Skip to main content
x

देसाई, रघुनाथ त्र्यंबक

         घुनाथ त्र्यंबक देसाई यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वसगडे या गावी झाला. त्यांनी १९३९मध्ये नागपूरमधील सिताबर्डी येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमधून शालान्त परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी १९४३ मध्ये नागपूर कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) आणि १९४६ मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून जी.बी.व्ही.सी. पदवी प्राप्त केली. डॉ. देसाई यांनी १९४६ मध्ये फिरतीवरील साहाय्यक पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक या पदावर रुजू होऊन नोकरीची सुरुवात केली. नंतर त्यांनी छिंदवाडा जिल्ह्यातील मुलतापी आणि बैतूल येथे काम केले. सुमारे एक वर्ष त्यांनी रायपूर जिल्ह्यातील चांखुरी येथे दुग्ध व्यवसाय व्यवस्थापक म्हणून काम केले. नंतर नागपूरमधील तेलंगखेडी येथील पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण केंद्रावर अध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. येथेच त्यांची साहाय्यक संचालक (पशुवैद्यकीय सेवा-वर्ग २) पदावर पदोन्नती झाली. तेथे त्यांनी १९५७पर्यंत काम केले.

          डॉ.देसाई यांची १९५७ मध्ये नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुसंवर्धन विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. नंतर त्यांनी अमेरिकेतील कन्सास स्टेट विद्यापीठातून एम.एस.ची पदवी प्राप्त केली. अमेरिकेहून परतल्यावर त्यांची मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात दुग्ध व्यवसायशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक पदावर नेमणूक झाली, परंतु थोड्या कालावधीतच त्यांची नागपूर येथे बदली होऊन नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशु-संवर्धन विभागात त्यांना साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमण्यात आले. त्यांची १९६३मध्ये याच विभागात प्राध्यापक म्हणून निवड झाली. अकोला येथील डॉ.पं.दे.कृ.वि.त १९७० मध्ये नव्याने सुरू केलेल्या ‘दुभत्या गुरांचे उत्पादन आणि कुक्कुट उत्पादन’ या विभागात त्यांची विभागप्रमुख म्हणून नेमणूक झाली. अद्ययावत ज्ञान आणि शिकवण्याची हातोटी यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांनी एम.एस्सी.च्या ३० आणि पीएच.डी.च्या ५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विद्यार्थ्यांनी पशु-संवर्धन खात्यात आणि कृषी विद्यापीठात सर्वोच्च पदे भूषवली. त्यांचे ७५हून अधिक लेख देशातील प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेलेे आहेत.

          डॉ.देसाई यांची १९८० मध्ये नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता म्हणून निवड झाली. त्यांनी सेवानिवृत्तीपर्यंत या पदावर काम केले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला समाजसेवेला वाहून घेतले. नागपुरातील रामदास पेठेतील ज्येष्ठ नागरिक संघ या संस्थेचे ते दोन वर्षे उपाध्यक्ष व नंतर तीन वर्षे अध्यक्ष होते.

- संपादित

देसाई, रघुनाथ त्र्यंबक