Skip to main content
x

देसाई, सुंदरलाल त्रिकमलाल

      मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच गुजरात उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश सुंदरलाल त्रिकमलाल उर्फ एस.टी. देसाई यांचा जन्म प्रसिद्ध वकिलांच्या कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व अहमदाबाद येथे झाले. एलएल.बी. परीक्षेत त्यांना किन्लॉक फोर्ब्ज सुवर्णपदक मिळाले. नंतर ते इंग्लंडला गेले व १९२७ मध्ये बॅरिस्टर झाले. परत आल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत वकिली सुरू केली. कालांतराने ते अपील शाखेतही वकिली करू लागले. दोन्ही शाखांमध्ये त्यांचा उत्तम जम बसला. एक विद्वान आणि विशेषत: उलटतपासणीत निष्णात वकील म्हणून ते नावाजले.

       वकिलीतील पंचवीस वर्षांच्या अनुभवानंतर १९५२मध्ये देसाई यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. मे १९६०मध्ये मुंबई राज्याचे विभाजन होऊन वेगळे गुजरात राज्य अस्तित्वात आले, तेव्हा न्या.देसाई यांची नियुक्ती गुजरात उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून झाली. त्या काळी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय साठ असल्याने जानेवारी १९६१मध्ये ते मुख्य न्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. गुजरात उच्च न्यायालयातील न्या.देसाई यांची कारकीर्द फक्त सात महिन्यांचीच असली, तरी तेवढ्या अवधीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले.

        त्याआधी मुंबई उच्च न्यायालयातील आपल्या कारकिर्दीतही न्या.देसाई यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. कायद्याचे गुंतागुंतीचे किंवा संदिग्ध प्रश्न सोडवून त्यांच्यावर निर्णय देताना न्या.देसाई यांचा दृष्टिकोन संकुचित किंवा तांत्रिक बाबींवर भर देणारा नसे, तर व्यापक दृष्टीने साधक-बाधक विचार करून कायद्याचा उदारमतवादी अर्थ लावण्याचा असे. घटनेच्या कलम २२६ मधील तरतुदींनुसार ‘रिट’ जारी करण्याचा जो अधिकार उच्च न्यायालयांना आहे, त्याच्या व्याप्तीसंबंधी महत्त्वाचे निर्णय त्यांनी दिले.

        सर्वात महत्त्वाचे म्हणजे नानावटी प्रकरणातील फौजदारी खटल्याचा निकाल लागल्यानंतर निर्माण झालेला गुंतागुंतीचा घटनात्मक प्रश्न उच्च न्यायालयाच्या ज्या पाच न्यायाधीशांच्या विशेष पूर्णपीठासमोर आला, त्याचे  न्या.देसाई एक सदस्य होते. या पीठाचा एकमताचा निकाल हा मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा निकाल मानला जातो.

        आपल्या न्यायालयीन कामाव्यतिरिक्त न्या.देसाई एक श्रेष्ठ न्यायविदही होते. हिंदू कायद्यावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. सर दिनशा मुल्ला यांच्या ‘हिंदू लॉ’ या प्रख्यात ग्रंथाच्या बाराव्या व नंतरच्या अनेक आवृत्त्यांचे न्या.देसाईंनी अत्यंत साक्षेपाने संपादन केले. या प्रत्येक आवृत्तीला त्यांची प्रदीर्घ विवेचक प्रस्तावना आहे. शिवाय भागीदारीच्या  (पार्टनरशीप) कायद्यावरही त्यांनी एक प्रमाणभूत ग्रंथ लिहिला.

- शरच्चंद्र पानसे

देसाई, सुंदरलाल त्रिकमलाल