Skip to main content
x

आरा, कृष्णाजी हौलाजी

के.एच.आरा

चित्रकार

           रूढ व प्रचलित चित्रपद्धतीपेक्षा अगदी वेगळ्या प्रकारे रंगलेपन करीत स्थिरचित्रे, नग्नचित्रे व निसर्ग यांचा मिलाफ करून आरा आपली चित्रनिर्मिती करीत. अशा चित्रांतून आगळीवेगळी अभिव्यक्ती करणारे हे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स् ग्रूपमधील चित्रकार. त्यांच्या चित्रांप्रमाणेच ते आगळेवेगळे, कलावंताचे आयुष्य जगले. स्थिरचित्रे किंवा स्टिल लाइफ हा प्रकार भारतात एक पेंटिंगचा प्रकार म्हणून रुजवण्याचे श्रेय आरा यांचे. आरांची चित्रे त्यांतल्या साधेपणाने आणि वेगळेपणाने कायम लक्षात राहणारी. स्टिल लाइफ्स, न्यूड्स, लॅण्डस्केप्स हे चित्रविषय बेमालूमपणे एकमेकांमध्ये सरमिसळ करून चितारण्याची त्यांची पद्धत विलक्षण होती.

           कृष्णाजी हौलाजी आरा यांचा जन्म आन्ध्रप्रदेशात, हैदराबादजवळील बोलारुम गावी झाला. तीन वर्षांच्या वयात आईचे छत्र हरपले आणि वडिलांनी दुसरे लग्न केले. आरांचे वडील क्लीनरची नोकरी करणारे. सावत्र आईच्या छळाला कंटाळलेले आरा वयाच्या सातव्या वर्षी घरून पळून मुंबईला आले. मुलाचा पत्ता लागताच वडील आणि सावत्र आई मुंबईत आपला काही जम बसतोय का ते पाहायला आले; पण लगेचच हैद्राबादला परतले. आरांनी परतायचे नाकारले. वडिलांनी पैसे पाठवायचे नाकारल्याने आरांनी एका युरोपियन महिलेच्या घरी वरकामाची नोकरी पत्करली. आरांच्या या मालकिणीला त्यांचे चित्रकलेचे प्रेम, कसब लक्षात आले. फावल्या वेळात कर रंगकाम, असे म्हणत तिने त्यांना काही वॉटरकलर्स आणि कागद आणून दिले व या लहान मुलाच्या चित्रप्रेमाला प्रोत्साहन मिळाले.

           आरा यांच्या दहाव्या वर्षी वडिलांचा मृत्यू झाला व आरा यांचा घराशी असलेला ऋणानुबंध संपला. १९३० मध्ये आरांना सी.सी. गुल्लिलन नावाच्या ब्रिटिश सद्गृहस्थाकडे काम मिळाले. घरकाम, गाड्या धुण्याचे काम करून उदरनिर्वाह करणारे आरा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत पडले. महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला आणि त्यांची रवानगी तुरुंगात झाली. त्यांच्या दयाळू ब्रिटिश मालकाला दया आली म्हणून त्यांची तिथून पाच महिन्यांत सुटका झाली.

           आरांचा मित्र, योकोहोमा कॉर्पोरेशन नावाच्या जपानी कंपनीत शोफरचे काम करत होता. त्याने शब्द टाकला म्हणून आरांना त्याच कंपनीत १८ रुपये महिना पगारावर गाड्या धुण्याची नोकरी मिळाली. वाळकेश्‍वरला कंपनीच्याच आवारात नोकरांच्या राहायच्या जागा होत्या. त्यांतली एक लहानशी खोलीही मिळाली. दैवाने एक वेगळेच वळण घेतले. दुसर्‍या महायुद्धाचे ते दिवस. पर्ल हार्बरवर जपानने बॉम्बहल्ला केला. आरांच्या जपानी कंपनीचा मालक त्यानंतर अचानक गायबच झाला. मालकाच्या मागे कंपनीची देखभाल करावी म्हणून किंवा राहायला मिळालेले सर्व्हन्ट्स क्वार्टर सोडायचे जिवावर आले म्हणूनही असेल; पण आरा त्यांच्या वाळकेश्‍वरच्या छोट्याशा खोलीतच राहिले. अखेरपर्यंत तोच त्यांचा स्टूडिओ व निवासस्थान झाले. आरांच्या सुरुवातीच्या काळात चित्रांमध्ये आजूबाजूच्या माणसांचे पुस्तकी शैलीमध्ये चित्रण असे. मासे पकडणारे कोळी, लग्नसमारंभातले स्त्री-पुरुष, घोड्यावर बसलेला पुरुष. काहींवर वास्तववादी, तर काहींवर अलंकरणात्मक शैलीचा प्रभाव असायचा. काहींवर बंगाल स्कूलच्या शैलीनुसार वॉश इफेक्ट दिलेला, तर काही चित्रांत त्या काळात आधुनिक वाटणार्‍या प्रयोगाची नक्कल असायची. १९४० पर्यंतच्या आरांच्या चित्रांमध्ये विषय, शैली यांच्या शोधात चाचपडणे सुरू होते.

           आरा जी चित्रे काढायचे, ती एकदा टाइम्स ऑफ इंडियाचे ब्रिटिश कलासमीक्षक रुडी व्हॉन लेडनच्या नजरेस पडली. लेडननी आरांना सल्ला दिला, की गाड्या धुण्याच्या कामात आयुष्य वाया घालवू नकोस. चित्रे रंगव. लेडनने वरखर्चाला काही रक्कम सहृदयतेने आरांना द्यायला सुरुवात केली. लेडनमुळेच मग आरांची भेट वॉल्टर लँगहॅमर यांच्याशी झाली. चित्रकलेची तांत्रिक अंगे आरांकडून घोटवून घेण्याचे श्रेय त्यांचे. लेडनमुळे आरांची ओळख मुंबईमधल्या इतर चित्रकारांशी झाली. त्यांना एक दिशा मिळाली, वृत्तीत प्रयोगशीलता आली.

           आरांकडे शाळेचेही शिक्षण नव्हते आणि चित्रकलेचेही. मुंबईच्या केतकर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर मात्र आरा मुक्तपणे, मनसोक्त चित्रनिर्मितीत रमले. चाळीसचे दशक आरांकरिता भाग्यशाली ठरले. १९४२ मध्ये रॅम्पार्ट रो वरच्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या सॅलाँमध्ये (सध्याचे आर्टिस्ट सेंटर), आरांचे पहिले चित्रप्रदर्शन केमोल्ड गॅलरीच्या केकू गांधींनी भरवले. प्रदर्शन खूप गाजले. प्रदर्शनातल्या चित्रांची मोठी विक्री झाली. त्यानंतर १९४४ साली, आज जिथे चेतना रेस्टॉरन्ट आहे, तिथे आरांचे दुसरे प्रदर्शन भरले. १९४४ मध्ये त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचा प्रतिष्ठेचा गव्हर्नर पुरस्कार प्राप्त झाला.

           आरा याच वेळी सूझाच्या सहवासात आले. सूझा बुद्धिमान, विचारवंत होता. त्याची जोरदार, रॅडिकल विचार करण्याची वृत्ती आरांना आकर्षक वाटली. प्रोगे्रसिव्ह ग्रूपची स्थापना होण्याचा हा काळ होता. १९४७ मध्ये आरांनी स्वातंत्र्यप्राप्तीचा सोहळा अनुभवला. उत्फुल्ल, उसळता जनसागर आरांनी विलक्षण आत्मीयतेने भल्यामोठ्या कॅनव्हासवर त्यांच्या लहानशा खोलीमध्ये, कॅनव्हासचा थोडा थोडा भाग उलगडत रंगवला. बाबूराव सडवेलकरांच्या आग्रहावरून आणि प्रयत्नांनी ते चित्र बॉम्बे आर्ट सोसायटीमध्ये प्रदर्शित झाले. सध्या ते मुंबईच्या विधानसभेमध्ये लावण्यात आले  आहे.

           चाळीसच्या दशकाच्या उत्तरार्धात ४८-४९ मध्ये प्रोग्रेेसिव्ह आर्ट ग्रूपसोबत प्रदर्शने भरवण्यातील थरार आरांनी मनसोक्त उपभोगला. लवकरच सूझा, रझा, बाकरे या ग्रूपच्या सदस्यांनी युरोपला नवे मार्ग शोधण्याकरिता प्रस्थान ठेवले. ग्रूप विखरून गेला. प्रोग्रेेसिव्हच्या कलाकारांपैकी फक्त हुसेन आणि आरा हे दोघेच भारतातल्या  मातीत भक्कम पाय रोवून राहिले. आरांची या काळात व नंतरही अगणित चित्रप्रदर्शने मुंबई, अहमदाबाद, बडोदा (वडोदरा), कलकत्ता (कोलकाता) वगैरे ठिकाणी भरली.

           आरांना स्थिरचित्रांचे जणू वेडच होते. खास आरांचे तंत्र म्हणून ओळखला जाणारा घट्ट रंग बोथट ब्रशने घासत जलरंगामध्ये ते तैलरंगासारखा परिणाम साधत. तैलचित्र रंगवतानाही ते हीच पद्धत, कागद असो की कॅनव्हास; मुक्तपणे व बेधडक, रंगलेपनाचे शास्त्र बाजूला सारून अभिव्यक्त करत. आरांचे भांडी, फळे, फुलदाण्यांचा रचनात्मक मेळ साधण्याचे अथक प्रयोग चालत. त्यांच्या स्थिरचित्रांना एक आदिम प्रेरणा होती. त्यात झपाटलेपण होते.

           आरांच्या या स्थिरचित्रांमध्ये नुसती घटकांची किंवा वस्तूंची मांडणी नसायची; अवकाशातील चंद्र, चांदणे, प्रकाश, सावल्या अशा अनेक गोष्टी चित्रघटक म्हणून येत. या सर्वांची बांधणी ते ज्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेत करत, ती फार प्रभावशाली ठरे. आरांकडे चित्रकलेचे औपचारिक शिक्षण नव्हते याचा एक प्रकारे त्यांना फायदाच झाला. त्यामुळे चित्रांची भाषा समजून घेण्याच्या त्यांच्या या प्रयत्नांमध्ये उत्स्फूर्तता होती. तंत्र व शास्त्राचा अडसर नव्हता. स्वत:च्या आंतरिक जाणिवांशी असणारा खराखुरा प्रामाणिकपणा होता. त्यामुळे आरा वस्तू रंगवत असोत की विवस्त्र स्त्री-देह, फुले रंगवत असोत की फर्निचर, त्यात थेट अभिव्यक्ती असे. कधीकधी ते दिवसातून अनेक पेंटिंग्ज भराभर पूर्ण करीत, एरवी दिवसेंदिवस ते स्टूडिओकडे फिरकतही नसत.

           आरा वर्णाने  काळे, दिसायला साधारण व अनाकर्षक व्यक्तिमत्त्वाचे. ते आयुष्यभर  अविवाहित राहिले. आरा यांनी काढलेली पुष्ट देहांच्या स्त्रियांची नग्नचित्रे (न्यूड्स) आदिम लैंगिकता प्रकट करणारी आहेत. आरांनी नग्नचित्रे रंगवायला सुरुवात नक्की कधी आणि का केली हे ज्ञात नाही. कदाचित आपल्यातल्या धार्मिकतेच्या कडव्या संस्कारांमध्ये अडकून पडलेल्या, नैतिक संकोचात गुदमरलेल्या कलाप्रेरणांना मुक्त करण्यासाठी आरांच्या एकाकी मनाने केलेला तो विद्रोह असू शकतो. कदाचित सूझा करत असलेल्या नग्नचित्रांमुळेही ते प्रेरित झाले असू शकतात. किंवा त्या सुमारास फ्रान्स, बल्गेरिया इत्यादी देशांमध्ये झालेल्या त्यांच्या दौर्‍यांमुळे, तिकडची म्यूझियम्स, चित्रे पाहिल्यामुळे झालेला तो परिणाम असू शकतो. आरा नग्नचित्रे रंगवताना शरीरशास्त्राचा विचार करत नव्हते आणि वास्तवतेचाही. पण त्यात एक विलक्षण भरीवपणा व नैसर्गिकपणा होता.

           आरांची काही नग्नचित्रे भडक, हिंस्र वाटतात. त्यांचे मूळ कदाचित त्यांच्या लहानपणामध्ये दडलेले आहे. सावत्र आईने केलेले छळ, त्यातून त्यांचे घरातून पळून जाणे. आईबद्दलचा तिरस्कार त्यांच्या मनात कायम घर करून होता. वडिलांबद्दलही आरांना कधी प्रेम वाटू शकले नाही; कारण सावत्र आई त्यांच्यामुळे नशिबात आली. काही नग्नचित्रांमधून दिसून येणारा अंगार, तिरस्कार, हिंस्रपणा हे त्याचेच रूप असावे.

           आरांनी त्यांची मॉडेल कोण हे कधीच उघड केले नाही. अगदी जवळच्या आर्टिस्ट मित्रांनाही त्यांनी मॉडेलचे नाव सांगितले नाही. आरा पोर्नोग्रफिक मासिकांमधल्या चित्रांवरून त्यांची न्यूड्स चितारत होते ही अफवा त्यामुळेच उठली असावी.

           १९५२ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीच्या उद्घाटन प्रसंगी बॉम्बे आर्ट सोसायटीचे प्रदर्शन भरले होते. प्रदर्शनाचे सुवर्णपदक आरांच्या ‘टू जग्ज’ या स्थिरचित्राला मिळाले. मुंबईत १९५२, ५४ आणि ६० मध्ये त्यांची पुन्हा स्वतंत्र प्रदर्शने भरली. १९६३ च्या पंडोल आर्ट गॅलरीच्या उद्घाटन प्रदर्शनातही त्यांचा सहभाग होता. १९५५ मध्ये रोमानिया, हंगेरी, बल्गेरियामध्ये त्यांची चित्रप्रदर्शने झाली. प. जर्मनी, रशिया, जपान इथल्या गॅलर्‍यांमध्ये त्यांची पेंटिंग्ज प्रदर्शित केली गेली. शास्त्रज्ञ होमी भाभाही आरांचे मोठे चहाते आणि त्यांच्या चित्रांचे ग्रहक होते.

           हळूहळू आरांची चित्रे श्रीमंत व उच्च वर्गाच्या चर्चेत येऊ लागली. एके काळी धनिकांच्या गाड्या धुण्याचे काम करणारे आरा आता स्वत:बद्दलचे आदराचे उद्गार त्याच धनिकांकडून ऐकू लागले. याच वेळी आरांच्या आयुष्यात एक महत्त्वाची घटना घडली. त्यांना एका कायदेशीर सल्ल्याची गरज भासली आणि त्यांचा परिचय हैदर पठाण या कायदेतज्ज्ञाशी झाला. हैदर पठाण प्रागतिक विचारांचे होते. त्यांची पत्नी झेनाब हिला चित्रे काढायची आवड होती. हैदर तिला काही कॅलेंडर्स आणून देत आणि त्यावर आरांची फुलदाणीतली फुले असायची. हैदरसाहेबांनी आरांना आपल्या पत्नीला चित्रकला  शिकवण्याची विनंती केली. आरांनी होकार दिला आणि आरांच्या आयुष्यात उर्वरित आयुष्यभर पुरून उरणार्‍या एका निर्मळ स्नेहबंधाची सुरुवात झाली. झेनबची मुलगी रुखसाना ही तर आरांची मानसकन्या.

           साठच्या दशकात आरांनी त्यांच्या त्या काळातील सर्व चित्रांचे एक भव्य प्रदर्शन केले आणि त्यात आपल्या प्रत्येक चित्राची किंमत ठेवली १०० रुपये. सामान्यातल्या सामान्यांनाही चित्रसंग्रह करता यावा हा त्यामागे हेतू होता. यापुढची दशके म्हणजे १९७० आणि १९८० मध्ये आरांची चित्रनिर्मितीची ऊर्मी कमी कमी होत गेली. उत्साहही ओसरल्यासारखा झाला होता. या काळात एक नग्नचित्र पूर्ण करायला त्यांनी तेरा वर्षे घेतली. जवळचे पैसे ते नवोदित, गरजू चित्रकारांना देऊन टाकत. त्यांना मार्गदर्शन करत. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या पंखफुटीच्या काळात आरा व्यवस्थापन समितीचे सदस्य होते. ललित कला अकादमीच्या निवड समितीच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग होता. आर्टिस्ट्स् सेन्टरच्या निर्मितीमध्येही आरांचा मोठा सहभाग होता.

           उत्तरार्धातली बरीचशी वर्षे त्यांनी आर्टिस्ट्स् सेन्टरच्या सहवासातच व्यतीत केली. तिथे सेक्रेटरी असताना त्यांनी छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाच्या बाहेरच्या भिंतीचा वापर रस्त्यावरच्या लोकांनी मुतारीसारखा करू नये म्हणून सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून संपूर्ण भिंत देवदेवतांच्या चित्रांनी भरून टाकली. पठाण कुटुंबीयांचा स्नेह आणि प्रेम या काळात आरांचा मोठा आधारस्तंभ होता. १९८५ साली पठाणांच्या निवासस्थानीच आरांचा मृत्यू झाला.

           आरांच्या मृत्यूनंतर १९९१ मध्ये आशिश बलराम नागपाल या चित्रविक्रेत्याने प्रदर्शित केलेली त्यांची चित्रे बनावट असल्याचा आरोप झाला. प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाला खूप प्रसिद्धी दिली. मुंबईच्या कलावर्तुळात दोन तट पडले, गदारोळ उडाला, प्रकरण शेवटी निकाली ठरलेच नाही. आरांची रंगलेपन पद्धत, आदिम आविष्कार व चित्रांवर तारीख न घालण्याची आरांची पद्धतही त्याला कारणीभूत ठरली.

           आरांना चित्रकार म्हणून प्रसिद्धी मिळूनही कधी असामान्यत्व मिळू शकले नाही. सामान्य, निर्धन घरात ते जन्मले, मेले तेव्हाही ते तसेच होते. मृत्यूनंतरही आरा उपेक्षितच राहिले.

- शर्मिला फडके

आरा, कृष्णाजी हौलाजी