Skip to main content
x

घोलप, बाबुराव रामचंद्र

     बाबुराव रामचंद्र घोलप यांचा जन्म वाफगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे झाला. त्यांचे वडील पोलीस खात्यात कामाला होते तर आजोबा शेतकरी होते. प्राथमिक शिक्षण घेत असताना बाबुरावांनी शाळेत कायम प्रथम क्रमांक पटकाविला. चौथीत पहिले आल्यावर पुढील शिक्षणालाही त्यांना पुण्याला यावे लागले. पुण्याजवळील औंध भागातील प्राथमिक शाळेत प्रवेश घेऊन त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. आठवीला नूतन मराठी विद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते शिष्यवृत्तीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होण्याअगोदरच आईवडील निवर्तले. १९२० मध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन बाबुराव उच्च शिक्षणासाठी फर्गसन महाविद्यालयात आले. १९२४ मध्ये ते बी. ए. झाले. घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला व ते गुरूवर्य बाबुराव जगताप यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी मराठा विद्यालय, पुणे या संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी करू लागले. शिक्षण सोडायचे नाही हा निश्‍चय असल्याने त्यांनी विधी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला.

     याच काळात त्यांचा विवाह (१९२६) आंबेगाव तालुक्यातील चांदोली बु. गावातील अनंतराव बळवंतराव थोरात यांची कन्या भागीरथी हिच्याशी झाला. १९२७ मध्ये घोलप वकिलीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. १९२७ ते ३३ या काळात त्यांनी शिरूर व तळेगाव ढमढेरे, सासवड, पुणे येथे वकिली केली. वकिली करीत असताना लोकांची भांडणे, सामान्य जनतेवर होणारे अन्याय यांचा त्यांना उबग आल्याने त्यांनी वकिली सोडण्याचा निर्णय घेतला. बडोदा संस्थानांमध्ये नोकरीसाठी महाराज सयाजीराव गायकवाड यांचे निमंत्रण नाकारून पुणे जिल्हा लोकल बोर्डात १९ मे १९३३ रोजी ते ‘मुख्य अधिकारी’ झाले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी मुंबई राज्यात पुणे जिल्हा लोकल बोर्ड सर्वप्रथम आणले. बोर्डाची आर्थिक स्थिती सुधारून त्यांनी सर्वांगीण विकास घडवून आणला. या पदावर काम करीत असताना गावोगावी ते तपासणीसाठी जात असत. त्यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना केली. ते शेवटपर्यंत या संस्थेचे मानद सचिव  होते. १९१३ ते १९५९ अशी सलग २६ वर्षे त्यांनी मुख्य अधिकारी म्हणून काम पाहिले.

     भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर घोलप राज्यशासनाच्या दुष्काळ निवारण समितीचे सदस्य झाले. पुणे शहरात असणारी जिल्हा परिषदेची इमारत घोलप यांच्या मार्गदर्शनानुसार आकाराला आली.

     पुणे जिल्हा शिक्षण मंडळ (पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन, पुणे) ही संस्था ५ नोव्हेंबर १९४१ रोजी अस्तित्वात आली. या संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब आपटे, उपाध्यक्ष बापूसाहेब जेधे व मानद सचिव आणि खजिनदार म्हणून बाबुराव घोलप यांची निवड करण्यात आली. पुणे जिल्ह्यात ज्या ठिकाणी प्राथमिक शाळा नाहीत तेथे प्राथमिक शाळा काढण्याचे ठरले. पहिल्या ५ वर्षांतच संस्थेने १०० हून अधिक व्हॉलंटरी शाळा काढल्या. जुन्नर, खेड, आंबेगाव भागातील ५१ शाळा शिक्षकांसह पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडे आल्या. १९५६ पर्यंत संस्थेच्या ३७६ शाळा झाल्या. १९५६ पासून इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू करण्यात आल्या. या काळात घोलप यांनी शिक्षणप्रसाराला अडथळा आणणारे नियम शिक्षणमंत्री नामदार बाळासाहेब खेर यांच्या मदतीने बदलले. यामुळे पुणे, सातारा, नाशिक या जिल्ह्यांत अनेक शाळा सुरू झाल्या. याच काळात संस्थेचे कार्यालय जिल्हा परिषदेच्या आवारातून पौड फाटा सर्व्हे क्र. ४८/१ येथे स्थलांतरित झाले. येथूनच पुढे संस्थेने भव्य स्वप्ने पाहायला सुरुवात केली. यातूनच १९७० मध्ये ओतूर येथे पहिले महाविद्यालय सुरू करण्यात आले. पुढे या महाविद्यालयाचे नामकरण ‘अण्णासाहेब वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ओतूर’ असे करण्यात आले. पुढे हडपसर, सासवड येथे महाविद्यालये सुरू झाली.

     या सगळ्या कालखंडात घोलप यांचा संबंध अन्य संस्थांशी सुद्धा आला. त्यात श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलीटरी स्कूल, पुणेचे खजिनदार, सेक्रेटरी स्टॅलिंग समिती अध्यक्ष, डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनचे स्टॅर्लिंग कमिटी मेंबर, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणेचे हितचिंतक, पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य, एस.एस.जी.डी. वर्गाचे मानद शिक्षक, पब्लिक सर्व्हिस कमिशनचे सदस्य अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. अशाच २२ विविध शैक्षणिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध होते. त्यांनी रयत शिक्षण संस्थेला यशवंतराव होळकर यांचा वाफगाव येथील वाडा मिळवून दिला.

      १९७३ मध्ये ७८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल घोलप यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारात मिळालेले एक लाख रूपये त्यांनी स्वत:कडून भर घालून संस्थेलाच परत केले.

- प्रा. गणेश द. राऊत

घोलप, बाबुराव रामचंद्र