Skip to main content
x

अकोलकर,गणेश विनायक

     प्राचार्य गणेश विनायक अकोलकर उर्फ ग.वि अकोलकर यांचे जन्मगाव नाशिक. त्यांचे शालेय शिक्षण नाशिकमध्ये झाले. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयामधून त्यांनी बी. ए. केले व भांडारकर इन्स्टिट्यूटमधून एम. ए. पदवी संपादन केली. १९३६ मध्ये पुणे विद्यापीठातून ते एलएल. बी. झाले. १९३८ मध्ये कोल्हापूरच्या शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातून त्यांनी  बी. टी. (बॅचलर ऑफ टिचिंग) पदवी मिळविली. अकोलकरांनी हे सर्व शिक्षण आपल्या गुणवत्तेवर शिष्यवृत्ती मिळवून घेतले, हे विशेष होय.

     १९३४ नंतर नाशिकमधील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये,  अंमळनेरच्या प्रताप विद्यालयामध्ये व पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये त्यांनी अध्यापक म्हणून काम केले. त्यांचे हे शैक्षणिक कार्य विद्यार्थिप्रिय शिक्षक, कुशल व्यवस्थापक व शिक्षण विषयावर विपुल लेखन करणारे व्यासंगी लेखक म्हणून फुललेले आहे. अंमळनेर, नारायणगाव ह्यांसारख्या तालुक्यांच्या गावी, चंद्रपूरसारख्या मागास भागात, पुणे, नाशिकसारख्या पुढारलेल्या शहरात मुख्याध्यापक म्हणून अकोलकरांनी काम केले. पण प्रत्येक संस्थेत स्वत:च्या शिक्षणविषयक निष्ठेला अकोलकरांनी तडा जाऊ दिला नाही.

      अकोलकरांनी विविध शैक्षणिक प्रयोग केले. विद्यालयांच्या सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्याची सूत्रे विद्यार्थ्यांच्या हाती असावीत म्हणून गृहसभा, कुलपद्धती अशा विविध योजना राबविल्या. भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच्या काळात विद्यार्थ्यांना लोकशाही कार्यपद्धतीची ओळख करून दिली. स्नेहसंमेलनाच्या प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतापासून त्यांना निरोप देण्यापर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांनी पार पाडावीत अशी योजना आखली व प्रत्यक्षात आणली. त्यावेळी शालेय रंगभूमीवर मोठ्यांसाठी लिहिलेल्या नाटकांतील प्रवेश सादर केले जात. अकोलकरांनी स्वत: मुलामुलींसाठी नाटिका लिहिल्या. विद्यार्थ्यांकडून नाट्यप्रवेश लिहवून घेतले. स्वातंत्र्याच्या प्रारंभकाळात श्रमदान, समाजसेवा शिबिरे, आंतरभारती अशा विविध योजना त्यांनी विद्यालयांतून राबविल्या, अभ्यासक्रमात त्या नंतर आल्या.

     एस. टी. सी. (सेकंडरी टीचर्स सर्टिफिकेट) प्रशिक्षण वर्गाचे प्रमुख, चंद्रपूरच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य, नाशिकच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म्हणून अकोलकरांनी काम केले. शिक्षकांचे शिक्षक म्हणून कार्य करीत असताना जे काम शिक्षकाला विद्यार्थ्यांकडून करून घ्यावे लागणार आहे ते सारे त्याच्या अनुभवातून गेले पाहिजे ही दृष्टी त्यांना होती. समाजसेवा हे फार मोठे शिक्षणकार्य आहे व ते शिक्षकाचेही कार्य आहे ह्या जाणिवेतून नाशिक शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचे नेतृत्व त्यांनी केले. ह्याच दृष्टिकोनातून राज्याच्या सरकारी, निमसरकारी समित्यांवर, पुणे विद्यापीठ, समाज प्रबोधन संस्था अशा संस्थांतून त्यांनी प्रतिनिधित्व केले.

     जळगाव जिल्ह्यात अकोलकरांनी व्यावसायिक जीवनास प्रारंभ केला. तेथेच त्यांनी १९६३ मध्ये महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन शिक्षणमंत्री शांतिलाल शहा ह्यांनी सरकारच्या माध्यमिक शाळांवरील वाढत्या नियंत्रणाचे समर्थन केले व शिक्षकांच्या उणिवांवर बोट ठेवले. तेव्हा अकोलकरांनी छापलेले अध्यक्षीय भाषण बाजूला ठेवून शिक्षणमंत्र्यांच्या मुद्द्यांना चपखल उत्तरे दिलीच, पण त्याचबरोबर शिक्षक संघटनांकडून हक्कांच्या जाणिवेइतकीच कर्तव्याचीही जोपासना व्हायला पाहिजे ह्या मात्रेचा वळसाही शिक्षकांना दिला.

     व्यावसायिक क्षेत्रात एस. एस. सी. पाठ्यपुस्तक समिती, माध्यमिक शिक्षण मंडळ संशोधन समिती, कौन्सिल ऑफ बेसिक एज्युकेशन अशा विविध समित्यांचे सदस्य व अध्यक्ष म्हणून अकोलकरांनी मार्गदर्शन केले.

     शिक्षणशास्त्राची ओळख महाराष्ट्राला मातृभाषेतूनच करून दिली पाहिजे हे जाणून प्रा. ना. वि. पाटणकरांच्या सहकार्याने ‘मराठीचे अध्यापन’ व ‘शालेय व्यवस्था’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. यातील ‘मराठीचे अध्यापन’ ह्या पुस्तकाची सातवी आवृत्ती निघाली. १९४१ ते १९७४ या काळात स्वतंत्र असे वीस ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यातील ‘नव्या महाराष्ट्रातील शिक्षण’ या अकोलकरांच्या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाने १९६८ च्या ग्रंथगौरवात विशेष पुरस्कार दिला.

     ‘रशियातील विद्यामंदिर’, ‘लोकशाही आणि शिक्षण’, ‘मागास देशातील शिक्षणाचे स्थान’, ‘शिक्षणाचे आधुनिक तत्त्वज्ञान’, 'माध्यमिक शिक्षणाची पुनर्घटना', 'व्यक्तिमत्त्वाचा विकास' ही अकोलकरांची काही अनुवादित पुस्तके आहेत. ‘ग्रामीण विकास आणि शिक्षण’ सारखी काही संपादित पुस्तके आहेत.

     तसेच महत्त्वाची गोष्ट अशी की अकोलकरांनी ‘लेखन विकास भाग’ (१ ते ७), ‘व्याकरण व निबंध’ ही व्याकरणविषयक पुस्तके, ‘साहित्यप्रभा’ (भाग १ ते ३), ‘साहित्यसरिता’ (भाग १ ते ३), कुमारभारती (इ. ९ वी), ही मराठी, लोकवाणी (हिंदी) व सुलभ गीर्वाणमाला प्रवेश (१ व २) ही पाठ्यपुस्तके सहकार्याने संपादित केली आहेत. ‘मुलींच्या मनांचा मागोवा’ सारखी सर्वेक्षणे अकोलकरांच्या ग्रंथलेखनाची विपुल साक्ष देतात.

- प्रा. सुहासिनी पटेल

अकोलकर,गणेश विनायक