देसले, जगन्नाथ सहादू
जगन्नाथ सहादू देसले यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील दोदवाड येथे झाला. त्यांनी बी.एस्सी. (कृषी) पदवी पुणे विद्यापीठामधून १९६३मध्ये संपादन केली. तसेच एम.एस्सी. (कृषी) पदवी १९७२मध्ये म.फु.कृ.वि.मधून संपादन केली. त्यांनी १९६४ ते १९६९ या काळात चराऊ रानांसाठी एकदल व द्विदल अशा गवताच्या जाती निर्माण करण्याचे संशोधनात्मक कार्य कृषी खाते-महाराष्ट्र राज्य आणि म.फु.कृ.वि. यांच्या संयुक्त विद्यमाने केले. त्यांनी १९७२ ते २००० या काळात साहाय्यक प्राध्यापक या पदावर म.फु.कृ.वि.त काम केले. त्यांनी गवतांच्या, चारापिकांच्या आणि भाजीपाला पिकांच्या अनेक जाती विकसित केल्या. त्यांनी २००२ पासून बायफ-उरळीकांचन येथे निरनिराळ्या चारापिकांच्या उत्तमोत्तम जाती विकसित करणे, चाऱ्याचा दर्जा वाढवणे, चारा साठवणे व बियाणे निर्मितीचे संशोधनात्मक कार्य केले. या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागरूकता व आवड निर्माण होण्यासाठी त्यांनी मेळावे व चर्चासत्रेही आयोजित केली. त्यांचा चराऊ रानांसाठी मारवेल-४०, मारवेल-९३, मारवेल-७, बी. पी.-२०, बोर गवत-२७६, मोशी-४-१, मोठा पवना-१००-५, डोंगरी गवत २-४-११ इ.चा प्रसार केला तसेच स्टायलो (फुले क्रांती) इ. उत्तम जातींचा प्रसार केला. त्यांनी चारापिके म्हणून जायंट बाजरी, रुचिरा ज्वारी, यशवंत गवत, मका-जी.बी.एम., चाऱ्यासाठी चवळी-श्वेता, लसूणघास आर.एल. ८८, संकरित नेपीअर, ओट इ. जाती निर्माण करण्यात सहभाग होता. त्यांनी केलेल्या संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन १९७५ मध्ये म.फु.कृ.वि.ने त्यांना दोन वेतनवाढी एकाच वेळी दिल्या व १९९६ मध्ये याच संशोधनासाठी सुवर्णपदक व प्रशंसापत्र देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांना २००६मध्ये चारापिकांच्या उत्तम वाणांच्या निर्मितीसाठी बियाणे महामंडळ, अकोलातर्फे तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करून स्मृतिचिन्ह दिले.
देसले यांनी केलेले संशोधन पशुपालकांसाठी फार मोलाचे ठरले आहे. त्यांनी अनेक चारापिकांचे वाण शोधून, विकसित व सिद्ध करून पशुपालकांना मोठा आधार दिला आहे.