Skip to main content
x

घाटगे, विष्णू माधव

     आधुनिक भारतात आजपर्यंत केवळ एकच विमानरचना शास्त्रज्ञ होऊन गेले, ते म्हणजे डॉ.विष्णुपंत घाटगे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय वायुसेनेला प्रशिक्षणार्थी विमाने - एचटी-२  व एचजेटी-१६ बनवून देण्याचे श्रेय त्यांना जाते. त्याचप्रमाणे पुष्पक व कृषक ही विमानेसुद्धा खूपच गाजली. भारतात विमानरचना संशोधनासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘हवाई बोगद्यां’ची निर्मिती हेसुद्धा त्यांनीच साकारले आणि याहूनही महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी विमानरचनाशास्राची ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू’ व ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड, बंगळुरू’ येथे नवीन विद्याशाखा सुरू करून भारतात याचा पाया घातला. त्यांच्या हाताखाली तयार झालेले शास्रज्ञ व तंत्रज्ञच आता या विभागांमधून महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत.

     त्यांचा जन्म हसूरचंपू (गडहिंग्लज तालुका, कोल्हापूर) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. त्यानंतर ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयामधून त्यांनी बी.एस्सी. व एम.एस्सी. या पदव्या घेतल्या. १९३२ ते १९३६ या काळात त्यांनी जर्मनीतील गेटिंजनच्या ‘कायसर विल्हेम’ या संस्थेतून विमानविद्या (एरोनॉटिकल इंजिनिअरिंग) शाखेची डॉक्टरेट मिळविली. त्यानंतर १९३६ ते १९४२ या काळात त्यांनी मुंबईच्या रुइया व एल्फिन्स्टन आणि पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात अध्यापन केले. १९४२ साली ते बंगलोरला आले व तेथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये त्यांनी सर्वप्रथम विमानविद्या विभाग सुरू केला. विमानरचनाशास्त्राची मुहूर्तमेढही येथेच करण्यात आली. तुटपुंज्या सुविधांमुळे संशोधनास अडथळा येतो असे लक्षात येऊन त्यांनी तेथे ‘हवाई बोगद्या’ची (विंड टनेल) निर्मिती केली. १९४६ साली एका ब्रिटिश माणसाची विभागप्रमुख म्हणून नेमणूक झाल्याने त्यांना दिलेल्या वागणूकीमुळे ते काही वेळ निराश व खट्टू झाले. पण लगेचच त्यांना बंगलोरच्याच ‘हिंदुस्थान एअरक्राफ्ट’ या वालचंद हिराचंद कारखान्यात विमानरचनाशास्त्र विभाग सुरू करण्याचे आमंत्रण आले व त्यांनी ते आव्हान म्हणून स्वीकारले.

     १९४७ ते १९७१ या काळात त्यांनी विमानरचनाशास्त्र या विभागाचा पाया भक्कम केला. त्यांनी स्वतंत्र भारताला शेतीउपयोगी विमान व भारतीय वायुसेनेसाठी प्राथमिक प्रशिक्षणास आवश्यक असे विमान करण्याचे ठरविले व ती त्याच कारखान्यात बनविली. भारतीय वायुसेनेमध्ये एचटी-२  हे विमान १९९० सालापर्यंत कार्यरत होते. त्याचप्रमाणे नंतर त्यांनी एचजेटी-१६ हे प्रशिक्षणार्थी जेट विमान बनविले. १९६० सालाच्या आसपास कृष्ण मेनन हे संरक्षणमंत्री असताना त्यांनी जर्मनीच्या डॉ. कुर्ट टॅक यांना भारतीय वायुसेनेसाठी लढाऊ जेट विमान बनविण्यासाठी आमंत्रित केले. या घटनेने डॉ. घाटगे व्यथित झाले होते व भारतीय विमानरचना शास्त्रज्ञांवर दाखविलेला हा एक अविश्वासच आहे, असेच त्यांचे मत होते. त्याचप्रमाणे पुढेही भारतीय वायुसेनेसाठी परदेशातून परवाना घेऊन भारतात विमान बनविण्याची प्रक्रियासुद्धा त्यांना अजिबात पसंत नव्हती. भारतातच संशोधनासाठी संपूर्ण सुविधा निर्माण करून भारतीयांकडूनच तंत्रज्ञानविषयक प्रगती करून घ्यावी, असे त्यांचे ठाम मत होते.

     डॉ. घाटगे यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे असून, निवृत्तीनंतर त्यांनी बऱ्याच संस्थांमधून योगदान दिले. ते एक उत्तम खेळाडू तर होतेच, पण त्याचबरोबर खिलाडूवृत्तीचेही होते. १९६५ साली त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. १९७२ साली कोल्हापूरच्या मराठी विज्ञान संमेलनात त्यांचा गौरव करण्यात आला होता. बाकीही इतर बरेच गौरव त्यांना प्राप्त झाले. बऱ्याच संस्थांचे ते माननीय सदस्य होते.

- डॉ. सदानंद कुलकर्णी

घाटगे, विष्णू माधव