Skip to main content
x

गुप्ते, गजानन मुरलीधर

            अमरावती भागातील नाथपंथी योगीपुरुष म्हणून संत गजानन महाराज गुप्ते अनेकांचे श्रद्धास्थान आहेत. मराठीतील सुप्रसिद्ध कविवर्य नारायणराव गुप्ते ऊर्फ बीयांचे ते बंधू होत. गजानन महाराजांच्या वडिलांचे नाव मुरलीधर व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांना चार भाऊ व तीन बहिणी होत्या.

गजानन महाराज यांना लहानपणीच देवीच्या आजाराने त्रस्त केले व त्यांचा चेहरा विद्रूप झाला. देवीचे व्रण पुढे अनेक वर्षे तसेच राहिले. या आजाराचे स्वरूप खूपच भयंकर होते. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच ते वाचले. या आजारामुळे ते उजव्या पायाने कायमचे पांगळे झाले. आजारातून ते सावरतात तोच त्यांच्या माता-पित्याचे निधन झाले आणि पोरकेपणाचे दुःख त्यांच्या वाट्याला आले.

गजानन महाराज यांंची लाडकी बाळूमावशी हिने पुढे त्यांचा सांभाळ केला. गजानन महाराज यांचे मोठे बंधू कविवर्य बीयांनी कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वीकारली. त्यांनी १९०३ साली तीनही बहिणींची लग्ने लावून दिली आणि छोट्या गजानन याची मुंजही केली.

सर्व भाऊ-बहिणींनी उत्तम रितीने शिक्षण पूर्ण केले; पण गजानन मात्र कसातरी चौथीपर्यंत शाळेत गेला व पुढे त्याने शाळेला कायमचा रामराम ठोकला. त्यांचे अन्य मोठे बंधू रामचंद्रपंत हे बुलढाणा जिल्ह्यात चिखली येथे स्थायिक झालेले होते. गजानन महाराज काही वर्षे त्यांच्याकडे राहण्यास गेले तेव्हा तेथे एक विलक्षण प्रसंग घडला व त्या प्रसंगानंतर गजाननाला सर्व जण योगी म्हणूनच ओळखू लागले.

चिखलीजवळ अंत्री या गावी जांबोरी येथे येलोबानावाच्या साधूची समाधी आहे. त्या समाधीखाली एक गुहा आहे. या गुहेत श्री नारायण सरस्वती हे योगी साधना करीत होते. या साधूच्या दर्शनाने गजाननामध्ये चांगला बदल होईल व तो सर्वसामान्य मुलांप्रमाणे वागू लागेल अशा इच्छेने बाळूमावशी गजाननाला या साधूच्या दर्शनाला घेऊन गेली. गजाननाला साधूच्या पायांवर घालून याला पदरात घ्याअशी बाळूमावशीने प्रार्थना केली. त्यावर हे बालक पूर्वजन्मीचा योगीपुरुष आहे. लवकरच त्याला सिद्धावस्था प्राप्त होऊन हा मोठा साधुपुरुष, योगीराज म्हणून मान्यता पावेल,’ असे योगी नारायण सरस्वती यांनी सांगितले आणि छोट्या गजाननाच्या डोक्यावर हात ठेवला. या स्पर्शातून गजाननाला एक शक्ती मिळाली आणि दुसर्या दिवशी पहाटे त्याला नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ यांचे दृष्टान्त दर्शन झाले व त्यांस सोहम् मंत्र मिळाला. ॐ हंसः सोऽहं ब्रह्मअसा मच्छिंद्रनाथांचा आदेश त्यांना प्राप्त झाला.

यानंतर गजाननामध्ये आंतर्बाह्य परिवर्तन घडून आले व त्याचे योगीराज गजानन महाराज असे नाव विख्यात झाले. काही काळ चिखलीत राहून ते अकोल्याला गेले. तेथे एका पडक्या वाड्यात त्यांनी आपली साधना आरंभली. त्यांचा एक निकटचा मित्र शिवराम गुप्ते त्यांना आग्रहाने आपल्या घरी घेऊन गेला व तो गजानन महाराजांचा पहिला शिष्य बनला.

गजानन महाराज गुप्ते यांना वाचनाची आवड नव्हती व शाब्दिक पांडित्याचा तिटकारा होता. ते कधीही प्रवचन करीत नसत वा उपदेशाचे डोसही पाजत नसत. भक्ताशी ते उत्तम संवाद करीत आणि त्याचे योग्य समाधान करीत असत. त्यामुळे त्यांना व्यक्तिगत भेटीसाठी येणार्या भक्तांची संख्या फार मोठी असे.

गजानन महाराज गुप्ते यांना टापटीप राहण्याची आवड होती. त्यांचा स्वभाव विनोदी, खोडकर; पण निरागस होता. त्यांना थोर साधुसंतांच्या सत्संगाची भारी आवड होती, त्यामुळे शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे श्री साईबाबा, माधान अमरावतीचे गुलाब महाराज, कल्याणचे राममारुती महाराज, यवतमाळचे खटिया महाराज यांना ते जाऊन भेटले होते.

गजानन महाराज भावसमाधीमध्ये तल्लीन होत असत तेव्हा सर्वत्र वेगळाच सुगंध दरवळत असे. लहरीनुसार ते आठवड्यातून केवळ दोनदाच अन्नग्रहण करीत. गुरुनिष्ठा हीच सर्वांत मोठी साधना - भक्ती आहे असा ते सर्वांना उपदेश करीत. वयाच्या चौपन्नाव्या वर्षी श्री क्षेत्र नाशिक येथे त्यांनी सोहम् साधनेतच समाधी घेतली.

विद्याधर ताठे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].