Skip to main content
x

चिपळूणकर, विद्याधर विष्णू

       विद्याधर विष्णू चिपळूणकर यांचा जन्म मुंबईतील विलेपार्ले येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईमधील पार्ले टिळक विद्यालयात झाले. संस्कृत विषयात बी.ए. केल्यानंतर त्यांनी एम.ए.एम.एड. या पदव्या घेतल्या. १९४८ मध्ये ते खार येथील विद्यामंदिर शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढे १९५६ मध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग जवळील पोयनाड येथील शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. १९५९ मध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत त्यांची शिक्षण संचालक या पदावर नेमणूक झाली.

      त्यांनी महाराष्ट्रात प्रदीर्घ काल, विविध पदांवर, शिक्षण विभागात कार्य केले. कोल्हापूर-मुंबई येथे बी.एड.महाविद्यालयामध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून कार्य केले. औरंगाबाद येथे शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्राचार्य म्हणून (१९६६ ते ७१) त्यांनी काम पाहिले.

      बीड येथे शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी सेवा केली. राज्य शिक्षणशास्त्र संस्था पुणे येथे संचालकपद त्यांनी भूषविले. त्यानंतर पाठ्यपुस्तकमंडळ - बालभारती, पुणे येथे ते संचालक होते. टोकियो येथील शैक्षणिक संशोधन कार्यशाळेत ते सहभागी झालेले होते. राज्याचे शिक्षणसंचालक असताना अनेक शैक्षणिक उपक्रम हाती घेतले. त्यातील काही उपक्रमांचा केंद्रशासनाच्या स्तरावर चिकित्सक अभ्यास होऊन त्यांना मान्यता मिळाली. संपर्काधिष्ठित शालेय गुणविकासाचा कार्यक्रम या योजनेनुसार सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी शाळांची प्रतवारी, शाळानिहाय योजना, शाळा सुधार कार्यक्रम, शाळासमूह संरचना, कार्यक्रमांचे आयोजन, स्थानिक समाजाचा सहभाग, मूल्यमापन आणि अनुधावन अशी सातकलमी उपाययोजना निश्‍चित करण्यात आली. या सप्तपदीचा प्रयोग स्वतः शिक्षण संचालकांनी दत्तक घेतलेल्या चऱ्होली बुद्रुक वाघेश्वरी विद्यालयाच्या शालासमूहात करून पाहाण्यात आला. केंद्रशासनाने या प्रयत्नांची दखल घेतली. राष्ट्रीय शैक्षणिक व प्रशासन संस्था, नवी दिल्ली (नीपा)यांनी सर्व राज्यांच्या प्रतिनिधींचा एक अभ्यासगट नेमून महाराष्ट्राच्या या योजनेचा अभ्यास केला. केंद्र शासनाने या प्रयोगाची शिफारस सर्व राज्यांना केली.

       स्वयंमूल्यमापनातून स्वयंशिक्षण - विकास साधणे हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट होय. प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षणविस्तार अधिकारी अशा विविध घटकांनी अंतर्मुख होणे, आपल्यातील उणिवांचा शोध घऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी या योजनेचा उपयोग झाला.

       आपल्या कार्यातील आनंददायक क्षण शिक्षकांनी टिपणे व त्यावर लेखन करणे असे ‘आनंदाचे डोही आनंदतरंग’ या उपक्रमाचे स्वरूप होते. ‘आणिले वेचुनि अमृतकण’ या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी दररोज किमान दहा पाने तरी वाचावी व एक पान तरी लिहावे, असे सुचविण्यात आले. माध्यमिक स्तरावर विषयशिक्षकांच्या संघटनांना शासनाकडून अर्थसाहाय्य देण्याची योजना आखण्यात आली. त्यातून अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, अध्ययन - अध्यापन - कार्यात सुधारणा आणि अभ्यासक्रम निर्मिती पाठ्यपुस्तकरचना  इ.  कार्यात शिक्षकांचे सहकार्य घेण्याचा प्रयत्न झाला.

       प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील चांगल्या कामाची दखल घेऊन संबंधित शिक्षक/मुख्याध्यापक यांना गुणग्रहणपत्रे पाठविण्याची योजना सुरु करण्यात आली.

        जीवनशिक्षण या नियतकालिकातून शिक्षण संचालक यांनी अंदाजे १५ महिने शिक्षकांशी हितगुज करणारी पत्रे प्रसिद्ध केली.

       औरंगाबाद येथे १९६६ ते ७१ या कालखंडात शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्राचार्य असताना विद्यार्थ्यांसाठी चिपळूणकर यांनी ‘समाजाचा एक घटक’ या नात्याने, ‘माणूस म्हणून जगण्याची क्षमता विकसित करते ते शिक्षण’ हा पायाभूत विचार लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये  सामाजिक, व्यावसायिक, बौद्धिक, भावनिक, शारीरिक, नैतिक, नेतृत्वविषयक, व्यावहारिक आणि अध्यात्मिक क्षमतांचा विकास व्हावा यासाठी २५ गुणांची एक पडताळासूची विकसित केली होती. इयत्ता पहिलीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे प्राथमिक शाळेत स्वागत करण्यात येऊ लागले. शाळा व शिक्षक यांच्याबद्दल आपुलकी निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

         मुलींसाठी शिक्षण मोफत केले असले तरी कित्येक मुलींच्या कपडे, वह्या, चपला इ. गरजांची पूर्तता होत नाही. हे लक्षात घेऊन समाजाच्या सहकार्याने एकेका मुलीसाठी दरमहा पंचवीस रुपये देऊन तिचे दत्तकपालकत्व स्वीकारण्याची सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना सुरू करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या गावातील गरजू मुलींचे दत्तक पालकत्व स्वीकारून चिपळूणकर यांनी या योजनेचा  शुभारंभ केला. अल्पावधीत या योजनेचा लाभ राज्यातील दीड लाख मुलींना मिळू लागला. देशाच्या पंतप्रधानांनी या योजनेत विशेष रस घेऊन व केंद्रशासनाच्या शिक्षणसल्लागार मंडळाने या योजनेची शिफारस देशातील सर्व राज्यांना केली.

        प्रशासनयंत्रणेतील आपल्या सर्व सहकाऱ्यांना आपण दौऱ्यात काय पाहिले व ऐकले ते कळावे यासाठी व शिक्षणविकासाला पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी वि. वि. चिपळूणकर दर महिन्याला चक्रमुद्रित संपर्क -पत्रिका पाठवीत असत.

       ‘शिक्षणाकडून सामाजिक विकासाकडे’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला. प्रौढ महिलांच्या शिक्षणाला व विकासाला अधिक गती देण्यासाठी ‘माहेर’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता.

        चिपळूणकर यांनी असे विविध उपक्रम अंमलात आणण्याचे प्रयत्न केले. चिपळूणकर हे कल्पक, उपक्रमशील विचारवंत, त्याचप्रमाणे अत्यंत प्रभावी वक्ते होते. आपल्या वाणीने व शिक्षणविषयक तळमळीने त्यांनी अवघा महाराष्ट्र भारावून टाकला. मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. श्रोत्यांना विश्‍वासात घेऊन ते त्यांना विचारप्रवृत्त करतात. त्यांना कृतीची प्रेरणा ते देतात. आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद इ. विचारवंतांचे वाङ्मय त्यांच्या चिंतनाचे विषय आहेत. श्रीमद्भगवद्गीता, दासबोध, श्री ज्ञानेश्‍वरी इ. ग्रंथांचा त्यांचा अभ्यास आहे.

         शिक्षण विषयाच्या चिंतनातून भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून प्रत्यक्ष शैक्षणिक उपक्रम केल्याने त्यांना सहज शिक्षणाच्या व्याख्या सुचत जात. भारतीय तत्त्वज्ञानाच्या चिंतनातून काही शिक्षणविषयक व्याख्या चिपळूणकरांनी सिद्ध केल्या आहेत. त्यातील एक सोपी, सुटसुटीत व्याख्या सर्वतोमुखी झाली आहे. ‘शिक्षा म्हणजे वळण, दळण नव्हे !’ हीच ती व्याख्या. ‘क्षणाक्षणाला जे शिकविते ते शिक्षण’ किंवा ‘नीतिमानांच्या सहवासात जे मिळते ते शिक्षण’. अशा काही सोप्या व्याख्या त्यांनी केल्या आहेत. 

      विद्यार्थी शिक्षकपरायण असावा. शिक्षक विद्यार्थीपरायण असावा. दोघेही ज्ञानपरायण असावेत आणि ज्ञानसेवापरायण असावेत. ही विनोबांची चतुःसूत्री सर्वश्रुत आहे. शिक्षण व समाजजीवन यांच्या परस्परसंबंधीच्या संदर्भात चिपळूणकर सुचवितात :शिक्षणसंस्था समाजाभिमुख असाव्यात, समाज शिक्षणाभिमुख व्हावा, शिक्षण विकासाभिमुख व्हावे, शैक्षणिक व्यवस्थापन शिक्षकाभिमुख व्हावे, शिक्षण छात्राभिमुख व्हावे, छात्र ज्ञान - विज्ञान - तंत्रज्ञानाभिमुख व्हावे आणि ज्ञान - विज्ञान - तंत्रज्ञान विश्‍वकल्याणाभिमुख व्हावे.

     त्यांनी आकाशवाणी, दूरदर्शनवर भाषणे दिली आहेत व मुलाखतीत सहभाग घेतला आहे. त्यांनी शैक्षणिक विषयांवर सुमारे १०० लेख लिहिले आहेत व संपर्क पत्रिकांमधील लेखन केले आहे.

     त्यांनी निवृत्तीनंतर औरंगाबाद येथे १०-१२ वर्षे गीता वर्ग घेतले. त्यांनी ‘जीवनसंस्कार’ हे पुस्तक लिहिले. त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. त्यातून ‘गीताभवन’ साकार झाले. १९९२ ते ९५ या काळात औरंगाबाद येथील प्रौढ शिक्षण योजनेमध्ये त्यांनी संचालक म्हणून काम केले. त्याबद्द्ल महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्कृत केले आहे.

- श्री. वा. कुलकर्णी

चिपळूणकर, विद्याधर विष्णू