Skip to main content
x

इंद्रजी, भगवानलाल

       गवानलाल इंद्रजी हे जातीने गुजराती ब्राह्मण, यांची पोटजात प्रश्नोरा नागर होय. त्यांचे जन्मस्थान जुनागढ होय. त्यांचे भाऊ संस्थानाने काढलेल्या संस्कृत पाठशाळेचे प्रमुख होते. त्यामुळे महत्त्वाच्या संस्कृत ग्रंथांचे अध्ययन करण्याची संधी यांना घरीच मिळाली. परंतु पुढे लवकरच या अध्ययनाचा त्यांना कंटाळा येऊन इतिहास विषयात त्यांचे मन विशेष रमू लागले आणि त्याच्याच अनुसंधानाने आपल्या प्रांताच्या ऐतिहासिक परंपरेचा मागोवा घेत घेत त्यांची बुद्धी गिरनार पर्वतावर कोरलेल्या लेण्यात स्थिर झाली. परंतु पौर्वात्य लिपी व हस्ताक्षरे यांच्या ज्ञानाच्या अभावी या लेण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे ज्ञान होण्याची शक्यता नाही ही गोष्ट लक्षात आल्यामुळे त्यांनी त्या अध्ययनास सुरुवात केली. लवकरच अशोकस्तंभ’, ‘रुद्रदामनचे व स्कंदगुप्तचे शिलालेखया गिरनार पर्वतावरील महत्त्वाच्या शिलालेखांचे अर्थज्ञान होण्याइतपत त्या शास्त्रात त्यांची प्रगती झाली. त्या शास्त्राबद्दल त्यांना वाटणारी उत्कंठा लवकरच मि. अलेक्झांडर किन्लोक फोर्बस यांच्या लक्षात आली व त्यांनी डॉ. भाऊ दाजींशी इंद्रजींची गाठ घालून दिली (१८६१) व लवकरच त्यांचे मदतनीस म्हणून इंद्रजींनी काम करण्यास सुरुवात केली.

भाऊ दाजी यांचे मदतनीस म्हणून इंद्रजींनी केलेली कामगिरी ही प्रगतिपथावरील एक महत्त्वाचे पाऊल, या दृष्टीने महत्त्वाची आहे. शिलालेखांचे पद्धतशीर वाचन करणे, हे प्रमुख काम व उतार्यांच्या नकला, जुन्या नकलांशी रुजवात, त्याकरता पुन्हा नवीन नकला करणे, त्यामध्ये जागच्या जागी नव्या-नव्या दुरुस्त्या करणे ही त्याच्या अनुषंगाने येणारी इतर कामे; असा त्यांचा त्यावेळच्या कार्याचा ढोबळ आराखडा होता.

या अहोरात्र केलेल्या कामाच्या पुण्याईवर त्यांना हीच कामे स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणावर करण्याची योग्यता आली, ही गोष्ट विसरता येणे शक्य नाही. इंद्रजींची ही तडफेने काम करण्याची शक्ती डॉ. भाऊ दाजी यांच्याही चांगली लक्षात आली. कारण शेवटी शेवटी काही दिवस हिंदुस्थानाच्या सर्व प्रांतांतील शिलालेखांचे काम त्यांनी इंद्रजींवर सोपवले होते. सर्व प्रांतांतील शिलालेख नकलणे व त्यांची मुद्रणप्रत तयार करणे या दोन गोष्टींचा अंतर्भाव या कामात होत असे. या कामानिमित्त त्यांना हिंदुस्थानातील कोपरा आणि कोपरा , गाव आणि गाव  धुंडाळावे लागले. अत्यंत शीघ्र व बिनचूक रीतीने कोणतीही प्राचीन लिपी वाचून तिचा सुसंगत अर्थ लावणे या कामात यांचा हात धरणारा कोणी झाला नाही. अशा तऱ्हेने महत्प्रयासाने नकललेल्या नकलांचे त्यांनी  नंतर काळजीपूर्वक भाषांतर केले व नंतर त्याची सूची तयार केली. इंग्लिश व प्राकृत या दोन भाषांशी तोंड ओळख हा या कार्याचा ताद्दश फायदा सांगता येईल. १२-१३ वर्षाच्या या खडतर तपश्चर्येनंतर थोडासा सुटकेचा निःश्वास टाकण्याची संधी यांना मिळाली. याच वेळी भाऊ दाजी वारले (१८७४) व काहीतरी घरगुती प्रसंगामुळे इंद्रजींची त्यांच्याजवळ असलेली व इंद्रजींनी जमवलेली हस्तलिखिते यांच्याच स्वाधीन करण्यात आली. परंतु इतकी मोठी तपश्चर्या पाठीशी असून यांना योग्य असे काम मिळवण्याकरता थोडी वाटच पहावी लागली. इंग्रजी भाषेचे अपुरे ज्ञान हीच गोष्ट या आपत्तीच्या मुळाशी होती.

अशा तऱ्हेने दोन वर्षे सक्तीची विश्रांती घेतल्यानंतर इंद्रजींचे हातून लिहिण्याच्या दृष्टीने काहीतरी भरीव कामगिरी होण्याची चिन्हे पुन्हा दिसू लागली. या गोष्टीला कारण होणारी घटना मात्र खरोखरच क्षुल्लक होती. डॉ. बुल्हेर यांच्यातर्फे इंडियन अँटिक्वेरीमध्ये इंद्रजींचा केव्ह न्यूमरल्सवरील कार्याची माहिती देणारा लेख प्रसिद्ध झाला. त्यामुळे मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीया संस्थेने इंद्रजींना आपले सन्माननीय सभासद करून घेतले व त्या संस्थेच्या लायब्ररीत यांचा प्रवेश घडून आला व कितीतरी दिवसांची त्यांची इच्छा तृप्त झाली. (केव्ह न्यूमरल्स म्हणजे लेण्यांमधील लेखांतील संख्यावाचन होय.)

मुंबई गॅझेटियरच्या खंडांत इंद्रजींनी लिहिलेले लेख व डॉ. . कनिंगहॅम यांनी प्रसिद्ध केलेल्या आर्किऑलॉजिकल व्हॉल्यूमया आपल्या लेखांनी त्यांनी लावलेल्या हातभाराबरोबर असणार्या यांच्या लेखांची संख्या अठ्ठावीस आहे. यांच्या लेखांतील संशोधन टिकाऊ स्वरूपाचे असून हिंदी, इतिहास व शिलालेख यांचे एक यशस्वी विद्यार्थी या नात्याने चिरंतन व जिवंत स्मारक ठेवण्यास ते समर्थ आहेत. केव्ह न्यूमरलस्वरील संशोधनाखेरीज पूर्वी कोणी कधीही न जाणलेल्या पुष्कळ अक्षरांचे त्यांनी संशोधन केले आहे. नाशिक शिलालेखची आज जी सुस्पष्ट व हुबेहूब नक्कल आपल्या डोळ्यांसमोर आहे, तिचे जनकत्व त्यांचेकडेच आहे. अशोकाच्या ८व्या शिलास्तंभाचा तुकडा शोधून काढण्याचे श्रेय त्यांनाच द्यावे लागेल. नाहीतर हा स्तंभ कोकण काठावरील सोपारा गावामध्ये असेल, ही गोष्ट स्वप्नातसुद्धा कोणी खरी मानली नसती. मथुरेतील सिंहशीर्षकही यांनीच शोधून काढले. क्षत्रपांचे खरोष्टीतील अनेक लेख यावरच असल्याने या संशोधनास विशेष महत्त्व आहे. कामांच्या मशिदीवरील शूरसेनवंशी यादवांचा लेख त्यांनीच शुद्धतापूर्वक वाचला व प्रसिद्घ केला. इसवी सनाच्या सातव्या शतकातील हे लेख आहेत.

ओरिसा प्रांतातील खारवेलचा उदयगिरी शिलालेखनकलून त्याचे भाषांतर करण्याचे काम सुद्धा त्यांनीच केले. त्यामध्ये मौर्य शकासंबंधी असणारा उल्लेख शोधून काढण्याचा पहिला मानही त्यांनाच मिळाला आहे. या सुप्रसिद्ध शिलालेखावर गेल्या तीस वर्षांत बरेच कार्य झाले आहे. परंतु इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ओरिएन्टॅलिस्टस्या संस्थेत त्यांनी सादर केलेल्या मूलग्रही संशोधनावरच या सर्व संशोधनाचा पाया उभारला गेला आहे, ही गोष्ट विसरता येणे शक्य नाही.

त्याचप्रमाणे जुन्नरजवळ नाणेघाटयेथील गुहेतील मोठा लेख व आंध्र नाणीयांवरील यांच्या कार्यामुळेच आंध्राबद्दल आज उपलब्ध असणारी अतिशय महत्त्वाची माहिती आपणाला उपयोगी पडत आहे. मि.कॅम्बेलच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध होणार्या बाँबे गॅझेटियरच्या पहिल्या भागाकरता गुजरातचा इतिहास त्यांनीच लिहिला. त्यात राजपुतान्यावर राज्य करणार्या सोळंकींचा विस्तृत इतिहास आला आहे.

नेपाळच्या राजवंशावरील व राजघराण्यावरील २१ शिलालेख शोधून काढण्याबद्दल डॉ. बुल्हेर यांनी इंद्रजींनी दिलेली नेपाळच्या इतिहासाचे पथनिर्देशकही पदवी खरोखरच सार्थ आहे. या गोष्टींची जाणीव आपण या कार्याचे महत्त्व जाणून घेतले असता होते. वेरूळ शिलालेखावरील यांच्या संशोधनानेही दक्षिण राष्ट्रकूटांच्या इतिहासात महत्त्वपूर्ण दालन उघडले गेले.

एके काळी बलाढ्य असणार्या त्रैकूटक राजवंशाचे अस्तित्व व त्यांचा कलचूरी शक व हैहय त्यांच्याशी असणारा संबंध याचा पत्ता अहोरात्र काम करणार्या या गृहस्थांनीच लावलेला आहे. आभीर राजा ईश्वरदत्त याच्याशी कलचूरी शकाचा संबंध लावून तो शक गुजरातेतला असला पाहिजे, हा त्यांचा सिद्धान्त व गुजरातचे व नाशिकचे आभीर व चेदीचे त्रैकूटक व हैहय हे दोन्ही एकच असावेत, हा त्यांचा दावा इतिहासातील त्यात्या क्षेत्रांत प्रकाश पाजणारा असून पुढील संशोधनांनी यांचे हे सिद्धान्त पक्केच होत आहेत. आपल्या मरणाचे पूर्वी गुजरातच्या इतिहासाचे संशोधन करण्यात ते गुंतले होते. इतर दिशेने त्यांनी लिहिलेले लेखसुद्धा काही उपेक्षणीय नाहीत. हिंदुस्थानातील धार्मिक चळवळींबरोबरच वेदवाद, ब्राह्मणवाद, बुद्धवाद या गोष्टींची वाढ होत नाही’, हे त्यांचे मत त्या काळी भयंकर समजले जाण्याजोगे होते. त्यांनी शिलालेखांसंबंधी लिहिलेले लेखसुद्धा पूर्वीच्या भूगोलाचे ज्ञान दाखवण्यास समर्थ आहेत. अशा प्रकारच्या या थोर संशोधकाचे अभिनंदन करण्याचा पहिला मान लंडन युनिव्हर्सिटीने मिळवला. त्या युनिव्हर्सिटीने डॉ. कर्न यांच्या सूचनेवरून त्यांना ऑनररी पीएच.डी. केले. त्यांच्या पाठोपाठ हॉलंडच्या डच ओरिएन्टल सोसायटीव इंग्लंडच्या व आयर्लंडच्या रॉयल एशियाटिक सोसायटीया संस्थांनी त्यांना आपले ऑनररी सभासद करून घेतले.

हिंदी व त्याचबरोबर परकीय संशोधकांकडून वाहवा मिळवण्याचा अपूर्व मान त्यांना अनेक वेळेला मिळाला होता. परदेशातील यांच्या चहाते मंडळीत ई. सेनर्ट व जी. बुल्हेर यांच्यासारखे लोक होते.

भाऊ दाजी व इंद्रजी यांनी आर्किऑलॉजीच्या क्षेत्रात जवळजवळ अर्धा शतकभर केलेली कामगिरी नि:संशय अविस्मरणीय आहे. हिंदी लोक ज्या क्षेत्राकडे जरा बावरूनच बघत होते, त्या क्षेत्रात परदेशी तज्ज्ञांच्याकडून प्रशंसा मिळवण्याइतकी मोठी कामगिरी करणे ही गोष्ट केव्हाही त्यांना भूषणावहच आहे. डॉ. भाऊ दाजी यांनी आपल्या केव्ह न्यूमरलस्च्या सुप्रसिद्ध संशोधनात जरी त्यांचा उल्लेख केलेला नसला, तरी डॉ. बुल्हेर यांच्या मते या महत्त्वाच्या संशोधनातील बर्याच मोठ्या भागाच्या संशोधनाचे श्रेय इंद्रजींकडे आहे. भाऊ दाजी यांच्या अतिशय लाडक्या सहकार्यांतील एक सहकारी असण्याचा मान यांना मिळाला होता. ज्या वेळी भाऊ दाजी अतिशय आजारी होते, त्या वेळी इंद्रजी नेपाळला निघाले आहेत, अशी बातमी त्यांना मिळाली. ज्या वेळी नेपाळ सरकारकडून तुमच्या विनंतीवरून आम्ही त्यांची व्यवस्था करत आहोतअसा निरोप आला, त्या वेळी भाऊ दाजींनी समाधानाचा नि:श्वास टाकला.

भाऊ दाजींच्या मृत्यूनंतर मात्र इंद्रजींची आर्थिक स्थिती समाधानकारक राहू शकली नाही. काठेवाडचे राजेसाहेब यांनी दिलेली देणगी व डॉ.कॅम्बेल व बर्गेस यांच्याकडून येणारे खंडित द्रव्य यांमुळे त्यांची आर्थिक स्थिती  सुधारू शकली नाही. मात्र या दु:स्थितीची कल्पना कोणालाही येऊ नये याबद्दल त्यांचा कटाक्ष असे. जवळजवळ चौदा वर्षे अगदी निकटचे मित्र असूनही डॉ. बुल्हेर यांना मरते वेळेशिवाय आपल्या आर्थिक दैन्याचा सुगावा त्यांनी कधीही लागू दिला नव्हता. (एमिनन्ट ओरिएन्टालिस्ट).

इंद्रजींनी मरतेसमयी आपल्या व इतर राजांच्या नाण्यांचा बहुमूल्य संग्रह व मथुरेचा सिंहध्वज ब्रिटिश म्युझिअमला भेट म्हणून दिला. इंद्रजींची जन्मशताब्दी मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीत मोठ्या थाटाने साजरी करण्यात आली. यांचे तैलचित्र तेथे लावण्यात आले व एक इंग्लिश लेखसंग्रहही यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध केला. तसेच गुजरात फोर्ब्स सोसायटीने यांच्या शताब्दीनिमित्त एक गुजराती लेखसंग्रह प्रसिद्ध केला. गुजरात संशोधनमंडळानेही इंग्रजी व गुजराती लेखांचा एक खंड यांच्या स्मरणार्थ काढला.

संपादित

इंद्रजी, भगवानलाल