Skip to main content
x

दाते, शंकर गणेश

       शंकर गणेश दाते यांचा जन्म बारामती येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील गणेश मनोहर दाते हे पेशव्यांचे सावकार होते. त्यांना पेशव्यांनी १८ एकर जमीन इनाम म्हणून दिली होती, ती त्यांनी कसायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी भाजीपाल्याची पिके घेण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान ऊस पिकासंदर्भातील जाहिरात वर्तमानपत्रात आल्यावर त्यांनी ५०० एकर जमीन महाराजांकडून खंडाने घेतली व त्यावर नीरा कॅनालच्या खारट पाण्यावर उसाचे उत्पादन घेता येत नसल्याचा गैरसमज समाजात रूढ होता. तो खोटा ठरवण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात १५० एकर जमिनीत ऊस लावला व त्याचे संपूर्ण उत्पन्न त्यांना मिळाले. त्यानंतर त्यांनी ‘फकडी’, ‘अनाबेशाही’, ‘भोकरी’ या द्राक्षाच्या जातींची लागवड केली.

    पुढे गणेशराव दाते मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात आले. तेथेच शंकर दाते यांचे शिक्षण झाले. शंकर दाते बी.ए. झाल्यावर पी.एस.आय. झाले व नोकरीत रुजू झाले. फाळणीच्या वेळेस त्यांच्या वडिलांनी, गणेश दाते यांनी शंकर दाते यांना बारामतीला बोलावून घेतले व घरच्या शेतीत लक्ष घालण्यास सांगितले. वडिलांच्या आज्ञेनुसार त्यांनी खंडाची शेती पाहण्यास सुरुवात केली व त्यासाठी त्यांनी फलटण-बारामती असा आपला शेतीचा प्रवास सुरू ठेवला.

      शंकर दाते यांनी बारामती येथे द्राक्ष, पेरू, चिकू यांच्या बागा तयार केल्या. १९३५ साली साखरवाडीला फलटण शुगर वर्क्स सुरू झाले. त्यामुळे या भागात उसाची मागणी वाढल्यामुळे शंकर दाते यांनी उसाचे उत्पादन घेण्याचे ठरवले व एकरी १०० टन उसाचे उत्पन्न घेतले. याच काळात त्यांनी बारामती येथे द्राक्ष लागवड करण्यास सुरुवात केली. त्या वेळेस त्यांनी ‘बँगलोर पर्पल’ ही द्राक्षाची जात मोठ्या प्रमाणात लावली. त्यांनी १७ एकर जमिनीत २० हजार शेर भोकरीचे उत्पादन घेतले. दादासाहेब शेंबेकर यांनी द्राक्ष पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी पीक स्पर्धा (१९४५-५० च्या दरम्यान) आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये शंकरराव दाते यांनी उच्चांक केल्याबद्दल त्यांना १००० रुपयांचे (सुरती रुपये) बक्षीस चांदीच्या ताटातून बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते दिले होते. १९५४ साली शंकर दाते यांनी हैदराबादच्या भारतीय द्राक्ष संघटनेने भरवलेल्या प्रदर्शनात सहभाग घेतला. या स्पर्धेत त्यांचा पहिला क्रमांक आला आणि त्यांना ‘ग्रेप किंग’ ही पदवी देण्यात आली (६२ ट./हे. जागतिक विक्रम). जागतिक पातळीवर त्यांच्या कामाचे कौतुक झाले. शंकर दाते हे १९६७-१९६९ या काळात ‘माळेगाव सहकारी साखर कारखान्या’चे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांचे भाऊ श्रीनिवास दाते यांनीही शेतीमध्ये निरनिराळे प्रयोग केलेले आहेत, तसेच ते औषधी वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. 

- संपादित

संदर्भ
१. अर्वाचीन चरित्रकोश; संपादक, चित्राव सिद्धेश्‍वरशास्त्री
दाते, शंकर गणेश