Skip to main content
x

देशमुख, पंजाबराव शामराव

भाऊसाहेब देशमुख

        पंजाबराव शामराव देशमुख यांचा जन्म गीता जयंतीच्या दिवशी विदर्भातील अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमा संगमावर वसलेल्या पाफळ या लहानशा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. वडिलांनी त्यांना पंजाब शामराव कदम या नावाने १९०६ साली शाळेत दाखल केले. पंजाबरावांचे सुरुवातीचे शिक्षण सोनगाव, कारंजा व अमरावती येथे झाले. त्यांना प्रगाढ बुद्धिमत्ता लाभली होती.  त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. विद्यार्थी शिक्षणाबरोबरच ते संघटनेतही पुढाकार घेऊ लागले. त्यांनी मराठा विद्यार्थी संघटनेला पाठिंबा दिला. त्यांनी उच्च शिक्षणासाठी २१ ऑगस्ट १९२० रोजी इंग्लंडला प्रयाण केले. तेथील विद्यापीठात प्रवेशासाठी प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. त्यांनी निराश न होता खासगी प्रकारे परीक्षेला बसण्याची परवानगी मागितली व ती त्यांना मिळाली. ते एडिंबरोला राहून अभ्यास करत व लंडनला जाऊन परीक्षा देत. १९२१ मध्ये ते बॅरिस्टरची पहिली परीक्षा उत्तीर्ण झाले. एडिंबरा विद्यापीठातून त्यांनी संस्कृत विषयात एम.ए. (ऑनर्स) , डी.फिल.(ऑक्सफर्ड ) आणि बार अॅट लॉ या पदव्या घेतल्या. ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृत भाषेचे संशोधक म्हणून काही दिवस काम करून १९२६ च्या मार्च महिन्यात स्वदेशी परत आले.

        डॉ. देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या रूपाने १९३२ मध्ये अमरावती येथे सामाजिक परिवर्तनाच्या प्रयोगशाळेची उभारणी केली. त्यांनी या संस्थेचे संपूर्ण विदर्भभर जाळे विणले आणि शेतकऱ्यांच्या घराघरांतून पदवीधर निर्माण होतील असे स्वप्न उराशी बाळगले. या संस्थेच्या आज ३००च्यावर शाखा कार्यरत आहेत व संस्थेत दरवर्षी लाखांच्यावर विद्यार्थी विद्यार्जन करतात.

        डॉ. देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. भारत कृषक समाजाने १९५५ पासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक उपक्रम सुरू केले. दोन लाखांपेक्षा जास्त कुटुंबे समाजाचे आजीव सदस्य आहेत. त्यांनी पहिले जागतिक कृषी प्रदर्शन नवी दिल्ली येथे १९६० मध्ये आयोजित केले होते. अमेरिका व रशिया देशांचे राष्ट्राध्यक्ष या जागतिक प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अगत्याने उपस्थित होते. रोम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अन्न व कृषी संघटनेच्या परिषदेला ते भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेले. ते स्वतः कृषी उत्पादनात अनुभव घेतलेले महापंडित आहेत याची परिषदेला खात्री झाली. भातशेतीचे तज्ज्ञ म्हणूनही ते जगात ओळखले जाऊ लागले.

        डॉ. देशमुख यांनी कृषी उत्पादनाप्रमाणेच मत्स्य व्यवसायात रस घेतला. समुद्रातील मासळी तसेच नद्या व तलावातील मत्स्योत्पादनात वाढ घडवून आणली. त्यांच्या कार्यकाळात सुधारित शेतीला चांगली चालना मिळाली. शेतीची जुनी अवजारे जाऊन शेतीत ट्रॅक्टर, बुलडोझरसारखी नवीन कृषी यंत्रे काम करू लागली. कृषी संशोधन केंद्राच्या प्रयोगशाळेने मूग, उन्हाळी भुईमूग, कापूस, ज्वारी, बाजरी, गहू आणि ज्यूट यांच्या संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या जाती प्रचारात आणल्या. ‘व्हाइट लेग हॉर्न’ व ‘रोड रेड आयलंड’ या जातींच्या कोंबड्यांची पैदास करून देशभर कुक्कुटपालनाला शेतीचा जोडधंदा म्हणून उत्तेजन दिले. देशातील दुग्ध व्यवसायाची पाहणी करून भारत सरकारने जर्सी गायींच्या पैदासीत लक्ष घातले. बंगलोर आणि कर्नाल येथील दुग्धशाळा डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याच अविरत श्रमाचे फळ आहेत. खानदेशात केळीचे फार मोठ्या प्रमाणात उत्पादन होते; म्हणून त्यांनी जळगावला केळीची भुकटी करण्याचा एक मोठा कारखानाही काढला.

        डॉ. देशमुख यांच्या कार्यकाळात चिकू, आंबा, नारळ, संत्री यांच्या नव्या जाती निर्माण करून फळबागांची वाढ करण्यात आली. त्यांना १९४६ मध्ये कलकत्त्याला भरलेल्या जागतिक अन्न व कृषी संघटनेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात आले. दिल्लीच्या कृषी संशोधन केंद्रात लागलेले कृषीविषयक शोध त्यांनी संपूर्ण भारतातील खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवले.

         कृषी क्षेत्रातील शेतीविषयक कार्याचा आढावा दरमहा प्रकाशित करण्याच्या उद्देशाने त्यांनी कृषी मंत्रालयाद्वारे सर्क्युलर लेटर प्रकाशित करण्यास सुरुवात केली. संपूर्ण भारतात कृषी उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी अखिल भारतीय पातळीवर पीक स्पर्धा सुरू केल्या. या स्पर्धेत उच्च क्रमांक मिळवणार्‍यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस आणि कृषिपंडित ही पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. धर्माचे स्थान, धर्माचा उगम आणि विकास या विषयावर त्यांनी ‘वैदिक वाङ्मयात धर्माचे स्थान’ या शीर्षकाचा विचारप्रवर्तक प्रबंध सादर करून इंग्लंडमधील एडीनबर्ग विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी मिळवली व ‘बार अ‍ॅट लॉ’ची पदवीही त्याच विद्यापीठातून प्राप्त केली.

        डॉ. देशमुख यांनी व्यायामशिक्षण संस्था, वर्‍हाड शेतकरी संघ, अखिल भारतीय मधुमक्षिकापालन संघटना, सहकारी खरेदी-विक्री संघ, भारतीय कृषक सहकारी अधिकोष, भारतीय कृषिशास्त्र संस्था या संस्थांची स्थापना केली. तसेच त्यांनी अंबादेवी मंदिर हरिजनांसाठी मुक्त करण्यासाठी चळवळीचे नेतृत्व केले. अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजनही केले. त्यांनी भारतीय कृषी यंत्रसामग्री, सहकारी खरेदी-विक्री संघ, भारतीय कृषिशास्त्र संस्था व आंतरराष्ट्रीय ग्रामीण युवक परिषद, या संस्थांचे  अध्यक्षपदही सांभाळले होते. त्यांनी सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी सर्वप्रथम पाऊल उचलले. त्यांनी प्राथमिक शिक्षण कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेतले, तसेच ग्रामपंचायत विधेयक, रोगप्रतिबंधक कायदा, कर्ज लवाद कायदा संमत करून घेतला. ऋणमुक्तीच्या कायद्यामुळे सावकारांच्या तावडीतून शेतकर्‍यांच्या जमिनींची मुक्तता झाली, हे त्यांच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ कार्य आहे. ‘भारतीय शेतकरी हा देशाचा राजा झाला पाहिजे,’ हे त्यांचे स्वप्न होते. त्यांना शिक्षणाबद्दल खूप आस्था होती. शिक्षण म्हणजे समाजप्रबोधन, समाजपरिवर्तन आणि समाजक्रांती या भूमिकेतूनच त्यांनी शैक्षणिक क्रांती घडवली. जोपर्यंत शेतकर्‍यांच्या झोपडीत शिक्षणाचा प्रकाश जाणार नाही तोपर्यंत तो स्वतःच्या हक्काच्या जाणिवेतून पेटून उठणार नाही, या तळमळीतून त्यांनी शिक्षणाची गंगा शेतकर्‍यांच्या दारापर्यंत पोहोचवली.

        डॉ. देशमुख यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांतील कार्य उल्लेखनीय आहे. कृषिक्रांतीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, तब्बल १० वर्षे भारताचे कृषिमंत्री म्हणून (१९५२-१९६२) व काही काळ सहकारमंत्री या नात्याने कार्यभार सांभाळला. त्यांनी अन्न, कृषी, वन, मत्स्योत्पादन, ग्रामीण पुनर्रचना, दुग्धसंवर्धन, पशुपालन व शेतकर्‍यांचे संघटन यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करून शेतकर्‍यांना एक नवीन दिशा दिली. त्यांच्याच पुढाकारामुळे जपानी भातशेतीच्या नवीन पद्धतीने देशातील तांदळाच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली  व भारताने स्वयंपूर्णता प्राप्त केली. डॉ. पंजाबराव देशमुखांचे रामनवमीच्या दिवशी दिल्ली येथे देहावसान झाले.

- डॉ. शरद यादव कुलकर्णी

देशमुख, पंजाबराव शामराव