Skip to main content
x

देसाई, बेजन नोशीर्वान

     गुजरातमधील नवसारी गावात एका गर्भश्रीमंत कुटुंबात बेजन नोशीर्वान देसाई ह्यांचा जन्म झाला. देसाई अकरा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. पण ह्या आघाताने देसाई डगमगून गेले नाहीत. मोठ्या कणखरपणे त्यांनी स्वत:च्या पुढील अध्ययनाची आखणी केली. नवसारीमध्ये त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

     पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या सेंट झेविअर्स महाविद्यालयामधून त्यांनी पदवी मिळविली व पदव्युत्तर शिक्षणही पुरे केले. दिवंगत सेठ फिरोजशहा मेहता ह्यांच्या पुत्राच्या सांगण्यावरून त्यांनी नाशिकच्या ‘बॉईज टाऊन पब्लिक स्कूल’चे मुख्याध्यापकपद स्वीकारले आणि त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात झाली. १९५८ मध्ये मुंबईच्या सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजमधून बी. एड. परीक्षेत विशेष गुणवत्तेसह मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळविला.

     देसाई सर्वप्रथम एक उत्तम शिक्षक आहेत. एका मुख्याध्यापकाच्या भूमिकेतून शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासविषयक व अभ्यासेतर उपक्रमांचे परिपूर्ण असे नियोजन त्यांनी केले. सहकारी शिक्षकांवर मोठा विश्‍वास टाकून त्यांच्या सहकार्याने ते नियोजन ते प्रत्यक्षात आणत राहिले. अर्थातच शाळा काही काळातच सर्व क्षेत्रात यशस्वी होत गेली. बत्तीस वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात भारतातील गुणवत्ता असणारे, विद्यार्थी घडविणारे, महाराष्ट्र राज्यातील एक सर्वोत्कृष्ट पब्लिक स्कूल म्हणून शाळेचे सर्वत्र नाव झाले.

      १९६३ मध्ये देसाई अमेरिकेच्या शैक्षणिक दौऱ्यावर गेले. तेथील वास्तव्यात अनेक शिक्षणसंस्थांना त्यांनी भेटी दिल्या, वेगवेगळे प्रयोग अनुभवले आणि एक अनुभवसंपन्न अधिकारी म्हणून परत आले. याच काळात नेवाडा प्रांतातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्यापन कौशल्याचा अनुभव मिळाला. ‘फुलब्राईट’ शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील अनुभवामुळे, विविध शैक्षणिक प्रयोगांनी सिद्ध झालेल्या कर्तृत्वामुळे १९७५ पासून आजतागायत इन टॅक, दिल्ली, रोटरी व लायन्स इंटरनॅशनल ह्या संस्थांमध्ये पर्यावरण समिती, व्यवसाय मार्गदर्शन व युवा उपक्रम समिती, स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन समिती अशा विविध समित्यांचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, एन. सी. इ. आर. टी (नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग) मध्ये पाठ्यपुस्तक तज्ज्ञ म्हणून तसेच मिलिटरी स्टडीज, गुजराती, अवेस्ता, अरेबिक भाषांच्या ‘अभ्यासक्रम’ समित्यांचे सदस्य म्हणून सरांचे कार्य मोठे आहे.

      केंद्र सरकारच्या सातव्या पंचवार्षिक योजनेच्या परिषदेत महाराष्ट्र सरकारचे खास निमंत्रित म्हणून ते उपस्थित होते. ह्या परिषदेसाठी मध्य प्रदेश, गोवा, गुजरात ह्या राज्यांचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व शिक्षणतज्ज्ञ आलेले होते. गुजरात साहित्य अकादमीचे सदस्य म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांची निवड केली.

       माध्यमिक शालान्त परीक्षा व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेच्या निकाल सुधार समितीत मार्गदर्शक म्हणून त्यांना विशेष निमंत्रण होते. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड ह्या संस्थेचे विश्‍वस्त म्हणून देसाई काम पाहतात.

      इंग्रजी, संस्कृत, गुजराती, हिंदी साहित्याचा त्यांचा मोठा व्यासंग आहे. त्यातूनच लेखनाची, वक्तृत्वाची उत्तम शैली त्यांच्याजवळ आहे. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, कराची यासारख्या शहरांतून व परदेशातही आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक विषयांवरील व्याख्याने ते देतात. शिक्षक, प्रशासक म्हणून काम करीत असतानाच १९४१ पासून सुरू केलेले लेखनाचे व्रतही त्यांनी चालू ठेवलेले आहे. शिक्षण, विविध धर्मांचा तौलनिक अभ्यास, अध्यात्म ह्या विषयांच्या संदर्भातील शंभराहून अधिक निबंध त्यांनी परिषदांतून वाचले आहेत. ‘वेदप्रदीप’ या वेदविषयक तत्त्वज्ञानाला वाहिलेल्या  मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. जीवनजी मोदी, उद्योगपती जे. एन. मार्शल ह्यांची चरित्रे, ‘नेम्स अँड सरनेम्स - अ फिलॉलॉजिकल स्टडी’, ‘रामय्या कथा सुबोधिनी’ (गुजराती) अशी विविध विषयांवर त्यांची पंधरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

     शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात-राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देसाई यांनी केलेल्या अनन्यसाधारण कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव केलेला आहे.

     मुंबई विद्यापीठाचे देवकरण नानजी पारितोषिक, दोराब टाटा पारितोषिक, पोद्दार सुवर्णपदक, रोटरी इंटरनॅशनलचा नाशिकभूषण पुरस्कार, सन २००८ मधील पुणे विद्यापीठाने प्रदान केलेला ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ हे व यासारख्या आणखी काही पुरस्कारांनी  त्यांना गौरवण्यात आले.

- प्रा. सुहासिनी पटेल

देसाई, बेजन नोशीर्वान