Skip to main content
x

गुप्ते, शांताराम गोपाळ

     शांताराम गो. गुप्ते यांचे वडील सातारा येथे पोस्ट खात्यात नोकरीस होते. त्यामुळे त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण सातारा येथेच झाले. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र सरकारचेे प्रसिद्धी अधिकारी असे मानाचे पद लाभले.

     गुप्ते यांना शाळकरी वयापासून नाटक लिहिण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे इंग्रजी पाचवी-सातवीत असतानाच त्यांनी, महाराणा प्रतापच्या जीवनावर ‘रक्त ध्वज’ आणि तानाजी मालुसरे यांच्या वीरमरणावर आधारित ‘हिरा हरपला’ अशी दोन ऐतिहासिक नाटके लिहिली.

     ‘गणेश नाटक मंडळी’ या नाट्यसंस्थेने ‘हिरा हरपला’ हे नाटक पुण्याच्या किर्लोस्कर नाट्यगृहात ११ डिसेंबर १९२० रोजी सादर केले. लोकमान्य टिळकांच्या दुःखद निधनाचा तो काळ त्या दुःखी पार्श्वभूमीवर हे नाटक त्या काळात चांगलेच गाजले.

     शां.गो.गुप्ते यांना नाटककार म्हणून या पहिल्या नाटकापासूनच मान्यता मिळाली. त्यापुढचा पंचवीस वर्षांचा काळ नाटककार म्हणून त्यांचा संबंध मराठी रंगभूमीशी सतत राहिला.

     गुप्ते यांनी ‘संगीत वेणुनाद’ (१९२३), ‘संधिसंग्राम’ (१९३२) ही दोन पौराणिक नाटके लिहिली. ‘तंट्या भिल्ल’ (१९३७), ‘संगीत दख्खनचा मोहरा’ (१९४९) अशी ऐतिहासिक आणि ‘सीमान्तपूजन’ (१९४४), ‘उपेक्षित’ (१९६२) ही सामाजिक नाटके लिहिली. त्याशिवाय सुभाषबाबूंच्या जीवनावर ‘जयहिंद’ (१९४८) ही कादंबरी त्यांनी लिहिली होती.

      त्या काळात रंगभूमीवर ज्या वेगवेगळ्या नाटकमंडळ्या तग धरून होत्या; त्यांनी गुप्ते यांच्या पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकांचे प्रयोग केले आणि गाजविले. झाशीच्या राणीच्या जीवनावरील त्यांच्या ‘रणरागिणी’ या नाटकावर, त्यातल्या जहाल विषयामुळे, इंग्रज सरकारने बंदी घातली होती; एवढे ते नाटक प्रभावी होते.

     स्वातंत्र्याच्या आकांक्षेने भारावून गेलेल्या जनतेने गुप्ते यांच्या ऐतिहासिक नाटकांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

     गुप्ते यांच्या नाटकांचा भर मुख्यत्वेकरून रंजकतेवर असायचा. त्यामुळे त्यात पदेही असायची. ऐतिहासिक म्हटली तरी नाटकात बराच कल्पनाविलासच असे. तरीही त्या काळात, काळाला अनुसरून योग्य विषय निवडून, प्रेक्षकांच्या मनातले मर्म ओळखून गुप्ते यांनी जी नाटके लिहिली, त्यांची मराठी रंगभूमीला सावरण्यात बरीच मदत झाली असेच दिसून येते.

- मंदाकिनी भारद्वाज

गुप्ते, शांताराम गोपाळ