आपटे, हरी नारायण
हरी नारायण आपटे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील पारोळे येथे झाला. वडील नारायणराव मुंबईला पोस्टात नोकरी करीत होते. हरिभाऊंचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंबईतील नाना शंकरशेटची शाळा व बिशप हायस्कूलमध्ये झाले. १८७८साली ७०कुटुंबाचे स्थलांतर पुणे येथे झाल्यामुळे हरिभाऊंचे पुढील शिक्षण पुण्याच्या सरकारी हायस्कुलात झाले. माध्यमिक शिक्षण घेताना एका संस्कृत शास्त्र्यांच्या खासगी मार्गदर्शनाखाली हरिभाऊंचा संस्कृत भाषेचा अभ्यास झाला. याशिवाय इंग्रजी साहित्याचे विपुल वाचन त्यांनी त्या वेळी केले. त्यांच्या शिक्षकवर्गात विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वासुदेवशास्त्री खरे, वा.शि.आपटे यांच्यासारखे व्यासंगी मान्यवर होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचे वाचन हरिभाऊंनी मनःपूर्वक केले. परिणाम स्वरूप स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश ह्यासंबंधींचा हरिभाऊंचा अभिमान वाढीस लागला. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या अकाली निधनामुळे व्यथित झालेल्या हरीभाऊंनी ‘शिष्यजनविलाप’ हे ८४ श्लोकांचे वृत्तबद्ध काव्य लिहिले. १८८३ साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी डेक्कन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. गणित विषय कच्चा असल्यामुळे पहिल्या परीक्षेत अपयश आले. पुढे फर्गसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावरही हरिभाऊ पदवी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. मात्र विद्याव्यासंगी शिक्षक-प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संस्कृत-मराठी-इंग्रजी भाषांतील ग्रंथांच्या वाचनामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाली. हरिभाऊंचा आगरकरांच्या ‘विकारविलसित’ ह्या नाटकावरील ७२ पानी विस्तृत सडेतोड टीकालेख ‘निबंध- चंद्रिके’त १९८२ साली प्रसिद्ध झाला. याच काळात ‘आर्योद्धारक नाटक मंडळी’त हरिभाऊंचे बसणे, उठणे सुरू झाले. त्याचा लाभ पुढे नाटके लिहिताना त्यांना झाला. १८७८ साली पुण्यात आल्यापासून १८८८ साली डेक्कन महाविद्यालय सोडेपर्यंत त्यांचा दहा वर्षांचा कालखंड साहित्यिक घडणीचा काळ होता. ह्या काळात हरीभाऊ हे चिपळूणकरांच्या शैलीचे आणि त्यांच्या पूर्ववैभवाच्या शिकवणुकीचे भक्त बनले होते. लेखन-वाचनाची हरिभाऊंची आवड लक्षात घेऊन त्यांचे चुलते महादेव चिमणाजी आपटे यांनी त्यांना पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय करावा, असे सुचवले. त्यासाठी छापखान्याच्या कामाचे स्वरूप जाणून घ्यावे, म्हणून मुंबईच्या ‘जगदीश्वर’ छापखान्यात सहा महिने उमेदवारी केली. पुतण्याला लेखन -वाचन निर्वेधपणे करता यावे, म्हणून महादेव चिमणाजींनी एक-दोन लाख रुपये खर्च करून इमारत बांधून दिली आणि तिथेच ‘आनंदाश्रम’ संस्थेची स्थापना केली. प्राचीन ग्रंथाचे रक्षण-प्रकाशन व्हावे, ह्या हेतूने सुरू केलेल्या संस्थेत हरिभाऊंची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली गेली. त्या पदामुळे हरीभाऊंना बरेच अर्थिक स्थैर्य लाभले आणि त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत साहित्यविषयक भरीव कार्य केले.
१८९० साली विजयादशमीच्या मुहूर्तावर हरीभाऊंनी ‘करमणूक’ साप्ताहिकाचा नमुना अंक प्रसिद्ध केला. ‘लहानांपासून थोरांपर्यंत सर्व स्त्री-पुरुषांचे मनोरंजन करून ज्ञानदान देणारे पत्र’ अशी टीप सुरुवातीला दिली होती. ‘करमणूक’मध्ये हरीभाऊंच्या कादंबर्या क्रमशः प्रसिद्ध झाल्या; त्यांच्या स्फुट कथा व अन्य लेखकांचे साहित्य प्रसिद्ध झाले. ‘मासिक मनोरंजन’, ‘निबंध-चंद्रिका’ ह्या नियतकालिकांत आधी स्फुट लेखन करणार्या हरीभाऊंनी पुढे स्वतंत्रपणे दीर्घ लेखनाला प्रारंभ केला. ‘मिस्टरीज ऑफ ओल्ड लंडन’च्या धर्तीवरील ‘मधली स्थिती’ ही कादंबरी ‘पुणे वैभव’ साप्ताहिकाची पुरवणी म्हणून प्रसिद्ध झाली. ‘मधली स्थिती’चा जनमानसावरील प्रभाव जाणवल्यावर कादंबरी हा वाङ्मयप्रकार जनजागृती, उद्बोधन आणि समाजाला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल; अशी हरीभाऊंची भावना झाली. समाज-स्थितीचे सूक्ष्म अवलोकन, वाङ्मय आणि इतिहासावरील ग्रंथांचे भरपूर वाचन, मनोरंजनाबरोबर येणार्या बोधपरतेची आकांक्षा, समाजहिताची आंतरिक तळमळ आणि वर्तमानातील व भूतकाळातील वास्तवाचे प्रत्ययकारीपणे दर्शन घडविण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिभेची देणगी या गुणांमुळे हरीभाऊंनी स्फुट गोष्टी, सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवरील कादंबर्या, नाटक असे विविधांगी लेखन केले. ‘करमणूक’चे अठ्ठावीस वर्षे निष्ठापूर्वक संपादन केले. हरीभाऊंचा व्यासंग केवळ साहित्य आणि तत्संबंधी विषयांपुरता मर्यादित नव्हता. जगाचा राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक इतिहास त्यांनी नजरेखालून घातला होता.
आपल्या ‘स्फुट गोष्टीं’नी हरीभाऊ आपटे यांनी मराठी कथेचा पाया घातला. वास्तववादी सामाजिक कादंबर्या लिहून आधुनिक कादंबरीचे जनक आणि आशयसंपन्न ऐतिहासिक कादंबरीचे प्रवर्तक म्हणून मान्यता मिळवली. ‘संगीत संत सखू’ (१९११), ‘संगीत सती पिंगळा’ ही दोन स्वतंत्र नाटके त्यांनी लिहिली. मराठी ‘वाङ्मयाचा इतिहास’ (१९०३), ‘विदग्ध वाङ्मय’ (१९११), ‘मराठी- इट्स सोअर्सिस अॅन्ड डेव्हलपमेन्ट’ भाषाशास्त्रविषयक व्याख्यान आदींवरून हरिभाऊंच्या वाङ्मयविषयक भूमिकेची आणि सखोल अभ्यासाची साक्ष पटते. ‘करमणुकी’त प्रसिद्ध होणार्या स्फुट कथांनी तत्कालीन कल्पनारम्य वातावरणात रमलेल्या मराठी कथेला जीवनातील वास्तव शोधण्यास शिकवले. ‘काळ तर मोठा कठीण आला’, ‘कसे दिवस गेले’, ‘डिस्पेप्शिया’, ‘पुरी हौस फिटली’ ह्यांसारख्या त्यांच्या स्फुटगोष्टींत वा दीर्घकथांत साधी घरगुती भाषा, उत्कृष्ट स्वभाव रेखाटन, वास्तव चित्रण व चटकदार निवेदन हे लेखन-विशेेष आढळून येतात. ‘स्फुट गोष्टी: भाग १-४’ (१९१५)ह्या संग्रहात हरीभाऊंच्या स्फुट कथांचा समावेश आहे.
‘पण लक्ष्यांत कोण घेतो’ (१८९०-१८९३) ह्या कादंबरीनंतर हरिभाऊंनी पुढील सात सामाजिक कादंबर्या लिहिल्या : ‘गणपतराव’ (१८८६-१८९३), ‘यशवंतराव खरे’ (१८९२-१८९५), ‘मी’ (१८९३-१८९५), ‘जग हे असें आहे’ (१९९७-१९९९), ‘भयंकर दिव्य’ (१९०१-१९०३), ‘आजच’ (१९०४-१९०६, अपूर्ण), ‘मायेचा बाजार’ (१९१०-१९१२), ‘कर्मयोग’ (१९१३-१९१७, अपूर्ण); ह्या सर्व कादंबर्या ‘करमणुकी’त आधी क्रमशः प्रसिद्ध झाल्या आणि नंतर त्या पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्यात आल्या.
सामाजिक कादंबऱ्यांप्रमाणे हरिभाऊंनी पुढील ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या- ‘म्हैसूरचा वाघ’ (अपूर्ण) ही मेडोज टेलरच्या ‘टिपू सुलतान’ ह्या कादंबरीवर आधारित हरिभाऊंची पहिली ऐतिहासिक कादंबरी १८९५ साली प्रसिद्ध झाली. ‘उषःकाल’ (१८९५-१८९७), ‘केवळ स्वराज्यासाठी’ (१८९८-१८९९), ‘रूपनगरची राजकन्या’ (१९००-१९०२), ‘चंद्रगुप्त’ (१९०२-१९०५), ‘गड आला पण सिंह गेला’ (१९०३-१९०४), ‘सूर्योदय’ (१९०५-१९०६), ‘मध्यान्ह’ (अपूर्ण, १९०६-१९०८); ‘सूर्यग्रहण’ (अपूर्ण, १९०८-१९०९), ‘कालकूट’ (अपूर्ण, १९०९-१९११), ‘वज्राघात अथवा विजयनगरचा विनाशकाल’ (१९१३-१९१५).
हरीभाऊंच्या ‘करमणूक’मध्ये क्रमशः प्रसिद्ध झालेल्या कादंबऱ्या ग्रंथरूपात आल्यावर त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. हरीभाऊंचा पिंड आदर्शवादी सुधारकाचा होता. वृत्ती सात्त्विक आणि सौजन्यशील होती. आपल्या कादंबऱ्यांतून त्यांनी ‘सत्’चे चित्रण केले. त्यांच्या कादंबऱ्यांतील जग हे मध्यमवर्गीयांचे जग आहे; या समाजघटकातील स्त्री-पुरुषांच्या, प्रामुख्याने स्त्रियांच्या समस्या त्यांनी मांडल्या. हरीभाऊ केवळ वास्तवाचे रेखाटन करणारे कादंबरीकार नव्हते. भोवतीच्या समाजस्थितीचे चित्र समाजापुढे मांडून त्यातील गुणदोषांकडे वाचकांचे लक्ष वेधले आणि साद्यःस्थितीतून उत्क्रांती करण्यासाठी, ध्येयसिद्धी करण्यासाठी काय केले पाहिजे; याचे दिग्दर्शन त्यांनी कादंबऱ्यांतून केले. ‘पण लक्ष्यांत कोण घेतो’ आणि ‘मी’ ह्या हरीभाऊंच्या दोन कादंबर्या मराठीतील लक्षणीय सामाजिक कादंबर्या आहेत. रूढीबद्ध मध्यमवर्गीय सनातनी कौटुंबिक जीवनाच्या सूक्ष्म निरीक्षणातून निर्माण झालेली ‘पण लक्ष्यांत कोण घेतो’ ही वास्तववादी कथेतून सामाजिक प्रमेय सिद्ध करणारी मराठीतील पहिलीच आत्मकथनात्मक कादंबरी आहे. या कादंबरीने हरिभाऊंना मराठी कादंबरी क्षेत्रात युगप्रवर्तकाचा मान मिळवून दिला.
पाश्चात्त्य सामाजिक कादंबऱ्यांप्रमाणेच सर वॉल्टर स्कॉट, व्हिक्टर ह्यूगो, ड्यूमा व टॉलस्टॉय या लेखकांच्या कादंबर्या हरिभाऊंनी आवडीने वाचल्या होत्या. सर वॉल्टर स्कॉटच्या कादंबऱ्यांची त्यांनी अनेक पारायणे केली होती. शिवाय शिवाजी व शिवकाला यांसंबंधी उपलब्ध साधने, बखरींची इंग्रजीतील भाषांतरे, काव्येतिहास संग्रह, पोवाडे, म्हल्हारराव चिटणीस लिखित सप्तप्रकरणात्मक ‘चरित्र’ ही बखर आदींचे वाचन त्यांनी केले होते. महाराष्ट्राच्या इतिहासावरील साधने उपलब्ध नसतानाही हरीभाऊंनी दर्जेदार ऐतिहासिक कादंबर्या लिहिल्या. कादंबऱ्या रंजक व्हाव्यात म्हणून त्यांनी काही कल्पित पात्रांचीही योजना केली.कादंबऱ्यांतून उत्कंठावर्धक कथानकांची मांडणी केली. विजयनगरच्या इतिहासावरील भरपूर साधने उपलब्ध नव्हती. तरीही ‘वज्राघात’सारखी भाषावैभवाच्या दृष्टीने सरस असणारी; नाजुकपणा, कौशल्य, रेखीवपणा ही वैशिष्ट्ये असाणारी कादंबरी म्हणजे हरीभाऊंच्या प्रतिभाशक्तीची किमया आहे. हरीभाऊंच्या कादंबरीवर पाल्हाळिक, रसभंग करणारी, गोपनीयतेचा अतिरेक करणारी असे दोषारोप केले गेले हे दोष मान्य केले, तरी त्यांनी शब्दांकित केलेले सामाजिक आणि ऐतिहासिक जीवनाचे विविधरंगी रूप आजही चोखंदळ वाचकांना आकृष्ट करते.
हरीभाऊंनी आपल्या ललित लेखनातून समाजप्रबोधनपर विचार मांडले. त्याप्रमाणे राजकीय-सामाजिक कार्यातही सक्रियतेने भाग घेतला. ‘आनंदाश्रम’ संस्थेद्वारे संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन केले. १९१२ साली अकोला येथे भरलेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मराठी माध्यमाचा आणि पदवी अभ्यासक्रमात मराठी विषयाच्या स्वीकृतीचा पुरस्कार केला तसेच विविध भाषांतील परिभाषिक शब्दकोशांचा आग्रह धरला.