देहूकर, भाऊसाहेब
भाऊसाहेब देहूकर हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वंशातील सत्पुरुष होत. महाराजांच्या पुत्रांपैकी केवळ नारायणबाबा देहूत राहिले, महादेव व विठोबा या दोन पुत्रांच्या वंशशाखा देहू सोडून पंढरपूर येथे जाऊन स्थायिक झाल्या. पंढरपुरातील वासुदेव महाराज देहूकर यांनी नव्या फडाची स्थापना केली.
वासुदेव महाराज हे मल्लाप्पा वासकर (१७०७ ते १७९९) यांचे समकालीन होते. याच वासुदेव महाराजांचे नातू रामचंद्र ऊर्फ भाऊसाहेब महाराज हे थोर साक्षात्कारी सत्पुरुष म्हणून प्रसिद्ध झाले. ते थोर कीर्तनकार म्हणूनही वारकऱ्यांमध्ये प्रसिद्ध होते. भाऊसाहेब यांचे वारकरी संप्रदायातील योगदान मोेठे आहे. जाज्वल्य निष्ठा म्हणजे रामभाऊ. ते रोज पहाटे काकड आरतीस विठ्ठल मंदिरात जात होते. काकड आरती चुकली, तर त्या दिवशी भाऊसाहेब स्वत:स शिक्षा म्हणून अन्न-पाणी घेत नसत. त्यांची ही निष्ठा पाहून बडवे काकड आरतीस त्यांची आतुरतेने वाट पाहत असत.
रामभाऊ अखेरची काही वर्षे पंढरपूर सोडून गेले नाहीत. आपणांला पंढरीतच मरण यावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती; पण वऱ्हाडातील वारकऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांना पंढरपूर सोडून वऱ्हाडात जाणे भाग पडले आणि तेथील कार्यक्रम होताच भाऊसाहेबांचे निधन झाले. सोबत पत्नी होती. ‘‘आता मी पंढरीला जाऊन काय सांगू? कसे सांगू?’’ म्हणत भाऊसाहेबांच्या देहाजवळ पत्नीने करुणा भाकली आणि आश्चर्य म्हणजे भाऊसाहेब झोपल्यासारखे डोळे उघडून, ‘‘चल, पंढरपूरला जायचे ना!’’ म्हणत उठले. अशा प्रकारे स्वत:चा मृत्यूही त्यांच्या अधीन होता. अशा अनेक चमत्कार कथा भाऊसाहेब महाराजांच्या चरित्रात आहेत. पंढरपुरात प्लेगची साथ आल्यावर ब्रिटीश सैनिक, पोलिसांनी सर्वांनाच गावाबाहेर काढले; पण भाऊसाहेब महाराज ‘देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥’ या अभंग उक्तीप्रमाणे पंढरीतच राहिले.
भाऊसाहेब महाराजांनी अंमळनेरकर, बेलापूरकर यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध वृद्धिंगत केले. श्रावण वद्य द्वितीया, शके १८३५ रोजी भाऊसाहेब महाराजांचे निर्वाण झाले. त्यांचे समाधी मंदिर पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात आहे. देहूकरांच्या फडावर श्रावण शु १३ ते श्रावण वद्य २ पर्यंत भाऊसाहेब महाराजांचा पुण्यतिथी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होतो.
भाऊसाहेब महाराज यांच्यावर विनायक महाराज शाळिग्रम यांनी ‘नूतन संतचरित्रे’ या ग्रंथात सुंदर आख्यान काव्य लिहिलेले आहे. अर्थात, ते चमत्काराच्या अंगाने लिहिलेले आहे. त्यात शाळिग्रम म्हणतात,
जे जे आले पंढरीस । त्यांचे पिढीचा पुण्यपुरुष ।
रामभाऊ नाम ज्यास । भाऊसाहेब म्हणती तया ॥२१॥
भाऊसाहेबांचे निर्वाण झाल्यावर देहूकर फडाची परंपरा त्यांचे पुत्र नामदेव महाराज यांनी पुढे चालविली; पण केवळ तीन वर्षेच त्यांना सेवेचा योग लाभला. त्यांचे १९१६ मध्ये त्यांचे निधन झाले व फडाची सर्व जबाबदारी सोपानकाका देहूकर यांच्याकडे आली. सोपानकाकांना विठ्ठलकृपेने प्रदीर्घ आयुष्य लाभले. त्यांना वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाते. त्यांचे कार्तिक महिन्यातील वद्य पक्षात, आळंदी वारीत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपुढे, वद्य त्रयोदशीला कीर्तन होत असे. ते तुकाराम बीजेचा उत्सव पंढरपुरात फडामध्ये साजरा करीत. तो झाल्यावर फाल्गुन वद्य षष्ठीच्या संत एकनाथ महाराज पुण्यतिथी उत्सवासाठी ते पैठणला जात. माघ वारीसाठी ते दिंडी घेऊन त्र्यंबकेश्वरला जात.
आषाढ महिन्याच्या वद्य पक्षात संत सावता माळी पुण्यतिथी उत्सवात त्यांचे काल्याचे कीर्तन असे. महाशिवरात्रीला करमाळ्याजवळील संगमेश्वराला ते दिंडी घेऊन जात. ही देहूकर फडाची परंपरा ह.भ.प. सोपानकाकांनी अनेक वर्षे निष्ठेने जोपासली. त्यानंतर त्यांचे पुत्र ज्ञानोबा माउली, नातू बापूसाहेब, बाळासाहेब ही परंपरा पुढे चालवीत आहेत. जयरामबुवा देहूकर यांचाही पंढरीत एक स्वतंत्र फड आहे.
देहूकरांचा पैठण, तेर, अरण, त्र्यंबकेश्वर, आदिनाथ येथे विशेष मान आहे. पंढरपूरप्रमाणेच देहूकरांच्या देहू येथे जी फड-परंपरा चालत आहे, त्यामध्ये देवरामबुवा, मुरलीधरबुवा असे अधिकारी सत्पुरुष होऊन गेले. अलीकडच्या काळात श्रीधरबुवा देहूकर हे तर चालते-बोलते कोश होते.