Skip to main content
x

अत्रे, प्रभा दत्तात्रेय

      प्रभा दत्तात्रेय अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षणही पुण्यातच झाले.  त्यांचे वडील दत्तात्रेय पिलाजी अत्रे पुण्याच्या रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये हेडमास्तर होते. आई इंदिरा अत्रे त्याच शाळेमध्ये शिक्षिका होत्या. घरात गाण्याची परंपरा नव्हती; पण आईच्या आजारपणाचे निमित्त झाले व विरंगुळ्यासाठी हार्मोनिअम घरात आणण्यात आली. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण विजय करंदीकर यांच्याकडे झाले आणि त्यानंतर त्यांनी किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक सुरेशबाबू माने यांच्याकडे शिक्षण घेतले.
     प्रभा अत्रेंना १९४८ ते १९५३ पर्यंत सुरेशबाबूंकडून किराणा घराण्याची पद्धतशीर तालीम मिळाली. त्यांना सुरेशबाबूंच्या आकस्मिक निधनानंतर १९५५ ते १९५७ पर्यंत त्यांच्या भगिनी व ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना १९५५ साली केंद्र सरकारने शास्त्रीय संगीतासाठी जाहीर केलेली शिष्यवृत्ती मिळाली. पुढे १९५७ नंतरची त्यांची वाटचाल स्वचिंतनातून झाली. अमीर खाँ आणि बडे गुलाम अली खाँ यांच्या गायकीने त्यांना एक वेगळी नवी वाट दाखविली.
    प्रभा अत्रे यांनी गांधर्व महाविद्यालयाच्या ‘ संगीत अलंकार’ आणि ‘संगीत प्रवीण’ या पदव्या प्राप्त केल्या आहेत तसेच ट्रीनीटी कॉलेज ऑफ लंडन येथून त्यांनी वेस्टर्न म्युझिक थिअरी या विषयातही अभ्यास पूर्ण केला आहे. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामधून बी.एस्सी., कायदा महाविद्यालयामधून एलएल.बी. आणि बार काउन्सिल अशा पदव्या मिळविल्या. शिक्षण चालू असताना प्रभा अत्रेंनी मैफलींबरोबरच काही काळ संगीत नाटकांमधूनही मुख्य भूमिका केल्या. ‘संगीत शारदा’, ‘विद्याहरण’, ‘संशयकल्लोळ’, ‘मृच्छकटिक’ इ. नाटकांमधून त्यांना नावाजलेल्या नटांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पण तिथे त्यांचे मन फार काळ रमले नाही. त्यांना संगीतच भावले होते आणि मुख्य म्हणजे आकाशवाणीत अचानक नोकरी मिळाल्यामुळे त्यांनी संगीतात करिअर करायचे ठरवले. आकाशवाणीत साहाय्यक संगीत निर्माता म्हणून त्यांनी १९६० ते १९७० पर्यंत काम केले आहे. त्यानंतर त्यांनी १९७९ ते १९९२ पर्यंत मुंबईच्या श्री.ना.दा.ठा. महिला विद्यापीठात संगीत विभाग प्रमुख म्हणूनही काम केले.
    प्रभा अत्रेंचे गाणे शांत, गंभीर, भावनेने ओथंबलेले व अतिशय बुद्धीप्रधान आहे. मींड आणि स्वरकणांचा विपुल प्रयोग, भावपूर्ण स्वर लगाव, शब्दांचे स्पष्ट सांगीतिक उच्चार, आलाप, ताना, सरगम मधील लालित्य, वैविध्य आणि नाविन्य सामान्य श्रोत्यालाही जाणवावे. कर्नाटक संगीतातील गमक आणि सरगम या माध्यमांतून हिंदुस्थानी संगीताला अधिक समृद्ध करण्यात प्रभा अत्रे यांचे मोठे योगदान आहे.
     प्रभा अत्रेंच्या ठुमरीनेही आपले वेगळेपण प्रस्थापित केले आहे. पूरब आणि पंजाबी अंगाची त्यांची अभिजात ठुमरी जशी खानदानी आहे, तशीच ती रसिली आणि नखरेलही आहे. ख्याल आणि ठुमरी तेवढ्याच ताकदीने गाण्यातदेखील अत्रे यांचे नाव अग्रणी आहे. प्रभा अत्रेंनी अनेक बंदिशी रचल्या आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये स्त्री-रचनाकार तशा नगण्य आहेत. या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळात त्यांचे ‘स्वरांगिनी’ हे बंदिशींचे पुस्तक महत्त्वाचे होय. ख्याल, तराणा, चतुरंग, टप्पा, ठुमरी, दादरा, भजन, गीत, गझल अशा वेगवेगळ्या संगीत प्रकारांत त्यांनी रचना केल्या आहेत. काही बंदिशींना कर्नाटकी स्पर्श झाल्यामुळे त्यांचे माधुर्य अधिकच वाढले आहे. ‘स्वरांगिनी’ आणि ‘स्वरंजनी’ या रचनांच्या पुस्तकांमध्ये एकूण जवळजवळ साडेचारशे बंदिशी आहेत. या दोन्ही पुस्तकांचा इंग्रजी अनुवादही झालेला आहे. आज अनेक कलाकार त्यांच्या बंदिशी गात आहेत. एवढेच नाही, तर नृत्य आणि जॅझ संगीतासाठीही त्यांचा वापर केला जात आहे.
     प्रभा अत्रे यांच्या ‘स्वरमयी’ आणि ‘सुस्वराली’ या पुस्तकांतून त्यांची संगीत कलेतील सौंदर्याबद्दलची उपजत संवेदनक्षमता व विचार सोप्या शब्दांत, रेखीवपणे अभिव्यक्त होताना दिसतात. त्यांचे लेखन प्रभावी, आकर्षक आणि नेमके झाले आहे. ‘स्वरमयी’ला महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचा ‘सरगम’वरील शोधनिबंध हा विषयाचे नाविन्य आणि त्यातील आशयामुळे महत्त्वाचा मानला जातो. शिवाय या विषयावरील हा एकमेव शोधप्रबंध म्हणता येईल. ‘एनलायटनिंग द लिसनर’ आणि ‘अलाँग द पाथ ऑफ म्युझिक’ या इंग्रजी पुस्तकांतून त्यांचे विचार अमराठी लोकांपर्यंत पोहोचले आहेत. सांगीतिक अनुभवांवर लिहिलेला त्यांचा ‘अंत:स्वर’ हा काव्यसंग्रह अशा तर्‍हेचा पहिलाच काव्यसंग्रह असावा. त्यांच्या या साहित्याला मराठी साहित्य परिषदेतर्फे ‘मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर’, तसेच ‘काका हाथरसी’ पुरस्कारही मिळाला आहे.
     प्रभा अत्रेंनी भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही अनेक देशांमधून भारतीय संगीताचा प्रचार आणि प्रसार केला आहे. त्यांनी अनेक मैफली, प्रात्यक्षिकांसहित व्याख्याने, कार्य शिबिरे आणि दूरदर्शन कार्यक्रम यांच्या माध्यमांतून अनेक पाश्चात्त्य आणि पौर्वात्य देशांमध्ये भारतीय कंठसंगीत पोहोचवले आहे.
    अत्रेंनी विद्यापीठांतूनही सामूहिक शिक्षणामध्ये शास्त्र आणि प्रस्तुतीकरण यांचा वेगळा विचार मांडला आहे. त्यांनी तयार केलेला श्री.ना.दा.ठा. विद्यापीठातील  एम.ए.चा अभ्यासक्रम अनेक दृष्टींनी परिपूर्ण असा आहे.  प्रभा अत्रेंच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे. परदेशातील विद्यापीठांतूनही त्यांनी भारतीय संगीत शिकविले आहे. विशेष म्हणजे इतर विद्यापीठांतून पाच विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यावर पीएच.डी. केली आहे. शास्त्रीय संगीत व इतर प्रयोगसिद्ध कलांचे जतन, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘डॉ. प्रभा अत्रे फाउण्डेशन’ची स्थापना केली आहे. डॉ. प्रभा अत्रे फाउण्डेशनतर्फे चर्चासत्र, कार्य शिबिर, प्रात्यक्षिकांसहित व्याख्याने आयोजित केली जातात. तसेच गुरूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी एक संगीत महोत्सव आयोजित केला जातो.
    गुरु-शिष्य परंपरा आणि विद्यापीठीय शिक्षण यांच्या समन्वयातून त्यांनी पुण्याला ‘स्वरमयी गुरुकुल’ची स्थापना केली आहे. इथे संगीताचे सर्वांगीण शिक्षण दिले जाते. याचबरोबर तरुण, गुणी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मासिक मैफली आयोजित केल्या जातात. अनेक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांमधून त्या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध समित्यांवरही त्यांची नेमणूक झाली आहे. राग-रस, राग-समय-बंदिशीची लांबी आदी रूढींना काहीसे छेद देणारे विचार त्यांनी वेळोवेळी प्रकट केले आहेत. परंपरेच्या चौकटीत राहूनही त्यांनी नाविन्य  निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
     देशातील एक ज्येष्ठ गायिका, रचनाकार, चिंतनकार, लेखिका आणि गुरू अशा विविध भूमिकांमधून प्रभा अत्रेंचे कार्य जनतेसमोर आले आहे. भारत सरकारने त्यांना १९९० साली ‘पद्मश्री’ व ‘२००२ साली पद्मभूषण’ पुरस्कार देऊन त्यांच्या संगीत विषयक कर्तृत्वाचा गौरव केला आहे. तसेच, मध्य प्रदेश शासनाचा ‘कालिदास सन्मान’, १९९१ साली ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, असे इतर राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत.संकेश्वर येथील शंकराचार्य यांच्याकडून त्यांना “गान प्रभा” असा सन्मान मिळाला आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध अशा “सवाई गंधर्व -भीमसेन संगीत महोत्सवाची’ सांगता करण्याचा मान ज्येष्ठ गायिका म्हणून प्रभा अत्रे यांना मिळाला आहे. त्यांचे पुण्यात वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. 

डॉ. अश्विनी वळसंगकर/डॉ. आर्या जोशी

अत्रे, प्रभा दत्तात्रेय