Skip to main content
x

आष्टीकर, मधुकर रघुनाथ

डॉ. मधुकर आष्टीकर साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ लेखक, नाटककार, निबंधसंग्रह लेखक म्हणून सुपरिचित आहेत. यांचा जन्म विदर्भातील अमरावती येथे झाला. त्यांनी संस्कृतमधून एम.ए., पीएच.डी. केली. नागपूर विद्यापीठात कलाशाखेचे डीन, कार्यकारिणी सदस्य, संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, मराठी व संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, मराठी व संस्कृत अभ्यास पाठ्यपुस्तक निर्मिती समितीचे अध्यक्ष अशा विविध महत्त्वाच्या पदांवर  त्यांनी काम केले आहे. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद तसेच विदर्भ साहित्य संमेलनाध्यक्षपद, ग्रंथालय परिषदेचे अध्यक्षपद अशी पदे त्यांनी भूषविली. याशिवाय साहित्य अकादमी (नवी दिल्ली), साहित्य संस्कृती मंडळ (महाराष्ट्र) या संस्थांच्याही जबाबदार्‍याही त्यांनी  सांभाळल्या आहेत. पेशाने प्राध्यापक, तसेच नागपूर विद्यापीठात संस्कृत विभाग प्रमुख म्हणून त्यांनी  काम केले.

विदर्भ साहित्य क्षेत्रातील आवर्जून घेतल्या जाणार्‍या प्रमुख नावांपैकी एक नाव  हे आष्टीकर यांचे होय. साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय  आहे. विविध प्रकारचे लेखन हे आष्टीकरांचे वैशिष्ट्य होय. यामध्ये ‘आणखी गडकरी’ (१९८१) हे गडकर्‍यांच्या अप्रकाशित वाङ्मयाचे संकलन आणि भाष्य आहे; ‘एका फांदीचे पक्षी’ हा निबंधसंग्रह, दोन एकांकिका आणि ‘प्रत्येकालाच जोडा चावतो’ हे नाटक यांचाही समावेश यात होतो. ‘ध्वनिसिद्धान्त’ - (हिंदुधर्म संस्कृती मंदिर - नागपूर) यातून संस्कृत काव्यशास्त्रातील ध्वनितत्त्वाचे विवेचन त्यांनी केले आहे. ‘भगवान महावीर आणि विश्वमानवाची संकल्पना’ यावरती लेखन केले आहे. ‘मधुघट’ हा अनुबंधसंग्रह, ‘माझा ज्ञानियाचा राजा’ हे नाटक, चरित्रलेखनही  त्यांनी केले आहे.त्यांनी  संपादित केलेल्या ग्रंथात कोलते गौरव ग्रंथ, संस्कृत व मराठी पाठ्यपुस्तके यांचा समावेश आहे.

नाटक, निबंध संग्रह, एकांकिका, अनुबंध संग्रह या साहित्य प्रकारांत त्यांच्या नावावर विपुल लेखन आहे. केवळ विपुल नाही  तरी दर्जेदार कसदार साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे.  साहित्याव्यतिरिक्त नट, दिग्दर्शक, चित्रपट कथालेखक म्हणूनही त्यांनी  उल्लेखनीय कामगिरी केली. सहजता हा त्यांच्या साहित्याचा विशेष होय.

- जयंत भिडे

 

आष्टीकर, मधुकर रघुनाथ