Skip to main content
x

अन्सारी, झैनुद्दीन दाऊद

     डॉ. झैनुद्दीन दाऊद अन्सारी हे ‘शेख’ या नावाने परिचित होते. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे त्यांचा जन्म झाला. बालपणापासून कलेची आवड असल्याने मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण होताच केंद्र शासनाच्या पुणे येथील पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात आर्टिस्ट/आरेखक या पदावर नोकरी करणे त्यांनी पसंत केले. या नोकरीदरम्यान त्यांनी पुरातत्त्वशाखेशी निगडित आरेखन व छायाचित्रणाचे ज्ञान श्री. जे.पी. जोगळेकर यांच्याकडून आत्मसात केले. १९४८ मध्ये डॉ. ह.धी. सांकलियांनी त्यांचे कलागुण व इतर कौशल्य ओळखून डेक्कन कॉलेजमध्ये त्यांना प्राचारण केले व तेव्हापासून ते शेवटपर्यंत सांकलियांसोबत त्यांचा उजवा हात, तसेच त्यांचे ट्रस्टेड लेफ्टनन्ट म्हणून कार्यरत राहिले. ‘बॉर्न फॉर आर्किऑलॉजी’ या सांकलियांच्या आत्मचरित्रात डॉ.अन्सारी यांच्याबाबत तसा उल्लेख केलेला आढळतो.

पुरातत्त्वशास्त्राचे क्षेत्रकार्य (फील्डवर्क) हे प्रमुख अंग मानले जाते. फील्डवर्कबाबत विशेष आवड, तसेच कौशल्य हा डॉ. झैनुद्दीन दाऊद अन्सारींचा उपजत गुण सांकलिया यांनी हेरला. यातूनच त्यांचा पुरातत्त्वीय संशोधनातील सहभाग सांकलियांच्या सर्व शोधमोहिमांत अपरिहार्य ठरला. महत्त्वपूर्ण पुराश्मयुगातील व त्याहूनही प्राचीन काळातील जीवाश्म शोधून काढण्याची त्यांची हातोटी व त्यामागची कारणमीमांसा यांमुळे त्यांच्या शोधमोहिमेला एक वेगळे परिमाण लाभले. यातूनच फील्डवर्क व अन्सारी असे समीकरण उदयास आले.

पुरातत्त्वीय शास्त्रशुद्ध उत्खनन व समन्वेषण कसे असावे या मूलभूत अंगाचे धडे डॉ. अन्सारी यांच्याकडून घेण्यास विद्यार्थिवर्गाव्यतिरिक्त पुरातत्त्वशास्त्रातील इतर संशोधकही उत्सुक असत. प्राचीन वसाहतींचा शोध व अश्मीभूत पुराव्याचा ठावठिकाणा नदीच्या प्राचीन निक्षेपातून लावण्याव्यतिरिक्त त्यांची प्रायोगिक पुरातत्त्वशास्त्रातही गती होती. पुराश्मयुगातील मानवाने पाषाणावर विविध आयुधे कशी घडविली व तिचा वापर कशा प्रकारे केला असावा हे त्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाषाणावर हत्यारे करून तंत्र जाणून घेतले. तसेच, त्यांच्या उपयोगाबाबतही केलेेल्या अनुमानाने पुरातत्त्वशास्त्रास एक उंची प्राप्त करून दिली. म्हणूनच पुरातत्त्वशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळणे ही विशेष पर्वणी असायची. त्यांच्या निवृत्तीपर्यंत हा प्रशिक्षणाचा उपक्रम अखंडपणे कायम राहिला. त्याचप्रमाणे, पुरातत्त्वशास्त्रातील मुळाक्षरे मानली जाणारी मृद्भांडी व त्यांच्या अभ्यासाला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या सखोल अभ्यासावरून प्राचीन मानवाच्या विविध अंगांचा अभ्यास करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ही मृद्भांडी बरेचदा मोडक्या अवस्थेत, परंतु असंख्य प्रमाणात सापडत असल्याने त्यांचा उपयोग मानवाच्या संस्कृतीचे विविध पैलू जाणून घेण्यास उपयुक्त ठरतो यात दुमत नाही. त्यामुळे मृद्भांड्यांच्या अभ्यासाला पर्याय नाही. डॉ. अन्सारी यांना याबाबतचे सखोल ज्ञान होते. त्याबाबत त्यांनी साध्यासोप्या भाषेत लेख लिहून मृद्भांड्यांच्या अभ्यासाच्या दिशेचा सचित्र परिचय करून दिला.

त्यांनी केलेली बहुतेक उत्खनने (१९५० ते १९७०च्या दशकातील) सांकलिया यांच्या सोबत एक सहकारी या नात्याने केली, तर काही त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सह-उत्खनकाच्या भूमिकेत केलेली आढळतात. यांत ब्रह्मपुरी (कोल्हापूर), नेवासे, चांडोली, कायथा, द्वारका, संगनकल्लू, आहाड, महेश्वर आणि नावदाटोली, पिंपळसुटी व इनामगाव यांचा उल्लेख महत्त्वपूर्ण आहे. या उत्खननांमुळे प्रागैतिहासिक काळ, इतिहासपूर्व काळ व ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक पुरावे उजेडात आले व त्यांचे वृत्तान्त प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. अन्सारी यांचा दीर्घकाळ सहवास लाभलेले त्यांचे सहकारी डॉ. मधुकर ढवळीकर यांनी डॉ. अन्सारी यांच्या कार्याचा आढावा घेताना असे म्हटले आहे, की सांकलियांच्या पुरातत्त्वीय शोधकार्यातील यशात डॉ. अन्सारी यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

सुरी व ब्रश या दोन उपकरणांचा कौशल्यपूर्ण वापर व त्याला सूक्ष्म निरीक्षणाची जोड उत्खननित पुराव्याचा अभ्यास करण्यास खूपच उपयोगी पडतो. तसेच, उत्खननित खड्ड्यांतील विविध स्तरांमधील भेदही निश्चित करणे यासारखे महत्त्वपूर्ण काम त्यामुळे सुलभ होत असते. पुरातत्त्वशास्त्रातील ही खास कौशल्ये त्यांनी विकसित केली असल्यामुळेच डॉ. अन्सारी यांना फील्डवर्कमध्ये अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले होते व त्यांचा उत्खननात सहभाग असणे अपरिहार्य झाले तर नवल नाही.

डेक्कन कॉलेजमध्ये आरेखक/छायाचित्रकाराची जबाबदारी सांभाळून त्यांनी ग्रॅज्युएट/पोस्टग्रॅज्युएट व पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा पीएच.डी.चा विषय ‘जीओमेट्रिकल अ‍ॅप्रोच टू पॉटरी’ हा होता. त्यांच्या कर्तृत्वाला अनुसरून त्यांची डेक्कन कॉलेजमध्ये म्युझियम प्रमुख, अधिव्याख्याता व प्रपाठक अशा विविध पदांवर बढती झाली व ते १९८३ साली निवृत्त झाले. त्यांचे आठ उत्खनन वृत्तान्त प्रसिद्ध झाले आहेत व त्यांत ते सह-वृत्तान्तलेखक आहेत. त्यांच्या लेखांचा विषय प्रामुख्याने पुरातत्त्वशास्त्रातील तंत्रकौशल्याबाबत आढळतो. डॉ. अन्सारी यांचा वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी मृत्यू झाला.

प्रकाश जोशी

अन्सारी, झैनुद्दीन दाऊद