Skip to main content
x

गोस्वामी, भैयाजी भोलाबन

           मानेपर्यंत रुळलेले केस, खडा आवाज, मुखात कायम पान असणारे भैयाजी भोलाबन गोस्वामी यांचा जन्म सावनेरमधील कोदेगाव या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोदेगाव व सावनेर येथे सुरू होते. वयाच्या चौदाव्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भाग घेतला व त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिले. याच दरम्यान त्यांना चित्रकलेत रुची निर्माण झाली व पुढील काळात त्यांच्या कलाशिक्षणाला सुरुवात झाली.

           नागपूर स्कूल ऑफ आर्टमधील सुप्रसिद्ध चित्रकार  बापूराव आठवले यांच्याकडे ते शिकू लागले. याच काळात एस.एच. रझा हेदेखील बापूरावांकडेच शिकत होते. त्यांच्याशी भैयाजींची मैत्री झाली व पुढे त्यांच्यामुळेच एच.ए. गाडे व चित्रकार आरा यांच्याशी गोस्वामी यांचा संबंध आला. त्यांच्यावर या आधुनिक पद्धतीने काम करणार्‍या कलावंतांच्या कला-शैलीचा प्रभाव पडला. यातून निर्माण झालेली आधुनिक पद्धतीची प्रयोगशील चित्रे १९५९ व १९६५ मध्ये मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत आणि १९६२ मध्ये ताज आर्ट गॅलरीत प्रदर्शित झाली. त्यांना, १९६१ व १९६२ अशी लागोपाठ दोन वर्षे बॉम्बे आर्ट सोसायटीचा पुरस्कार व रौप्यपदकही मिळाले.

           त्यांच्या पत्नीचे नाव इंदूबाई होते. भैय्याजींना व्यवहार कधी जमलाच नाही. ज्यातून मिळकत नाही, अशावरच ते खर्च करीत होते. त्यामुळे त्यांना कौटुंबिक दुरावा सहन करावा लागला. भैयाजींच्या चित्रशैलीवर सभोवतीच्या वातावरणाचा प्रभाव असे. त्यामुळे धार्मिक व ग्रमीण जीवन, त्यांच्या चालीरीती, निसर्ग, पशुपक्षी अशा विषयांचा त्यांच्या चित्रनिर्मितीवर प्रभाव जाणवतो. तैलरंग व जलरंग या दोन्ही माध्यमांवर त्यांचे प्रभुत्व दिसे. भैयाजींची शैली स्वतंत्र असून त्यात पोत व रंगाचे जोरकस फटकारे हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य होते. पुढील काळात रझा ख्यातनाम झाले व पॅरिसला राहू लागले. ते मुंबईत आल्यावर भैयाजी त्यांच्या भेटीला जात असत. भैयाजी म्हणत, ‘‘तो कृष्ण मी सुदामा.’’ त्यांनी १९८८ मध्ये आपल्या या प्रिय मित्राचे व्यक्तिचित्रही काढले होते.

           महाराष्ट्र शासनातर्फे २७ मार्च १९९९ रोजी नागपूर येथे शासकीय चित्रकला महाविद्यालयात भैयाजींच्या कलासेवेचा गौरव करण्यात आला. त्या वेळी अस्थिपंजर भैयाजींना पाहून सर्वांनाच वाईट वाटले. आयुष्यभर वडिलोपार्जित शेती विकून त्यांनी जी चित्रनिर्मिती केली ती तशीच पडून होती. त्यांच्या पत्नी इंदूबाईंनी त्यांना त्या जिवंत असेपर्यंत साथ दिली. पण त्यानंतर भैयाजी एकाकीच जगले. अखेरीस प्रकृती बिघडल्यामुळे आणि पैशाअभावी चित्र काढणे बंद झाले.

           विकलांग अवस्थेतील भैयाजी आपल्या घराच्या ओसरीतील खाटेवर बसून राहत. त्यांचे शेवटचे दिवस पाहून नागपूर व भोपाळमधील तरुण चित्रकार मंडळींनी त्यांना चाकांची खुर्ची दिली होती.

           - प्रभाकर पाटील

गोस्वामी, भैयाजी भोलाबन