Skip to main content
x

बापट, विश्वनाथ वामन

बापट, वसंत

     स्वातंत्र्योत्तर काळातील एक महत्त्वाचे कवी म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वसंत बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. कवी, ललित गद्यलेखक, प्रवासवर्णनकार, गीतकार, स्वातंत्र्यशाहीर, स्वातंत्र्यसैनिक, वक्ता, प्राध्यापक, अभिनेता, पत्रकार, संपादक, राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकाचा संस्थापक-संवर्धक, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक-निवेदक या नात्यांनी परिचित असलेल्या वसंत बापट यांचे मूळ नाव विश्वनाथ वामन बापट. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड  येथे झाला. त्यांचे वडील वामनराव उर्फ रावसाहेब बापट हे न्यायाधीश होते. ते जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवणारे संस्कृतचे व्यासंगी अभ्यासक होते.

     वसंत बापटांचे प्राथमिक शिक्षण बेळगाव येथील शाळेत, माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालयात झाले. बापट सीनिअर बी.ए.च्या वर्गात असताना महात्मा गांधींचे ‘चले जाव आंदोलन’ सुरू झाले. उसळत्या रक्ताच्या तरुण स्वातंत्र्यप्रेमी बापटांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिले आणि भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. तुरुंगवासामुळे बापट साने गुरुजी, एस.एम.जोशी, ना.ग.गोरे आदी समाजवादी नेत्यांच्या संपर्कात आले. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी पुन्हा महाविद्यालयीन अभ्यासाला सुरुवात केली. १९४६ साली बापट संस्कृत विषय घेऊन प्रथम श्रेणीत बी.ए. आणि १९४८ साली संस्कृत विषय घेऊन एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९४८ साली धारवाड महाविद्यालय, १९४९-१९६४ नॅशनल महाविद्यालय, बांद्रे येथे बापटांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली.

     १९७४-१९८२ मुंबई विद्यापीठात ‘गुरुदेव रवींद्रनाथ टागोर’ तौलनिक साहित्याचे प्राध्यापक म्हणून काम करून मुंबई विद्यापीठाच्या सेवेतून बापट निवृत्त झाले. जवळजवळ ३५ वर्षे अध्यापनाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या बापटांनी अनेक उपक्रमांत सहभागी होऊन आपले नैपुण्य प्रकट केले आहे. उदाहरणार्थ १९८३ ते १९९८ ‘साधना’ साप्ताहिकाचे सहसंपादक, १९४६ ते १९८१ राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकाची जबाबदारी सांभाळताना ‘महाराष्ट्र दर्शन’, ‘भारत दर्शन’, ‘आझादी की जंग’, ‘शिवदर्शन’, ‘गोमंतक दर्शन’ इत्यादी कार्यक्रमांचे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती केली. ‘पुढारी पाहिजे’, ‘बिनबियांचे झाड’, ‘गल्ली ते दिल्ली’ या वगनाट्यांत भूमिका; ‘श्यामची आई’, ‘उंबरठा’ या चित्रपटांसाठी गीतलेखन; भारतात व विदेशात काव्यवाचनाचे कार्यक्रम; ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या अमेरिकेत सादर झालेल्या कार्यक्रमासाठी लेखन; साधना ट्रस्ट, राष्ट्र सेवा दल, आंतरभारती, साने गुरुजी आरोग्य मंदिर, सांताक्रुझ या संस्थांचे अनेक वर्षे विश्वस्त; साहित्य अकादमी, संगीत अकादमी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली; महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ, तसेच चित्रपट सेन्सॉर मंडळ ह्या संस्थांचे ते सदस्य होते. याशिवाय आंतरभारती विश्वस्त निधीतर्फे प्रवासवृत्ती (१९६३-१९६४) मिळाल्याने भारत भ्रमण, अमेरिका, नेपाळ, मॉरिशस या देशांचा प्रवास केला.

     वसंत बापटांचा ‘बिजली’ हा १९५२ साली पहिला काव्यसंग्रह वाचकांसमोर आल्यानंतर १९९८ साली प्रसिद्ध झालेल्या ‘धडपडणार्‍या मुलांचे साने गुरुजी’ या पुस्तकापर्यंत पंचेचाळीस वर्षांत बापटांनी ३४ पुस्तके सिद्ध केली आहेत. त्यांत १३ कविता संग्रह, ६ बालकविता संग्रह, १ बालनाट्य, १ बाल नृत्य-नाट्य, ३ प्रवासवर्णने, १व्यक्तिदर्शन, १ ललितगद्य, १ राजकीय उपहास, २ समीक्षा, ३ संपादित/सहसंपादित आणि २ संकीर्ण अशी वेगवेगळी पुस्तके आहेत.

     ‘सेतु’ (१९५७), ‘अकरावी दिशा’ (१९६२), ‘मानसी’ (१९७७), ‘प्रवासाच्या कविता’ (१९८२), ‘तेजसी’ (१९९१) हे स्फुट कवितांचे संग्रह, आणि ‘चंगा मंगा’ (१९८३), ‘अबडक तबडक’ (१९८३), ‘गरगर गिरकी’ (१९९२), आणि ‘बालगोविंद’ (१९६५, बालनाट्य), ‘परीच्या राज्यात’ (१९९४, बालनृत्य नाट्य), ही बापटांची उल्लेखनीय काव्यविषयक पुस्तके आहेत. याशिवाय ‘बारा गावचं पाणी’ (१९६६), ‘जिंकुनि मरणाला’ (१९८१), ‘ताणे बाणे’ (१९९९) ही प्रवासवर्णन-व्यक्तिदर्शन-ललितगद्य ह्या गटांत मोडणारी पुस्तके बापटांनी लिहिली आहेत. ‘विसाजीपंतांची वीस कलमी बखर’ हे राजकीय परिस्थितीवर उपहासपर भाष्य करणारे पुस्तक बापटांनी बखरीच्या शैलीत लिहिले आहे.

     वसंत बापटांच्या आयुष्याची घडण आणि त्यांची कविता यांच्यात निकटचे नाते आहे. राष्ट्रीय जाणिवेचे भान असलेल्या बापटांनी आपल्या काव्य-लेखन प्रवासात विविध काव्यप्रकार हाताळले आहेत. १९४२चे आंदोलन, राष्ट्र सेवा दलातील सहभाग, पंढरपूर विठ्ठल मंदिर मुक्ती लढा, गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, भूदान चळवळ, राष्ट्र सेवा दल कलापथक यांत त्यांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष सहभाग होता. सामाजिक आणि राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी काव्य-लेखन केले. राष्ट्रीय गीते, स्फूर्तिगीते, पोवाडे, राष्ट्रीय तमाशा, वगनाट्ये यांसारखे लेखन त्यांनी प्रारंभीच्या काळात केले. ‘जनजागरण’ हे त्यांच्या प्रारंभीच्या कवितेचे एक महत्त्वाचे प्रयोजन आहे. ह्या कवितेवर समाजवादी विचारधारेचा प्रभाव आहे. त्यामुळे बापटांच्या कवितेचे रूप काहीसे प्रचारात्मक झाले आहे. त्यांच्या कवितेत सामाजिक जिव्हाळा, सामाजिक समता, माणसाबद्दलचे प्रेम, मानवतावाद, आशावाद, शुचित्व यांचे दर्शन घडते. मंगलाची- विश्वमंगलाची आकांक्षा बाळगणारा हा कवी अन्याय, विषमता, दांभिकता, ढोंगीपणा यांचे उपरोधपूर्ण चित्रण करतो.

     बापटांची राष्ट्रीय जाणिवेची कविता अधिक प्रभावी असून ती सामाजिक रूप घेऊन अवतरते. मात्र काही वेळा तिच्यात चिंतनशीलतेचा अभाव जाणवतो. ती क्वचित भाबडी, कृत्रिम आणि प्रासंगिक होते. वीर विभूति-पूजनाची प्रवृत्ती अंगी बाणल्यामुळे देशभक्ती, राष्ट्रप्रेम, जनजागृती निर्माण करण्यासाठी बापटांनी पोवाडे लिहिले. अशा वेळी समकालीन समाजस्थितीशी बापट एकरूप झालेले दिसतात. ‘बिजली’पासून ‘रसिया’पर्यंत बापटांच्या कवितेत सामाजिक भावनेचा विकास झाला आहे. तरीही बापट मूलतः प्रेमकवीच आहेत. प्रणयभावनेचे अनेकविध रंग त्यांच्या कवितेत आविष्कृत झाले आहेत. त्यांच्या कवितेत विवाहपूर्व आणि विवाहबाह्य प्रणयाचे चित्रण झाले आहे. प्रामुख्याने पुरुषी व्यक्तिमत्त्वाचा किंवा प्रेमिकांचा प्रणयाविष्कार बापटांच्या कवितेत आढळतो. प्राचीन संस्कृत काव्यपरंपरेतील प्रेमभावनेचा आणि मराठी लावणीमधील शृंगाराचा प्रभाव बापटांच्या प्रेमकवितेत जाणवतो. त्यांनी लिहिलेली आधुनिकतेचा स्पर्श झालेली लावणी लोककलांच्या अनुषंगाने विकसित झाली आहे. त्यांनी लिहिलेल्या लावण्या शृंगारिक, नखरेल, मनोरंजनात्मक असून गेयता, नादमयता, तालबद्धता, नाट्यमयता, भावनेतील उत्कटता आणि मुक्तपणा हे तिचे ठळक विशेष आहेत. पुरुषी दृष्टिकोनातून व्यक्त होणारी स्त्री-सौंदर्याची अभिलाषा हाही तिचा आणखी एक ठळक विशेष आहे. बापटांच्या कवितेतील निसर्गचित्रण किंवा निसर्गरूपे पारंपरिक मराठी कवितेतील निसर्गरूपापेक्षा वेगळी आहेत. प्रेमभावना आणि निसर्गचित्रण यांचे साहचर्य बापटांच्या कवितेत दिसून येते. प्रेमभावनेच्या आविष्कारासाठी पार्श्वभूमी म्हणून बापटांनी निसर्ग स्वीकारला आहे.

     विषय कोणताही असो, एका अर्थी बापटांची कविता ही समूहमनाची कविता आहे. तिचे आवाहन सार्‍या समाजाला, अखिल मानवजातीला असते. त्यामुळे आयुष्याच्या अखेरपर्यंत बापटांच्या कवितेत सामान्यांच्या, शोषितांच्या परिवर्तनाचा ध्यास प्रकटत राहिला. लोकपरंपरेशी असलेल्या नात्यामुळे बापट सेवादलासाठी, सर्वसाधारण रसिकांसाठी जोमाने कविता लिहीत राहिले. काव्यवाचनासारखे प्रभावी माध्यम सापडल्यामुळे बापटांची समाजाभिमुख कविता महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत सर्वदूर पसरली. काव्यगायन मागे पडून काव्यवाचन, काव्यसादरीकरण, काव्यदर्शन ही कला विकसित करण्याचे श्रेय विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांना दिले जाते. ह्या कवि-त्रयीच्या जाहीर काव्यदर्शनामुळे मराठी मनाची रसिकता वाढत गेली. कविता कशी सादर करावी, याची विलक्षण जाण बापटांना होती. ‘बिजली’, ‘दख्खनची राणी’, ‘फुंकर’, ‘झेलमचे अश्रू’, ‘सावंत’, ‘रंगाने तू गव्हाळ’, ‘मायकेलँजेलोपनिषद’, ‘सांभाळ जरा’, ‘अमेरिके अमेरिके दार उघड’, ‘आंबा पिकतो’, ‘लावणी: अखेरच्या विनवणीची’ इत्यादी कवितांना रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्तपणे दाद मिळत असे. अलीकडच्या दोन दशकांत मराठी साहित्यविश्वात काव्यवाचनाला मिळणारा प्रतिसाद ही वसंत बापट आणि त्यांच्याबरोबर काव्यवाचन करणार्‍या विंदा करंदीकर व मंगेश पाडगावकर या कवींची देणगी म्हणावी लागेल. वसंत बापटांवर संस्कृत साहित्य आाणि भाषा यांचे संस्कार बालपणापासून झाले होते. कविकुलगुरू कालिदासांचे ‘मेघदूत’ हे अजरामर प्रेमकाव्य आहे. बापटांनी ‘मेघदूता’च्या अनुवादासाठी प्रवृत्त होण्यामागे काही कारणे आहेत. ‘मेघदूता’च्या अजोड, अतुलनीय काव्यसौंदर्याचा आस्वाद रसिकांना घेता यावा, असे सौंदर्यवादी बापटांना वाटले. छंदावर व वृत्तावर प्रभुत्व असूनही बापटांनी ‘मेघदूत’च्या अनुवादासाठी मुक्तछंदाचा अंगीकार केला आहे. या अनुवादासाठी सोपी, उत्कट आणि नित्याच्या वापरातील भाषा आहे. ‘मेघहृदय’ ह्या शीर्षकाने मराठीत अनुवादित केलेल्या संस्कृत मेघदूताची चौकट बापटांनी सांभाळली आहे. तसेच बापटांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसाही अनुवादावर उमटला आहे.

     वसंत बापट कवी म्हणून रसिकप्रिय असले, तरी त्यांची गद्यलेखनातील कामगिरीही लक्षणीय ठरली आहे. साने गुरुजींच्या इच्छेनुसार त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या प्रारंभकाळात साने गुरुजींना सहकार्य केले. १९८३पासून १९९८पर्यंत ‘साधना’ साप्ताहिकाच्या प्रमुख संपादकपदाची जबाबदारी बापटांनी निष्ठापूर्वक सांभाळली होती. त्यासाठी अग्रलेख, टीकालेख, प्रासंगिक लेख या स्वरूपाचे लेखन केले. खट्याळ विनोदबुद्धी, धारदार उपहास, बखरीची शैली आणि नाट्यमयता अशा गुणांनी ढंगदार बनलेल्या स्फुटांतून बापटांचे ‘विसाजी पंतांची वीसकलमी बखर’ (१९८७) हे पुस्तक सिद्ध झाले. ‘जिंकुनि मरणाला’ (१९८१) या व्यक्तिचित्रणपर पुस्तकात बापटांनी त्यांना भावलेल्या व्यक्तींविषयी समरसतेने लिहिले आहे. त्यांत बालगंधर्व, आचार्य अत्रे, साने गुरुजी, बॅ.नाथ पै, आवाबेन देशपांडे, नाना नारळकर अशी भिन्नधर्मी व्यक्तिमत्त्वे आहेत. ‘ताणे बाणे’ (१९८७) हा बापटांच्या आत्मपर स्तंभलेखनातून तयार झालेला लेखसंग्रह आहे. तर ‘बारा गावचं पाणी’ (१९६६) हे प्रवासवर्णन आहे. १९७४ ते १९८२ ह्या काळात बापटांनी मुंबई विद्यापीठात ‘गुरुदेव रवींद्रनाथ टागोर तौलनिक साहित्याभ्यास’ या केंद्रात प्रमुख प्राध्यापक म्हणून काम केले. तौलनिक साहित्याभ्यास ह्या शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि अध्यापन करीत असताना बापटांनी ‘तौलनिक साहित्याभ्यास: मूलतत्त्वे आाणि दिशा’ (१९८७) ह्या वैचारिक पुस्तकाची निर्मिती केली.

     बापटांना अनेक पुरस्कारांनी आणि मानसन्मानांनी गौरविण्यात आले आहे. ‘सेतु’, ‘मानसी’, ‘बालगोविंद’ या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बापटांनी अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षस्थान विभूषित केले आहे. उदाहरणार्थ मुंबई महानगर मराठी साहित्य संमेलन, मुलुंड, १९८३; ३३ वे अखिल भारतीय गुजराती साहित्य संमेलन, पुणे, १९८५; ग्रामीण साहित्य संमेलन, विटा, १९८७; ७२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मुंबई, १९९८.

     मुंबईच्या सांताक्रुझ परिसरात साने गुरूजी आरोग्य केंद्र स्थापन करण्यात बापटांचा सक्रिय सहभाग होता. या संस्थेतर्फे कवी वसंत बापट यांच्या स्मरणार्थ आंतरशालेय समूह गीतगायन स्पर्धेचे गेली २५ वर्षे आयोजन करण्यात येत आहे. साने गुरुजी आरोग्य केंद्राच्या इमारतीत ‘कवी वसंत बापट संगीत-नृत्य-नाट्य दालन’ उभारण्यात आले आहे.

     सौंदर्यवेधी, आशावादी, ध्येयासक्त वसंत बापटांचे समकालीन कवींमध्ये जसे स्वतंत्र स्थान आहे, तसेच ते समग्र मराठी कवितेतही आहे.

     - वि. शं. चौघुले

बापट, विश्वनाथ वामन