Skip to main content
x

बडिगेर, देवाप्पा गुळाप्पा

           लंडन येथील रॉयल अकॅडमीत उच्च शिक्षण घेऊन प्रत्यक्ष मॉडेलवरून पेन, पेन्सिल व रंग या तीनही माध्यमांत कमालीची दर्जेदार अभ्यासचित्रे करणारे कलावंत व तत्कालीन मुंबई इलाख्यात ड्रॉइंग इन्स्पेक्टर या मानाच्या जागेवर कार्यरत असणारे अधिकारी म्हणून बडिगेर यांची प्रसिद्धी होती.

देवाप्पा गुळाप्पा बडिगेर यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात मिसराकोटी (मिश्रीकोट) या हुबळीजवळच्या सुतारकामाची व कलाकौशल्याची परंपरा असलेल्या एका कुटुंबात झाला. आईचे नाव तंगम्मा होते. वडील गुळाप्पा हे काष्ठकौशल्यात निपुण होते. एकदा म्हैसूर येथील देवळाच्या रथाचे काम सुरू असताना वडिलांनी रथाचे सिंह करण्याचे काम देवाप्पावर सोपविले. देेवाप्पाला असलेली उपजत कलाकौशल्याची चुणूक येथेच दिसून आली. पुढे शाळेतील चित्रकला शिक्षकांच्या प्रोत्साहनाने व सूचनेने त्यांच्या वडिलांनी त्यांना मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये पाठवले. १९२५ मध्ये त्यांचा विवाह देवीबाई यांच्याशी झाला.

जे.जे.चे तत्कालीन प्राचार्य ग्लॅडस्टन सॉलोमन यांच्या मार्गदर्शनाखाली बडिगेरांची चित्रकला अनेक अंगांनी विकसित झाली. त्यांनी १९२७ मध्ये जी.डी.आर्ट (पेंटिंग) ही पदविका प्राप्त केली. याच वर्षी त्यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याकरिता असलेले ‘मेयो पदक’ देण्यात आले. शिवाय गव्हर्नरचे विशेष पदक आणि इतरही अनेक पारितोषिके व पदके बडिगेरांनी आपल्या शैक्षणिक कालावधीत मिळवली. जे.जे.मध्ये एका वर्षाची फेलोशिपदेखील त्यांना देण्यात आली. ग्लॅडस्टन सॉलोमन यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील इम्पीरिअल सेक्रेटरिएट येथील व्हाइसरिगल लॉजच्या भिंतीवर १९२९ मधील भित्तिचित्राच्या कामातही त्यांना सहभागी करून घेण्यात आले होते.

त्यांना पाश्चिमात्य कला व चित्रकारांबद्दल विशेष आकर्षण होते. बडिगेर यांनी सॉलोमन यांच्यापाशी लंडन येथील रॉयल अकॅडमीमध्येे जाऊन शिकण्याची इच्छा व्यक्त केली. सॉलोमन यांनी त्यांना प्रोत्साहन दिले व प्रवेश मिळावा म्हणून शिफारसपत्रही दिले.

त्यांनी १९२९मध्येे रॉयल अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. रॉयल अकॅडमीमध्येे अभ्यासक्रमाला गेलेले हे दुसरे भारतीय होत. त्यांनी १९२९ ते १९३१ या कालावधीत दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. लंडन येथील इंडिया हाउसला १९३० मध्ये झालेल्या बॉम्बे स्कूलच्या प्रदर्शनात जे.जे.मध्येे शिकत असलेल्या काही विद्यार्थ्यांबरोबरच बडिगेरांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली. प्रदर्शनाचे उद्घाटन सर रुडयार्ड किपलिंग यांच्या हस्ते झाले होते. लंडनच्या ब्लूम्सबरी गॅलरीतही बडिगेरांचे एकल प्रदर्शन झाले होते. वयाच्या अवघ्या सव्विसाव्या वर्षी त्यांनी कलासमीक्षकांची वाहवा मिळवली.

रुडयार्ड किपलिंग यांनी ‘‘पौर्वात्य आणि पाश्‍चिमात्य कलेचा मनोरम मिलाफ बडिगेरांच्या चित्रातून आविष्कृत होतो’’ असे उद्गार काढले. त्यांचे ‘टेम्प्टेशन ऑफ तिलोत्तमा’ (क्रिएशन ऑफ तिलोत्तमा) हे चित्र क्वीन मेरीने विकत घेतले. फ्रान्स आणि इटलीतही त्यांनी आपली चित्रे दाखवली. ते १९३१ मध्ये भारतात परतले.

भारतात परत आल्यावर बडिगेरांनी १९३१ मध्ये कलाशिक्षण देणाऱ्या नूतन कला मंदिराची स्थापना मुंबईत व्ही.आर.राव व दंडवतीमठ या आपल्या सहकाऱ्यांसह केली.

मुंबई इलाख्याच्या इन्स्पेक्टर ऑफ ड्रॉइंग अ‍ॅण्ड क्राफ्ट्स या प्रतिष्ठित जागेवर १९३२ मध्ये झालेली नियुक्ती हा त्यांच्या कला कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई इलाख्याचे क्षेत्र सध्याच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतापासून ते उत्तर कर्नाटकातील धारवाड-हुबळीपर्यंत विस्तृत होते. एक सर्वोच्च अधिकारी म्हणून चित्रकला शिक्षणविषयक जबाबदारी बडिगेरांवर होती. आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत कला शिक्षण समितीचे सचिव, चित्रकला गे्रड परीक्षांचे संयोजक, तसेच उच्चकला परीक्षेच्या परीक्षक मंडळावर सचिव, अशा अनेक जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे कलानिर्मितीकडे काहीसे दुर्लक्षच झाले. परिणामतः, या अतिशय संवेदनशील कला व कौशल्यावर हुकमत असलेल्या प्रतिभावंताकडून पुढील काळात फारशी कलानिर्मिती झाली नाही.  १९६० मध्ये ते निवृत्त झाले.

त्यांच्या कलानिर्मितीचा १९२३ ते १९३२ हा अवघ्या नऊ-दहा वर्षांचा कालखंड आहे. व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण, मानवाकृती अभ्यासाची रेखाटने; पौराणिक, तसेच भारतीय साहित्य-काव्य या विषयांवरील चित्रे इत्यादी कलाप्रकारांत त्यांनी अत्यंत यशस्वीपणे काम केलेले दिसते. रॉयल अकॅडमी, लंडन येथील शिक्षणामुळे त्यांचे मानवाकृती रेखाटनावरील, तसेच व्यक्तिचित्रणा-वरील प्रभुत्वही दिसते. पेन आणि इंकमधील अभ्यास रेखाटने पाहता शरीररचनाशास्त्राचा अभ्यास, मॉडेलची डौलदार पोझ वा भरीवपणा असलेले शिल्पसदृश गुणधर्मही प्रतीत होतात. त्यांची पेन्सिलमधील रेखाटने अत्यंत नाजूक व संवेदनशील आहेत.

‘वीर भद्रावतार’ या चित्रातून मुंबईतील पुनरुज्जीवनवादी चळवळीतील चित्रकलाशैलीची वैशिष्ट्ये दिसतात, तर दिल्ली येथील ‘एलोरा’ या चित्रात पाश्‍चिमात्यांची शरीर-प्रमाणबद्धता व भारतीय चित्रसंस्कृतीतील सौंदर्यतत्त्वे यांचा मिलाफ दिसतो.

निवृत्त झाल्यानंतर उर्वरित आयुष्य मनसोक्त चित्रे काढत धारवाडमध्ये, स्वतःच्या घरात घालवावे अशी त्यांची मनीषा होती. परंतु काही कौटुंबिक कारणामुळे त्यांना मुंबईतच राहावे लागले. निवृत्तीनंतर सात वर्षांनी त्यांचे निधन झाले. बडिगेरांची फारशी चित्रे उपलब्ध नाहीत. ‘मास्टर स्ट्रोक्स’ या २००३ च्या जहांगीर आर्ट गॅलरीच्या प्रदर्शनातून व पुणे येथील सुदर्शन आर्ट गॅलरीतील २००४ मधील प्रदर्शनातून त्यांची चित्रे रसिकांना पाहायला मिळाली.

- माधव इमारते

बडिगेर, देवाप्पा गुळाप्पा