Skip to main content
x

गोंगाडे, अरुण एस.

               रुण एस. गोंगाडे यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांनी उपयोजित कलेची पदविका १९७३ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमधून प्राप्त केली. त्यानंतर मुंबईतील एका प्रसिद्ध जाहिरातसंस्थेतून संकल्पन चित्रकार म्हणून १९७५ पर्यंत त्यांनी अनुभव घेतला व फिल्म्स डिव्हिजन या भारत सरकारच्या कार्टून फिल्म्स विभागात आर्टिस्ट ग्रेड पदावर कामाला सुरुवात केली. केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या निवडीतून १९९२ मध्ये याच विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेथेच अनेक प्रयोग करून त्यांनी नावलौकिक मिळवला.

               जे.जे.मध्ये असताना भित्तिचित्र (पोस्टर) माध्यमावर त्यांचे प्रभुत्व होते. राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये त्यांच्या भित्तिचित्रांना राज्य कलाप्रदर्शनात १९७५ ते ७८ अशी सलग चार वर्षे पारितोषिके मिळाली. गोंगाडे विद्यार्थी असताना राज्य कलाप्रदर्शनात हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, कुटुंबनियोजन अशा सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने केलेली भित्तिचित्रे प्रदर्शित केली जात. गोंगाडे यांनी हाच सामाजिक आशय फिल्म्स डिव्हिजनमध्ये आल्यावर अ‍ॅनिमेशन तंत्राने केलेल्या लघुपटांद्वारे मांडला.

               माहितीपटामध्ये बऱ्याचदा तांत्रिक कौशल्याचा भागच लक्षात घेतला जातो; पण माहितीपट अथवा लघुपटांमध्ये कल्पकता आणि दृश्यमाध्यमांची कलात्मक जाण असेल तर प्रचारकी विषयही आस्वाद्य बनतात आणि प्रेक्षकांशी अधिक चांगला संवाद साधू शकतात याचा प्रत्यय गोंगाडे यांच्या अ‍ॅनिमेशन पद्धतीतील प्रयोगांमधून येतो. गोंगाडे यांनी अ‍ॅनिमेशन माध्यमातून भारतात ‘क्ले पिक्सिलेशन’ किंवा ‘स्टॉप फ्रेम पद्धती’चा जास्त वापर केला. रेखाटनकौशल्याचा कलात्मक उपयोग करीत त्यांनी अ‍ॅनिमेशनमध्ये नवे प्रयोग केले. क्ले अ‍ॅनिमेशनमध्ये मातीचे शिल्प बनवले जाते. लघुपटातील पात्रांच्या मूर्ती बनवायच्या आणि त्यांच्यात फेरफार करून त्यांची नियोजित हालचाल टप्प्याटप्प्यांनी चित्रित करायची हे काम अत्यंत जिकिरीचे असते. कागदावरील रेखाटने दुरुस्त करता येतात; परंतु येथे शिल्प तुटण्याचा संभव जास्त असल्यामुळे ते कठीण असते. आजच्या संगणकीय तंत्रज्ञानाने या माध्यमात खूप प्रगती झालेली असली तरी क्ले अ‍ॅनिमेशनला एक वेगळेच महत्त्व आहे.

               तीस वर्षांपेक्षा अधिक काळ या क्षेत्रात गोंगाडे यांचा वावर असून त्यांनी अनेक अ‍ॅनिमेशन चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे, त्यांपैकी महत्त्वाचे लघुपट पुढीलप्रमाणे : ‘बिदाई’: १९८४ चा राष्ट्रीय पुरस्कार, विषय : लग्नाच्या वेळी नवऱ्यामुलास मिळालेल्या मुलीच्या माहेरच्या संपत्तीचा विरोध करणे. ‘ए.बी.सी.-नेत्रदान’ : या चित्रपटास शिकागो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १९८७ चे स्पेशल ज्यूरी पारितोषिक, तसेच पोर्तुगालमध्ये प्रशस्तिपत्र मिळाले. चौतिसाव्या राष्ट्रीय उत्तम चित्रपटाचे पारितोषिक, तेहरान येथील एकोणिसाव्या आंतरराष्ट्रीय सचेतन चित्रपटांसाठीचा ‘गोल्डन स्टॅच्यू’चा मानही मिळाला. ‘एन्ड गेम’चा विषय होता अणूचा शांततेसाठी वापर. त्याला पस्तिसाव्या राष्ट्रीय चित्रपटाचे पारितोषिक मिळाले. तेहरान देशातील एकोणिसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सिल्व्हर स्टॅच्यू’ पारितोषिक मिळाले. ‘लॉस्ट होरायझन’या पर्यावरणाच्या विषयावरील चित्रपटाला १९९७ च्या चव्वेचाळिसाव्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.  ‘शी कुड डू यू प्राउड’: पस्तिसाव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात यास उत्तम माहितीपटाचा राज्य पुरस्कार मिळाला.  ‘एज्युकेट ओनली हर फ्युचर’ला १९९९ च्या छत्तिसाव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात राज्य पुरस्कार व १९९९ च्या चव्वेचाळिसाव्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला.

               फिल्म्स डिव्हिजनमधील आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी अ‍ॅनिमेशन चित्रपटनिर्मितीत प्रयोगशील राहण्यासाठी उत्तेजन दिले. राममोहन यांनी समाजप्रबोधनासाठी अ‍ॅनिमेशन तंत्राचा कल्पक वापर करण्याची सुरू केलेली परंपरा गोंगाडे यांनी आपल्या- परीने अधिक समृद्ध केली. आज अ‍ॅनिमेशन तंत्राला व्यावसायिक क्षेत्रात मोठी मागणी असताना गोंगाडे यांनी मात्र सामाजिक बांधीलकीशी अ‍ॅनिमेशन तंत्राचे असलेले नाते कायम ठेवले आहे.     

- रंजन जोशी, दीपक घारे

गोंगाडे, अरुण एस.