Skip to main content
x

गुर्जर, विठ्ठल सीताराम

बंगाली भाषेतील कथा-कादंबर्‍यांचे अनुवादक म्हणून परिचित असलेल्या वि. सी. गुर्जर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी ह्या छोट्या खेड्यात झाला. तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. गुर्जरांचे जन्मवर्ष मराठी साहित्याच्या इतिहासात अनेक दृष्टींनी महत्त्वाचे आहे. याच  वर्षी मराठीतील  सुप्रसिद्ध कवी, नाटककार व विनोदकार राम गणेश  गडकरी यांचा जन्म झाला. मराठी काव्याला नवे वळण लावणार्‍या कवी केशवसुतांची पहिली कविता याच साली प्रकाशित झाली. मराठी वास्तववादी कादंबरीचे जनक हरिभाऊ आपटे यांची ‘मधली स्थिती’ ही पहिली कादंबरी याच वर्षी प्रसिद्ध झाली. वि. सी. गुर्जरांचे वडील सीतारामपंत गुर्जर हे जुन्या पिढीतील एक नामांकित वकील होते. नाटक, कादंबरी आणि कविता ह्या तीनही वाङ्मय प्रकारांत सीतारामपंतांनी विपुल लेखन केले होते. ‘उदार दामोदर’ व ‘संगीत रत्नावलि’  ही दोन नाटके व ‘सीता’ ह्या कादंबरीचे लेखन केले. लहानपणापासून वाचनाची आवड असलेल्या वि.सी.गुर्जरांना आपल्या साहित्यप्रेमी लेखक-वडिलांचा वारसा प्रेरणादायी ठरला.

कशेळी येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर गुर्जर पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले. एल्फिन्स्टन हायस्कूलमधून प्रवेश-परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये पुढील शिक्षण घेऊ लागले. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बी. ए. ची पदवी मिळू शकली नाही. विद्यार्थिदशेत काव्यलेखनाला प्रारंभ करणारे गुर्जर त्या काळातील लोकप्रिय कवी बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या प्रभावाखाली होते. गिरगावातील फणसवाडीत जगन्नाथाच्या चाळीत राहत असताना मासिक ‘मनोरंजन’चा अंक योगायोगाने गुर्जरांना मिळाला. आपली कविता मासिक ‘मनोरंजन’मध्ये छापून यावी, या उत्कट इच्छेने ‘होई परी मजवरी अनुरक्त ना ती’ ही कविता ‘एल्फिन्स्टोनियन’ ह्या नावाने संपादकाकडे पाठवून दिली. सव्वा वर्षाने जून १९०३च्या ‘मनोरंजन’मध्ये ती कविता प्रसिद्ध झाली. त्याच वेळी गुर्जरांच्या साहित्यविषयक जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली. मासिक ‘मनोरंजन’चे संपादक का.र.मित्र  हे गुर्जरांचे निकटचे स्नेही झाले. त्यांनी गुर्जरांचे लक्ष अन्य लेखनाकडे वळवले. कथालेखन आणि इतर भाषांतील साहित्याचा अनुवाद किंवा भाषांतर करावे, असे गुर्जरांना सुचवले. मार्क ट्वेनच्या एका कथेचा ‘प्रायव्हेट सेक्रेटरी’ ह्या नावाने केलेला पहिला अनुवाद ‘मनोरंजन’च्या ऑगस्ट १९०६च्या अंकात प्रसिद्ध झाला.

बंगाली भाषेचे अभ्यासक असलेल्या का.र.मित्र यांनी काही बंगाली कादंबर्‍यांचे अनुवाद ‘मनोरंजन’मध्ये प्रसिद्ध केले होते. त्याचा प्रभाव गुर्जरांवर इतका पडला की, ते बंगाली भाषा शिकले. बंगाली कथांचे, कादंबर्‍यांचे विपुल वाचन गुर्जरांनी केले. गुर्जरांना अधिक प्रभावित केले ते प्रभातकुमार मुखर्जी ह्यांच्या वाङ्मयाने. त्यांनी मुखर्जींच्या काही कादंबर्‍यांचे व कथांचे अनुवाद मासिक ‘मनोरंजन’साठी मराठीत केले. प्रभातकुमारांचे चरित्र मराठीत लिहिले. हरी नारायण आपट्यांच्या सोप्या हृदयंगम लेखनपद्धतीचा परिणाम गुर्जरांच्या मनावर झाला होता. बंगाली-मराठीतील श्रेष्ठ लेखकांच्या लेखनगुणांवर लुब्ध झालेल्या गुर्जरांनी अनेक कथांप्रमाणे प्रभात कुमार मुखर्जींच्या ‘रत्नदीप’ (पौर्णिमेचा चंद्र), ‘नवीन संन्यासी’ (संसार असार), ‘स्वप्नभंग’ अशा काही आधारित कादंबर्‍या लिहिल्या.

गुर्जर कालखंड-

१९०५ ते १९६२ ह्या प्रदीर्घ कालखंडात गुर्जरांनी सातत्याने कथालेखन केले असले, तरी त्यांच्या साहित्याची छाप ‘मनोरंजन’च्या कालखंडात मराठी कथा-वाङ्मयावर स्पष्टपणे उमटलेली दिसते. म्हणूनच मराठी कथेच्या इतिहासात हा कालखंड ‘गुर्जर कालखंड’ म्हणून ओळखला जातो. तंत्रवादापेक्षा रसवत्ता आणि रंजकता यांना गुर्जर अधिक महत्त्व देत. तत्त्वबोध, उपदेशपरता, समाजहिताची धारणा या गुणांपेक्षा रंजकता, सौंदर्याचा आविष्कार, रसनिष्पत्तीला प्राधान्य देणार्‍या गुर्जरांची कथा मराठी कथाविश्वातील ‘प्रसन्न’ कथा आहे. हरी नारायण आपटे यांची अखेर आणि ना.सी.फडके यांचा उदय या मधल्या काळात गुर्जरांच्या कथेचे मराठी कथेवर प्रभुत्व होते. स्वतंत्र आणि रूपांतरित अशा दोन्ही प्रकारच्या कथा लिहिणार्‍या गुर्जरांचे अनुवाद-कौशल्य वादातीत आहे. बंगाली  भाषेचे सूक्ष्म आकलन, कलावंताकडून अपेक्षित असणारी समरसता आणि सहृदयता, भावाविष्काराचे सामर्थ्य या गुणांमुळे गुर्जरांच्या अनुवादित कथांना स्वतंत्र कथांचा दर्जा प्राप्त झाला आहे. केवळ प्रभातकुमार मुखर्जींच्याच कथांचे, कादंबर्‍यांचे अनुवाद गुर्जरांनी केले नाहीत. रवींद्रनाथ ठाकूर, शरच्चंद्र चटर्जी, रमेशचंद्र दत्त, राखालदास बानर्जी, कालिप्रसन्न दासगुप्ता इत्यादी बंगालीतील लोकप्रिय लेखकांच्या कादंबर्‍यांचे अनुवाद केले. गुर्जरांच्या व्यक्तिमत्त्व स्पर्शामुळे त्यांचे कथांचे, कादंबर्‍यांचे अनुवाद शाब्दिक भाषांतरापेक्षा स्वतंत्र रूपांतराकडे झुकतात. १९१२ पासून ‘मनोरंजन’चे सहसंपादक म्हणून वि. सी. गुर्जरांनी काम केले. प्रकृतीच्या कारणास्तव १९२० साली मुंबई सोडून ते कशेळी या आपल्या मूळ गावी स्थायिक झाले. पुढे जीवनाच्या अखेरपर्यंत म्हणजे चाळीस वर्षे तिथे राहून त्यांनी लेखन, वाचन सुरू ठेवले. वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी भाषांतरे व कथालेखन केले. मनोरंजन, चित्तविनोद कथामाला, नवयुग, विविधवृत्त, सत्यकथा, वसंत आदी प्रमुख नियतकालिकांत आणि इतर समकालीन मासिकांत प्रसिद्ध झालेल्या गुर्जरांच्या कथांची संख्या ८०० पेक्षा अधिक भरेल. २४ कादंबर्‍यांचे अनुवाद, ९ नाटके, संग्रह, १ विनोदी लेखसंग्रह अशी विपुल साहित्यनिर्मिती करणार्‍या गुर्जरांचा ‘द्राक्षांचे घोस’ हा एकमेव कथासंग्रह पुण्याच्या मॉडर्न बुक डेपो ह्या प्रकाशन संस्थेने १९२६ साली आणि भीमराव कुलकर्णी संपादित ‘गुर्जर कथा’ हा संग्रह १९८५ साली पुण्याच्याच रविराज प्रकाशनाने प्रसिद्ध केला. मराठीत स्वतंत्र आणि अनुवादित कथांची लक्षणीय भर घालणार्‍या गुर्जरांच्या कथांना ग्रंथरूप प्राप्त न होणे, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या कथा ७०-८० नियतकालिकांत विखुरलेल्या राहिल्या.

वि. सी. गुर्जरांनी कीर्तीसाठी किंवा ध्येयासाठी कथालेखन केले नाही. मनोरंजनातच लेखन-साफल्य मानणार्‍या गुर्जरांनी बिननावाने, टोपणनावाने लेखन केले. ‘माझ्या सर्वच लेखनाचे श्रेय मला न देता टीकाकारांनी ते दुसर्‍याला दिले, तरी मला यत्किंचितही विषाद वाटणार नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘द्राक्षांचे घोस’च्या प्रस्तावनेत व्यक्त केली आहे.

१९०५ पासून त्यांचा वावर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, मामा वरेरकर ह्या नाटककारांमध्ये होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना गुर्जर गुरुस्थानी मानत. त्यांच्या एका नाटकाची काही पदे आणि राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ ह्या गाजलेल्या नाटकाची पदे गुर्जरांनी लिहिली. ‘नंदकुमार’ व ‘राजलक्ष्मी’ ही संगीत नाटके लिहिली. श्री.कृ.कोल्हटकरांचे विनोदी लेखन आवडल्याने ‘सोमेश्वर शास्त्र्यांचे पुराण’ हे गुर्जरांचे लेखनही अज्ञातच राहिले.

‘कथा हा वि. सी. गुर्जरांच्या प्रतिभेला विशेष मानवलेला प्रकार. या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य मराठीत अविस्मरणीय ठरले आहे. रूपांतरापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली असली, तरी त्याला स्वतंत्र कलात्मक रूप देण्याचे कार्य गुर्जरांच्या कथेनेच प्रामुख्याने केले... विशेषतः इ. स. १९१० ते १९३० या कालखंडात मराठी कथेला वळण लावण्याचे व त्याला एक वाङ्मयप्रकार म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य प्रामुख्याने गुर्जरांच्या ‘संपूर्ण गोष्टी’ने केले,’ या शब्दांत मराठी कथेचे ज्येष्ठ अभ्यासक म. ना. अदवंत यांनी गुर्जरांचा गौरव केला आहे.

१९०२ ते १९६२ ह्या साठ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात गुर्जरांनी काव्य, नाटक, कादंबरी, विनोदी लेख व काही प्रमाणात समीक्षा ह्या साहित्याच्या विविध क्षेत्रांत विहार केला. प्रारंभी मुंबईत आणि अखेरीस कशेळीसारख्या आडवळणी खेड्यात राहून त्यांनी साहित्यसाधना केली. विपुल लेखन करूनही आपल्या लेखनाचा दर्जा त्यांनी निश्चितपणे सांभाळला. रसिकांचे निर्भेळ रंजन करण्याची आणि साहित्याशी एकनिष्ठ राहण्याची भूमिका शेवटपर्यंत निभावली. त्यामुळेच मराठी कथेच्या इतिहासात वि. सी. गुर्जरांच्या प्रसन्न कथेची मुद्रा विशिष्ट कालखंडात ठळकपणे उमटत राहिली.

- वि. शं. चौघुले

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].