घाणेकर, काशिनाथ बाळकृष्ण
काशिनाथ बाळकृष्ण घाणेकर यांचा जन्म कोकणातील राजापूर या गावी झाला. त्यांच्या जन्माच्या वेळेस त्यांची आत्या काशीयात्रा करून परत आल्यामुळे त्यांचे नाव ‘काशिनाथ’ ठेवण्यात आले होते. त्यांच्या आईचे नाव यमुनाबाई होते. चिपळूण येथून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या एस.पी. महाविद्यालयात प्रवेश घेतला. एक वर्ष तेथे शिक्षण घेतल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीला गेले. तेथे खऱ्या अर्थाने त्यांचा नाट्यसृष्टीशी परिचय झाला व त्यांनी महाविद्यालयाच्या अनेक नाटकांमध्ये काम केले.
एम.डी. होण्याचे आपले स्वप्न पूर्ण होणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयात इंटरसायन्सला प्रवेश घेतला. खरे तर त्यांना सर्जन व्हायचे होते, पण थोडे गुण कमी मिळाल्यामुळे त्यांना सर्जरीला जाता आले नाही. त्यामुळे मोठ्या भावाच्या सल्ल्यानुसार त्यांनी दंतवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९५७ मध्ये घाणेकर बी.डी.एस.च्या परीक्षेत मुंबई विद्यापीठात पहिले सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. त्यानंतर त्यांनी जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयात व्याख्याता म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली आणि पुढे वर्षभरातच त्यांनी स्वत:चा दवाखाना सुरू केला.
परंतु उपजतच्या अभिनयकलेमुळे काशिनाथ घाणेकर यांनी नाटकांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. नाटकामध्ये यशस्वी कारकिर्द घडवणाऱ्या काशिनाथ घाणेकर यांनी चित्रपटातही काम करायला सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट होता ‘पाहू रे किती वाट’. हा चित्रपट राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केला होता. यामध्ये त्यांच्यासोबत अरुण सरनाईक, सीमा यांनी अभिनय केला होता. यातील नायिकेच्या धाकट्या भावाची भूमिका डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी केली होती. त्यांची नायिका होती उमा. त्यानंतर त्यांना भालजी पेंढारकर यांच्या ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात ‘भाव्या’ नावाच्या शिलेदाराचे काल्पनिक पात्र त्यांच्या वाट्याला आले होते. ही भूमिका छोटी असली तरी त्यांच्यावर चित्रित झालेले ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ हे गीत रसिकांच्या आजही तितकेच लक्षात आहे.
काशिनाथ घाणेकर यांचा अभिनय असलेला आणखी एक चित्रपट म्हणजे ‘सुखाची सावली’. हा चित्रपट सुमती क्षेत्रमाडे यांच्या ‘वृंदा’ या कादंबरीवर आधारित होता, तर दिग्दर्शक गजानन जागीरदार, संगीतकार दत्ता डावजेकर व अभिनेत्री जयश्री गडकर अशा दिग्गजांचा त्यात सहभाग होता.
लागोपाठ दोन चित्रपट अपयशी ठरल्यावर काशिनाथ घाणेकर यांची चित्रपट कारकिर्द संपुष्टात येते की, काय असे वाटत असतानाच त्यांना श्रीपाद चित्रतर्फे राजाभाऊ परांजपे यांच्या दिग्दर्शनाखाली ‘पाठलाग’ या मराठीतील पहिल्या रहस्यमय चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील भूमिकेसाठी काशिनाथ घाणेकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट विलक्षण यशस्वी ठरल्यावर त्यांच्याकडे ‘लक्ष्मी आली घरा’ या चित्रपटातील भूमिका चालून आली. हा चित्रपट चंद्रकांत काकोडकर यांच्या ‘वंदना’ या कौटुंबिक कादंबरीवर आधारलेला होता. दोन भावांच्या या कथेतील मोठ्या भावाची भूमिका चंद्रकांत करणार होते, तर वहिनीच्या भूमिकेसाठी सुलोचनाबाईंची निवड झाली होती व लहान भावाच्या भूमिकेसाठी घाणेकर यांना घेण्यात आले होते. १९६५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर ते राजा परांजपे यांच्या ‘पडछाया’ या चित्रपटामध्ये रमेश देव यांच्या मुलाच्या भूमिकेत चमकले.
या दोन चित्रपटातील अभिनय पाहून सुलोचनाबाईंनी ‘दादी-माँ’ या हिंदी चित्रपटासाठी घाणेकर यांचे नाव सुचवले व घाणेकर यांना या चित्रपटात काम करण्यासाठी बोलावण्यात आले. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांना लगेच ‘अभिलाषा’ या नव्या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली व त्यानंतर त्यांनी ‘मधुचंद्र’ या नव्या मराठी चित्रपटासाठी करार केला. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजदत्त. प्रभाकर ताम्हाणे यांच्या ‘अल्ला जाने क्या होगा’ या कथेवर आधारलेल्या चित्रपटासाठी नायिका म्हणून उमा यांची निवड करण्यात आली होती. या चित्रपटाला एन.दत्ता यांनी संगीत दिले होते. यामध्ये त्यांनी वठवलेली खेळकर दिनूची भूमिकाही खूपच गाजली. पुढे त्यांना ‘एकटी’ या राम केळकर यांची पटकथा-संवाद व राजा ठाकूर यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात मधूची भूमिका मिळाली होती.
कालांतराने त्यांनी ‘देवमाणूस’ व ‘झेप’ या चित्रपटांमध्ये काम केले. पण हे दोन्ही चित्रपट अजिबात चालले नाहीत. त्यानंतर त्यांनी ‘चंद्र आहे साक्षीला’ या चित्रपटात काम केले. पण तोही चित्रपट फारसा चालला नाही. ‘गारंबीचा बापू’ या चित्रपटातील इरसाल बापूची त्यांची भूमिका प्रेक्षकप्रिय ठरली होती. ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटात त्यांनी केलेली मानसोपचारतज्ज्ञाची भूमिकाही लोकप्रिय झाली. त्यानंतर मात्र त्यांनी चित्रपटांमधून फारशा भूमिका केल्या नाहीत.
चित्रपटामध्ये आपली यशस्वी कारकीर्द निर्माण करणाऱ्या काशिनाथ घाणेकर यांना विशेष रस होता तो नाटकातील अभिनयामध्ये. अशा या अभिनेत्याचे ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाच्या दौऱ्यावर असतानाच, अमरावती येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
- डॉ. अर्चना कुडतरकर