घोटकर, पांडुरंग अण्णासाहेब
ढोलकीसम्राट पांडुरंग अण्णासाहेब घोटकर यांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा होते. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यास असते. अनसूया व अण्णा हे त्यांचे आईवडील होत. रेणुराई गोंधळी समाजात संबळ वाजवण्याची कला पिढीजात असते, त्यानुसार वयाच्या आठव्या वर्षापासून पांडुरंग वडील अण्णासाहेब घोटकर यांच्याकडे संबळ वाजवण्यास शिकू लागले. अभ्यासापेक्षा संगीताकडे कल असल्याने दहाव्या वर्षापासून त्यांनी नांदेडला मामा लक्ष्मण काटे यांच्याकडे तबला व पखवाजाचे धडे घेतले. ढोलकी व तबल्याची साथ करताना गाणे रंगवण्याच्या उपजत गुणामुळे लवकरच ते लावणी गायिकांचे दिवाणखाने वाजवू गाजवू लागले. वयाच्या दहाव्या वर्षीच १९५८ साली परभणी जिल्ह्यातील शिंगणापूर येथील तमाशा स्पर्धेतील त्यांच्या वादनापासून त्यांचे नाव वाखाणले जाऊ लागले. द्वारका-मथुरा समसापूरकर यांच्या संगीतबारीत त्यांना प्रथमच वाजवायची संधी मिळाली. तेव्हापासून ते व्यावसायिक संगीतबाऱ्यांमध्ये ढोलकी, संबळ, इ. लोकतालवाद्ये व तबलाही वाजवू लागले.
ते १९६० मध्ये पुण्यात आले व नृत्यशिक्षक बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथक नृत्यास साथ करू लागले. बाळासाहेबांनी पुत्रवत प्रेमाने पांडुरंगांंना सांभाळले व त्यांना पं. जी.एल. सामंत यांच्याकडे तबला शिकण्यास पाठवले. पं. सामंत यांच्याकडे पांडुरंग दहा वर्षे तबला शिकले. नंतर मुंबईमधील पिला हाउस थिएटरमध्ये त्यांना प्रसिद्ध तबलानवाज उस्ताद आमिर हुसेन खान यांच्याकडून शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळाले. एखादा कार्यक्रम कसा पेश करावा याचे मार्गदर्शन त्यांना लावणी अभ्यासक अण्णासाहेब इनामदार यांच्याकडून मिळाले.
भारत-चीन युद्धादरम्यान १९६४ मध्ये जवानांच्या मनोरंजनासाठी संजीवनी बीडकर यांच्या कलापथकासह पांडुरंगरावांनी नेफा आघाडीवर दोन महिने दौरा केला. पुढे राधाबाई बुधगावकर, कमलाबाई फुलाबाई कळमकर, यमुनाबाई वाईकर, मथुराबाई इंदुरीकर, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, मधू कांबीकर, प्रभा काळे, छाया पंढरपूरकर, इ. लावणी कलावंतांची साथ त्यांनी अनेक वर्षे केली. लक्ष्मीबाईंबरोबर बतावणीचा प्रसंग ते फार खुमासदारपणे रंगवीत. दादू इंदुरीकर यांच्या ‘गाढवाचं लग्न’ या गाजलेल्या वगनाट्यासही ते साथ करीत. ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘आतून कीर्तन वरून तमाशा’, ‘उधे ग अंबे उधे’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘एक नार चार बेजार’ अशा लोकप्रिय वगनाट्यांतही त्यांचा सहभाग होता. लालबागच्या न्यू हनुमान थिएटरमध्ये त्यांनी बरीच वर्षे वादन केले. बीडचे नवरंग थिएटर उभारण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.
पारंपरिक लावणी कलावंतांचे शेकडो कार्यक्रम व ध्वनिमुद्रणे यांसाठी त्यांनी साथ केली. संगीत नाटक अकादमीच्या संग्रहालयासाठी त्यांनी यमुनाबाई, भामाबाई, गौराबाई, लक्ष्मीबाई यांच्या लावणीगायनास साथ केली. एच.एम.व्ही. रेकॉर्डिंग कंपनीमध्ये रोशन सातारकर, सुलोचना चव्हाण, गुलाबबाई संगमनेरकर यांच्या लावण्यांच्या ध्वनिमुद्रणांना त्यांनी साथ केली. मुंबईतील चित्रपटसृष्टीतही ध्वनिमुद्रणांसाठी ते साथ करू लागले. राम कदम, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, विश्वनाथ मोरे, विठ्ठल शिंदे, बाळ पळसुले, इ. मराठी संगीतकार, तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, बप्पी लाहिरी यांपासून अन्नू मलिकपर्यंतच्या कित्येक हिंदी संगीतकारांसाठी त्यांनी ध्वनिमुद्रणांत साथ केली. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, शोभा गुर्टू, उत्तरा केळकर, अनुराधा पौडवाल यांच्या चित्रपटगीतांना त्यांनी साथ केली.
‘अपनापन’ (१९७७) या हिंदी चित्रपटातील अरुणा इराणी यांच्यावर चित्रित झालेल्या ‘दिलपे जरा हाथ रखलो बाबू, फिर गंगूबाई की चाल देखो’ या गाण्यात पांडुरंगरावांनीही अभिनय केला आणि तेव्हापासून त्यांची पडद्यावरील कारकीर्द सुरू झाली. अनेक मराठी व हिंदी चित्रपटांत त्यांचे ढोलकीवादक म्हणून व बतावणीच्या प्रसंगांत दर्शन घडले आहे. ‘जोतिबाचा नवस’, ‘साताऱ्याची तऱ्हा’, ‘तेवढं सोडून बोला’, ‘फटाकडी’, ‘एक होता विदूषक’ आदी चित्रपटांमधील लावण्या व गाण्यांना त्यांनी ढोलकी, तबला आणि संबळाची साथ दिली. ‘फटाकडी’ या चित्रपटातील ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ हे अभिनेत्री रेखावर चित्रित झालेले गाणे खूप गाजले.
मुंबईमध्ये न्यू हनुमान थिएटरमध्ये काम करत असताना जपानहून आलेल्या समितीतील लोकसंगीताचे अभ्यासक डॉ. फुजी यांनी पांडुरंग घोटकरांची निवड केली आणि १९८१ साली घोटकरांनी जपानला प्रथम परदेशवारी केली. जपानमधील टोकियो येथे ‘नॅशनल ऑॅडिटोरिअम’ येथे त्यांनी कार्यक्रम सादर केला. त्यांच्यासह माधव कुदळे, प्रभा काळे, बानू कोल्हापूरकर व शाहीर विभूते हे कलाकार होते व या दौऱ्यात परदेशात लावणी प्रथम सादर झाली. नंतर मॉरिशस (शाहीर साबळ्यांसह, १९९१), दुबई (सखी माझी लावणी, २००३), रशिया, इंडोनेशिया व जपान (२०१०) या देशांमध्येही त्यांनी कार्यक्रम सादर केले.
पांडुरंग घोटकर हे केवळ ढोलकी साथीदार नसून कार्यक्रमांची उत्तम आखणी व बांधणी करणारे लावणी कलाकारांचे मार्गदर्शक व खुसखुशीत ‘बतावणी’ करणारे कलाकार आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे होणाऱ्या तमाशा महोत्सव, लावणी समारोह, ‘अपना उत्सव’ सारखे लोककला मेळे यांत त्यांनी खूप वर्षे कलाप्रस्तुती केली व कित्येक कार्यक्रमांचे दिग्दर्शनही केले. २६ जानेवारी १९७७ रोजी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मधू कांबीकर यांच्याबरोबर संबळ वाजवत असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना खुलेपणाने दाद दिली होती.
डॉ. अशोक दा. रानडे यांच्या ‘बैठकीची लावणी’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासही त्यांनी साथ दिली, तेव्हा पु.ल. देशपांडे यांनी पांडुरंग घोटकरांना दिलखुलास दाद दिली होती. ‘फुलोरा’, ‘लावणी रूपदर्शन’, ‘सखी माझी लावणी’ या लावणीवरील विशेष कार्यक्रमांत त्यांचा सहभाग होता. मधुकर नेराळे यांच्यासह त्यांनी उत्तर भारतातील अनेक आकाशवाणीच्या केंद्रांसाठी कार्यक्रम केले.
लावणीबरोबर ढोलकीची साथ करण्याबरोबरच त्यांनी काही वेगळे प्रयोगही केले. ‘एन.सी.पी.ए.’मध्ये रोशनकुमारी व फकीर मुहंमद (कथक व तबला) यांच्याबरोबर त्यांनी जुगलबंदी केली. डॉ. अशोक दा. रानडे यांच्या ‘स्वरचक्र’ (१९९३) या कार्यक्रमात त्यांनी तबला, पखवाज या वाद्यांबरोबर सहवादन केले. ‘दूरदर्शन’वरील ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या कार्यक्रमात अर्जुन शेजवळ (पखवाज) व भाई गायतोंडे (तबला) यांच्याबरोबर सहवादन केले. एन.सी.पी.ए.ने प्रस्तुत केलेल्या ‘टेम्प्ट मी नॉट’ (‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्याचा इंग्रजी अवतार, डॉ. रानडे यांचे संगीतदिग्दर्शन, १९९३) या नाटकासाठी त्यांनी साथ केली. पं. बिरजू महाराज व यमुनाबाई वाईकर यांच्या कथक व लावणीच्या सहप्रस्तुतीतही त्यांनी आपल्या साथीने रंग भरला होता.
लावणीचा पारंपरिक बाज जपण्यासाठी ते आज अनेक तरुण लावणी कलाकारांना मार्गदर्शन करतात. शासनातर्फे होणाऱ्या कलाशिबिरांमध्ये ते अनेक वर्षे शिकवत आहेत व त्यांत सुमारे २०० लोककलाकारांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. कुसुम नेर्लेकर, मधू कांबीकर, छाया खुटेगावकर, राजश्री नगरकर, रेश्मा परितेकर यांसारख्या लावणी कलाकारांना घडवण्यात घोटकरांचा मोठा वाटा आहे. शंकर घोटकर (भाऊ), कृष्णा मुसळे (मुलगा) व मधुबने, बापट अशा इतर अनेकांना त्यांनी ढोलकी, संबळ, तबला ही वाद्ये शिकवली आहेत. महाराष्ट्रातील पारंपरिक लोकवाद्यांची पेशकश असणारा स्वतंत्र कार्यक्रमही ते सादर करतात. महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार (२००२) व अकलूजचा ‘शंकरराव मोहिते पाटील’ पुरस्कार (२००९) देऊन घोटकरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला .