Skip to main content
x

हडप, विठ्ठल वामन

     विठ्ठल वामन हडप यांचा जन्म कोतकाम्ता, जि. रत्नागिरी येथे झाला. त्यांचे शिक्षण पुणे व मुंबई येथे झाले. वयाच्या सतराव्या वर्षी ‘झाकली मूठ’ ही त्यांची पहिली कादंबरी लिहिली गेली. कादंबरीकार नाथमाधव यांना त्यांनी गुरुस्थानी मानले होते. त्यांनी समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे विदारक चित्रण केले. दुष्टांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा विजय दर्शविणारे त्यांचे साहित्य आहे.

     भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ओळख करून देण्याचे कार्य त्यांच्या साहित्याने केले. नाथमाधवांच्या प्रभावामुळे त्यांनी ऐतिहासिक कादंबर्‍या लिहिल्या. इतिहासाचा सखोल अभ्यास केला. आपला उज्ज्वल इतिहास वाचकांपुढे प्रभावीपणे मांडला. ‘कादंबरीमय पेशवाई’, ‘पेशवाईचे पुण्याहवाचन’, ‘पेशवाईचे मन्वंतर’ अशा तेरा कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. ‘शिवशाहीची पहाट’, ‘समरदेवता ५७ ची’ याही त्यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍या होत.

     पुढे त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव पडला. गरीब-श्रीमंत यांच्यातील आर्थिक दरी पाहून ते अस्वस्थ झाले. त्यांनी मॅक्झिम गॉर्की, टर्जिनिव्ह यांच्या कादंबर्‍यांची भाषांतरे केली. त्यांच्या सामाजिक कादंबर्‍यांमध्ये वास्तव चित्रण आहे. ‘धरणीकंप’, ‘वादळ’, ‘अन्नदाता उपाशी’, ‘गोदाराणी’ यांमध्ये शेतकर्‍याला महत्त्व दिलेले आहे. त्यात सामाजिक, राजकीय विषमतेचे विदारक चित्रण आहे. ‘आजचा प्रश्न’ ही कादंबरी साम्यवाद्यांच्या भारतातील ऑगस्ट क्रांतीमागील भूमिका विशद करते.

      इंग्रजांविरुद्धचे भारतातील आंदोलन, फैजपूर काँग्रेस, १९४२ सालचा ‘चलेजाव’ लढा, १९४७ सालचा स्वातंत्र्यदिन, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य हे त्यांनी जवळून पाहिले होते, त्यांनी त्या अनुभवावर आधारित लिखाण केले. त्यांनी ‘भारतमाते ऊठ’, ‘भारतमातेची हाक’, ‘भारतमाता वनवासी’, ‘भारतमातेचा शाप’ ‘भारतमातेचे दिव्य’, ‘भारत माता की जय’ या कादंबर्‍या लिहिल्या. ‘स्वतंत्र नवभारत’मधून त्यांनी इतिहासकथा मांडल्या. त्यांनी ‘संगीत देवकी’, ‘सह्याद्रीचा सिंह’, ‘पानिपत’, ‘प्रभुचरणी’ ही नाटके लिहिली.

     कालांतराने ते गांधीवादाकडे आकर्षित झाले. काँग्रेस चळवळीमध्ये रममाण झाले. राजकीय, सामाजिक व ऐतिहासिक या तीनही विषयांचा सुरेख संगम त्यांच्या साहित्यात झालेला आहे. मात्र, त्यांना प्रामुख्याने ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून लोकप्रियता मिळाली.

     - श्याम भुर्के

हडप, विठ्ठल वामन