दास्ताने, नारायण गणेश
भारतात शास्त्रीय पद्धतीवर आधारित पाणी व्यवस्थापन करण्याचे प्रयत्न करण्यात डॉ. नारायण गणेश दास्ताने यांचे कार्य फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे पिकाला आयुर्मान पूर्ण करण्याकरता (बी पेरण्यापासून बी तयार होईपर्यंत) किती पाण्याची गरज आहे याची माहिती मिळण्यास व उपलब्ध पाण्यामध्ये कोणती पीकपद्धती असावी याचे नियोजन करण्यास साहाय्य होते. शालेय शिक्षण पुणे येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी बी.एस्सी. (कृषी) ही पदवी प्रथम श्रेणीत १९४९मध्ये, तर १९५१मध्ये एम.एस्सी (कृषी) पदवी प्राप्त केली. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. दास्ताने यांनी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातून कृषिविद्या विषयात पीएच.डी. पदवी मिळवली. पाणी व्यवस्थापन हा त्यांच्या आवडीचा विषय होता. डॉ. दास्ताने यांनी भा.कृ.अ.सं., नवी दिल्ली येथे कृषिविद्या अध्यापनास सुरुवात केली. त्यांनी पडलेला पाऊस पीकवाढीत किती उपयुक्त (इफेक्टिव्ह रेनफॉल) होतो, याचे मोजमाप करण्याची पद्धत सोप्या पद्धतीने विकसित केली. तोपर्यंत उपयुक्त पाऊस मोजण्याची ठोकताळा पद्धत होती. त्यामुळे पाणी व्यवस्थापनात नेमकेपणा येत नव्हता.
बागायती पिकांना किती वेळा आणि किती प्रमाणात पाणी द्यायचे याची नेमकी पद्धत प्रचलित नव्हती. त्या काळी किती दिवसांनी किती पाणी द्यायचे, हे पाण्याच्या पाळीतील अंतर आणि पाण्याची खोली यावर आधारित होते. उदाहरणार्थ, पाणी दर ७, १४, २१ दिवसांनी ६, ८, १० सेंटीमीटर खोलीचे द्यायचे. पिकाच्या वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओल आणि वातावरणाची परिस्थिती यांचा संबंध पाणी देण्याशी नव्हता. म्हणून मिळणारी माहिती शास्त्रीय निकषांवर टिकणारी नव्हती. डॉ. दास्ताने आणि त्यांचे सहकारी यांनी जमिनीतील ओलीचे प्रमाण पाहून किती पाणी द्यावे; याची पद्धती शोधून काढली, परंतु दर वेळी मातीचा नमुना घेऊन त्यातील ओलावा किती आहे हे पाहणे फार कष्टाचे आणि वेळकाढू होते. त्याऐवजी बाष्पभवन पात्रातील पाणी बाष्पीभवनामुळे किती कमी झाले, त्या प्रमाणात पिकाला पाणी देण्याची वेळ ठरवण्यात आली. या पद्धतीमुळे पाणी व्यवस्थापनात नेमकेपणा आला. बाष्पीभवन पात्र काही ठरावीक ठिकाणीच उपलब्ध असते. ही त्रुटी भरून काढण्यासाठी डॉ. दास्ताने यांनी ‘कॅन इव्हापोरीमीटर’ तयार करून त्याचा उपयोग केला.
डॉ. दास्ताने यांच्या पाणी व्यवस्थापनातील कार्यामुळे त्यांना १९६५-१९७० या काळात राष्ट्रीय कृषी आयोगावर काम करण्याची संधी मिळाली. कृषी आयोगाने कृषीसंबंधी सर्व बाबींवर विस्तृत अहवाल तयार केला होता. त्यांनी पंधरा वर्षे संयुक्त राष्ट्रसंघाच्या फूड अॅन्ड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनबरोबर रोम येथे तज्ज्ञ म्हणून काम केले. त्यानंतर डॉ. दास्ताने यांनी अनेक देशांमध्ये पाणी व्यवस्थापनासंबंधी तज्ज्ञ म्हणून कार्य केले. डॉ. दास्ताने यांनी २००पेक्षा अधिक शास्त्रीय लेख विविध नियतकालिकांमधून लिहिले आहेत. एफ.ए.ओ. येथे काम करताना त्यांनी पाणी व्यवस्थापनासंबंधी ५०हून अधिक पत्रिका, पुस्तके आणि अहवाल तयार केले आहेत. त्यांनी तयार केलेले ‘प्रॅक्टिकल मॅन्युअल’ हे पाणी व्यवस्थापनासाठी अतिशय उपयुक्त आहे.