म्हणजे ती गद्य स्वरूपात व तत्कालीन ज्ञात वैज्ञानिक परिभाषेत लिहिली आहे.

     वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेली ही पहिलीच टीका मानावी लागेल. या टीकेतही इंग्रजी राज्य व ख्रिश्चन धर्म यांवर परखड मते मांडली आहेत. विष्णूबाबा ब्रह्मचारी यांनी मुंबई मुक्कामी आपला देह ठेवला.

 

डॉ. वि.य. कुलकर्णी

गोखले, विष्णू भिकाजी